यवतमाळ, दि. 31 : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 45 वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील 45 वर्षावरील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील 45 वर्षावरील सर्व सदस्य यांना लसीकरण करणे बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे. नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे व लसीकरणबाबतची माहिती विभाग प्रमुखांना देण्यात यावी, असे आदेशात नमुद आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरीता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अंतर्गत जनजागृती करणे, लसीकरणासाठी पात्र लोकांची माहिती घेणे, लसीकरण होते आहे किंवा नाही याबाबत तपासणी करणे, लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे, लसीकरण केंद्राबाबत समन्वय अधिकारी म्हणून आवश्यक ती जबाबदारी पार पाडणे, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी लसीकरणाबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार कामकाज पार पाडणे व वेळोवेळी अहवाल सादर करणे आदींचा यात समावेश आहे.
नोडल अधिका-यांची नियुक्ती 30 मार्च 2021 च्या आदेशान्वये करण्यात आली असून पुढील आदेशपावेतो त्यांची नियुक्ती राहणार आहे. सदर नियुक्ती ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र खाजगी रुग्णालयात करण्यात आली आहे. याकामात हयगय केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य नियोजन करण्याचे आदेश : जिल्ह्यात कोरोना बाधित वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुसद, दिग्रस, वणी, यवतमाळ, केळापूर येथे प्रतिबंधित क्षेत्र हे अधिक प्रमाणात असून सदर प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. करीता सदर प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी करण्याकरीता सर्व्हेलन्स वाढविणे, टेस्टींग वाढविणे, लसीकरण वाढविणे, आवश्यकते नुसार नवीन कोविड केअर सेंटर स्थापन करणे इत्यादी बाबतचे नियोजन करावे, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
____________________
सहकार खात्याच्या पॅनलसाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि. 31 : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व कलम 88 अन्वये चौकशी प्राधिकृत अधिकारी यांची नामतालीका (पॅनल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पूर्ण न झालेल्या), निवृत्त न्यायाधिश, वकील, चार्टर्ड अकाऊंटन्ट यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था अमरावती, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपनिबंधक / सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तालुका या कार्यालयात दिनांक 1 एप्रिल 2021 ते दिनांक 30 एप्रिल 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची जाहिर सूचना खालील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती सहकार संकूल कांता नगर, जुना बायपास रोड महसूल भवन कार्यालयासमोर अमरावती दु.क्र. 0721 -2663246, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती सहकार संकूल कांता नगर, जुना बायपास रोड महसूल भवन कार्यालयासमोर अमरावती दु.क्र. 0721-2661633, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहकार संकूल आदर्श कॉलोनी, अकोला दु.क्र.0724-2452730, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रशासकीय इमारत खोली क्र.103, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम दु.क्र. 07152-231173, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलढाणा, प्रशासकीय सहकार संकूल बोथा रोड, बुलढाणा दु.क्र. 07262-242336, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ दगडी इमारत सहकार भवन तहसिल चौक, यवतमाळ दु.क्र. 07232-244460 येथे उपलब्ध आहेत.
_____________________
महाराष्ट्र तुरुंग नियम व कैद्यांच्या अधिकाराबाबत जनजागृती शिबीर
यवतमाळ दि. 31 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी जिल्हा कारागृह, यवतमाळ येथे महाराष्ट्र तुरुंग नियम व कैद्यांच्या अधिकाराबाबत तसेच कैद्यांना कायदेविषयक सेवेबाबत कायदेविषयक प्रबोधन शिबिराचे आयोजन केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीर किशोर पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश एम.आर.ए.शेख तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी तसेच ॲड. अजय चमेडिया उपस्थित होते.
किर्ती चिंतामणी यांनी महाराष्ट्र तुरूंग नियम याबाबत माहिती दिली. नकळत माणसाच्या हातून गुन्हा होवून तो आरोपी होतो, परंतू कारागृहात आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी हे त्या आरोपीला येथे चांगले घडविण्याच्या प्रयत्न करत असतात. कारागृहामध्ये आरोपी हा कर्मचाऱ्यांसोबत तसेच इतर आरोपीसोबत वाद घालणार नाही. अमंलीपदार्थ बाळगणार नाही तसेच कटात सहभागी होणार नाही. चोरी करणार नाही, भांडण करणार नाही, असे काही केल्यास त्यांना कारागृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधा कमीत कमी 3 महिन्यापर्यंत बंद करण्याचा अधिकार असल्याबाबत यावेळी त्यांनी सांगितले.
तसेच कारागृहामध्ये आरोपीचे वर्तन शिस्तीत असायला पाहिजे. ज्या कैद्यांना जन्मठेप अथवा 14 वर्षापर्यंत शिक्षा झाली असेल अशा कैद्यांचे लिखान शासनाकडे पाठवून त्यांना शिक्षा कमी होवून त्यांची सुटका होवू शकते याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच कोरोना – 19 विषाणूचा प्रसार होणार नाही याबाबत सर्व आरोपींनी खबरदारी घ्यावी याबाबत सुध्दा माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संचालन तुरुंगाधिकारी सोहेश शेख यांनी केले तर आभार वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस.पी.काळे यांनी मानले. या कार्यक्रमाकरीता कारागृह यवतमाळ येथील आरोपी उपस्थित होते. कोरोना – 19 विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत संपूर्ण खबरदारी घेवून सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले.
________________
यवतमाळ येथील महिला पीडितांना ‘सखी’ वन स्टॉपचा आधार
यवतमाळ दि. 31 : समाजातून अनेकदा पिडीत महिला योग्य मार्गदर्शन आणि मदतीच्या अभावी न्यायापासून वंचित राहतात. अशा पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रसूती विभाग वार्ड नं. 03 या ठिकाणी सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे.
एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, समुपदेशन, कायदेशिर मदत व महिलांशी संबंधीत शासकीय योजनांची माहिती देणे हा मुख्य उद्देश आहे. सोबतच सेंटरमध्ये पीडितांना पाच दिवस आश्रायीत ठेवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांचे मार्गदर्शनाखाली सेंटरच्या जनजागृती व प्रचाराच्या अनुषंगाने नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील आठवडी बाजार, वंजारी फैल, पाटीपुरा या ठिकाणी असणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग, आशा सेविका, परिचारीका, वैद्यकीय अधिकारी इतर सामाजिक कार्यकर्ते यांना सखी सेंटरची माहिती देण्यात आली. सखी सेंटरच्या केंद्र प्रशासक सोनाली पाटील तसेच ललिता गोरे, मयुरी प्रांजळे यांच्या मार्फत माहिती देण्यात आली.
समाजातील पीडित महिलांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सखी वन स्टॉप सेंटरशी 07232-295136 व वन स्टॉप सेंटर 181 महिला हेल्प लाईन 1091 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योति कडू यांनी केले आहे.
________________
नवोदय विद्यालयासाठी निवड चाचणी परीक्षा आता 16 मे रोजी
यवतमाळ दि. 31 : जवाहर नवोदय विद्यालय यांचेकडून इयत्ता सहावीच्या प्रवेशाकरीता 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता निवड चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतू सदर निवड चाचणी आता दिनांक 16 मे 2021 (रविवार) रोजी सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत घेण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.
