यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात सोमवारी 892 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर 37 मृत्युसह 810 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 4619 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 810 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3809 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5720 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2770 तर गृह विलगीकरणात 2950 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 41457 झाली आहे. 24 तासात 892 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 34814 आहे. तर जिल्ह्यात एकूण 923 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.87 असून मृत्युदर 2.23 आहे.
गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 37 मृत्यु झाले. यातील 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 75, 80, 65, 60, 57, 55, 45, 45, 65, 97, 60 वर्षीय पुरुष आणि 65, 48, 73, 65, 36, 65, 73, 47 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 58, 55 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, पुसद येथील 55 वर्षीय महिला, पुसद तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 40 वर्षीय पुरुष व 42, 59 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 50 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 57 वर्षीय महिला, केळापूर येथील 65 वर्षीय पुरुष, कळंब येथील 49 वर्षीय महिला आणि घाटंजी तालुक्यातील 75 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 51 वर्षीय महिला, उमरखेड येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 810 जणांमध्ये 475 पुरुष आणि 335 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 300 पॉझेटिव्ह रुग्ण, पांढरकवडा 152, उमरखेड 75, दिग्रस 69, पुसद 33, वणी 31, कळंब 29, नेर 28, बाभुळगाव 21, घाटंजी 12, मारेगाव 11, राळेगाव 11, महागाव 10, दारव्हा 10, आर्णि 9, झरीजामणी 1 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 349389 नमुने पाठविले असून यापैकी 346294 प्राप्त तर 3095 अप्राप्त आहेत. तसेच 304837 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी पूर्ण 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील 410 ऑक्सीजन बेडपैकी 387 जणांना ऑक्सीजनची आवश्यकता आहे. मात्र उर्वरीत 23 रुग्ण ऑक्सीजन बेडवर भरती असले तरी त्यांना ऑक्सीजनची आवश्यकता नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा या तीन डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 180 बेडपैकी 73 रुग्णांसाठी उपयोगात, 107 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 28 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2278 बेडपैकी 1570 उपयोगात तर 708 शिल्लक आणि 20 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 729 बेडपैकी 540 उपयोगात तर 189 बेड शिल्लक आहेत.
पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा यवतमाळ जिल्हा दौरा
यवतमाळ, दि. 19 : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता यवतमाळ येथे आगमन. दुपारी 1.30 ते 2 वाजता आमदार संजय राठोड यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 2 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 ते 4.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, येथे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व कोरोना संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या समवेत कोविड – 19 अनुषंगाने सविस्तर आढावा बैठक. सायंकाळी 4.30 ते 5 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट व पाहणी. सायं. 5 ते 5.15 वाजता कोविड केअर सेंटर, यवतमाळ भेट व पाहणी. सायं. 5.15 ते 5.30 वाजता कोविड लसीकरण केंद्रास भेट. सायं. 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.
बुधवार दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथून ता. नेर कडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता नेर येथे आगमन मनरेगा कामास भेट व पहाणी. सकाळी 9.15वाजता नेर येथून जानोरी ता. कारंजा, जिल्हा वाशिमकडे प्रयाण.
यवतमाळ – वाशिम जिल्हा सीमेवर प्रवेश करण्यास
21 एप्रिलपर्यंत पूर्णत: बंदी
यवतमाळ, दि. 19 : वाशिम जिल्ह्यातील मानोरा ग्राम पोहरादेवी येथे दिनांक 14 ते 21 एप्रिल 2021 (श्रीराम नवमी) या कालावधीत आयोजित करण्यात आलेली संत सेवालाल महाराज संस्थान तसेच श्रीक्षेत्र उमरी खुर्द येथील यात्रा रद्द करण्याबाबत वाशिम जिल्हाधिका-यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच याबाबत यवतमाळ पोलिस अधीक्षक यांनीसुध्दा प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक असल्याबाबत कळविले आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यालगतच्या सर्व तालुका, पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये 15 ते 21 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून श्रीक्षेत्र पोहरादेवी व श्रीक्षेत्र उमरी खुर्द याकडे जाणाऱ्या मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास पूर्णत: बंदी / अटकाव करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी व श्रीक्षेत्र उमरी खुर्द याकडे जाणाऱ्या सर्व भाविक व यात्रेकरूच्या वाहनांना यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्हा हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच पायी जाणाऱ्या सर्व भाविक व यात्रेकरूंना प्रतिबंध / अटकाव करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस, पुसद, नेर या तालुका कार्यक्षेत्रातून श्रीक्षेत्र पोहरादेवी व श्रीक्षेत्र उमरी खुर्द याकडे जाणा-या सर्व मार्गावर बॅरीकेटस् उभारून बंद करण्यात यावेत.
अशा ठिकाणी चेकपोस्ट उभारून यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यामध्ये वाहनाने अथवा पायी जाणाऱ्या भाविकांविरुध्द साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशात म्हटले आहे. यासंदर्भात नांदेड व आदिलाबाद पोलिस अधिक्षकांनासुध्दा जिल्हाधिका-यांनी पत्र लिहिले असून पुसद व दारव्हा उपविभागीय अधिकारी तसेच पुसद, दारव्हा, नेर, दिग्रस तहसीलदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात याबाबत सुचनांची अंमलबजावणी करावी, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.
बियाणे, खते, किटकनाशके संदर्भात तक्रारींचे
निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित
पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती
यवतमाळ, दि. 19 : खरीप हंगाममध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी खरीप हंगामासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत संपर्क साधण्यासाठी खालीलप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक दत्तात्रय आवारे (9767071906), कृषी अधिकारी (परवाना) शिवा जाधव (9405140150), कनिष्ठ लिपीक मोरेश्वर यंबडवार (9284496111), कृषी सहाय्यक विनोद चव्हाण (9284222125), कनिष्ठ लिपीक अमित कोटे (8830117095) यांचा समावेश आहे.
संबंधित तक्रारदारांनी उपरोक्त भ्रमणध्वनीवर कृषी निविष्ठांच्या अडचणीबाबत तक्रारी नोंदवितांना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्र. व तक्रारीचा संक्षीप्त तपशिल द्यावा किंवा सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉटसॲपवर पाठविल्यास आपल्या तक्रारीचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉटसॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदवाव्यात, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
यवतमाळ व बाभुळगाव तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद
यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणेकरीता उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांन्डर यांना प्राधिकृत केले आहे.
यवतमाळ तहसीलदारांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे यवतमाळ तालुक्यातील मौजा बोथबोडण येथील सहा ठिकाणे व मौजा हिवरी येथील दोन ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच बाभुळगाव येथील तहसीलदारांनी प्रस्तावित केल्यानुसार बाभुळगाव शहरातील व तालुक्यातील मौजा कोंढा येथील सहा ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून वरील नमुद प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.
सदर आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच मुख्याधिकारी व ग्रामस्तरावर गटविकास अधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित करण्यात याव्यात. परवाना, पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) चे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, ग्राम सचिव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे मार्फत करावी.
वरील आदेशांचे जे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे यवतमाळचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.
शिष्यवृत्तीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 19 : समाजकल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणारी अनुसुचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप, संबंधीत सर्व योजनांचे कामकाज हे माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने तयार करण्यात आलेल्या (स्टेट डीबीटी ॲन्ड सर्विस पोर्टल) https://mahadbt.gov.in या संकेत स्थळावर लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकांची बँक खात्याशी संलग्न करून सन 2020-21 चे अर्ज दिनांक 30 एप्रिल 2021 पूर्वी भरण्यात यावेत व तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 30 एप्रिल 2021 पूर्वी सादर करण्यात यावेत.
विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. संबंधीत विद्यार्थ्यांनी सुध्दा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
