Home यवतमाळ सावळी (सदोबा) येथील फसवणूक प्रकरणातील आरोपी कीशोर केशेट्टीवार यांची जामीनावर सुटका..!

सावळी (सदोबा) येथील फसवणूक प्रकरणातील आरोपी कीशोर केशेट्टीवार यांची जामीनावर सुटका..!

14

————————————-
घाटंजी: तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सावळी (सदोबा) येथील संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार यांस पारवा पोलीसांनी अटक करुन घांटजी न्यायालयात हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी आरोपीला 11 जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, पोलीस कोठडी संपल्यावर पारवा पोलीसांनी आरोपीची न्यायालयीन कोठडी मागितली. मात्र, घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला. तथापि, आरोपी किशोर केशेट्टीवार तर्फे अँड. अनंतकुमार हरिशंकर पांडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तर शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अँड. अंजली तलवारे यांनी बाजू मांडली.

आर्णी तालुक्यातील सावळी (सदोबा) येथील आरोपी किशोर केशेट्टीवार यांनी जागृती अँग्रो फुड्स अँन्ड ईन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी या शेळी पालनाच्या व्यवसायात पैसे गुंतवून फिर्यादी प्रशांत खरात यांची फसवणुक केल्या प्रकरणी आरोपी सावळी (सदोबा) येथील किशोर केशेट्टीवार विरुद्ध भादंवि 420, 506 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

तथापि, सदर प्रकरणात आणखी ईतर आरोपी असल्याने सावळी (सदोबा) येथील माजी सरपंच व उपसरपंच दिग्विजय भुपेंद्र शिंदे, अमर भुपेंद्र शिंदे आदींना आरोपी करुन ईतरही आरोपींना अटक करण्याची मागणी खरात यांनी केली होती. पोलीस अधीक्षक यांचे कडे दाखल तक्रारीवर वसीमखाँ शेरगुलखाँ, युसूफखाँ महेबुबखाँ, विजय मारबते, मुकींदा हांडे, श्रीमती वंदना कानिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे हे करीत आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर केशेट्टीवार याने सन 2014 मध्ये फिर्यादी प्रशांत खरात याची भेट घेऊन जागृती अँग्रो फुड्स अँन्ड इन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी मध्ये शेतीपालनात व्यवसायात काही रक्कम गुंतवली तर अनेक फायदे होउ शकतात. तसेच 5 हजार जमा केल्यास 6 वर्षात 50 हजार, 50 हजार रुपये भरल्यास 5 लाख रुपये व 1 लाख रुपये भरल्यास 10 लाख रुपये मिळतील, अशा आशयाचे प्रलोभन लाभार्थांना देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी प्रशांत खरात व ईतर लाभार्थांनी आरोपी किशोर केशेट्टीवार, दिग्विजय भुपेंद्र शिंदे व अमर भुपेंद्र शिंदे आदींना सन 2014 पासून रुपये 5 हजार प्रमाणे 50 हजार रुपये गुंतवणूक केली. तसेच आरोपीने 27 आँक्टोंबर 2014 ते 27 आँगस्ट 2020 या कालावधीत फिक्स डिपॉझिटचे बाँन्ड पेपर सुद्धा फिर्यादीस आणून दिला. विशेष म्हणजे बाँन्ड पेपरची मुदत संपल्यावर फिर्यादी खरात याने आरोपी केशेट्टीवार यांना बाँन्ड पेपरची मुदत संपल्याने रक्कमेची मागणी केली. मात्र, आरोपीने रक्कम देण्यास टाळाटाळ करुन कंपनी सोबत पत्रव्यवहार करण्यास सांगितले. त्यावरुन खरात यांनी कंपनीकडे पत्र व्यवहार केला, मात्र, तेथे जागृती फुड्सचे कोणतेही कार्यालय उपलब्ध नसल्याचे पोष्टमनच्या ‘शेरया’ मुळे दिसुन आले.

त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी प्रशांत खरात यांनी 16 जानेवारी रोजी पारवा पोलीस ठाण्यात लेखी रिपोर्ट दाखल केला. पारवा पोलीसांनी चौकशीवरुन तब्बल 77 दिवसानंतर केशेट्टीवार विरुद्ध फसवणुक करुन, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एकाच प्रकरणात दोन गुन्हे होत नसल्याने फिर्यादी प्रशांत खरात यांच्या गुन्हयातच सदरचा गुन्हा समाविष्ट करण्यात येणार असल्याचे पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर यांनी फिर्यादीला सांगितल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे करित आहे.

Copyright ©