आरोग्य संपन्न आणि समृद्ध राष्ट्र निर्माणाच्यादृष्टिनेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निर्मिती
-उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर
प्रकल्पास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन
राज्याच्या ग्रामीण भागात घराघरातले सांडपाणी उघड्या गटारींद्वारे, कोणतीही प्रक्रिया न करता, नदीत, तलावात किंवा नुसते जमिनीवर सोडले जाते. ग्रामीण भागांत सांडपाण्याच्या प्रक्रियेची कोणतीही सोय नाही. काही भागांमध्ये जरी सेप्टिक टॅंक असले तरी वेळोवेळी देखरेख होत नाही आणि बहुतांश वेळा त्यात जमा केलेले सांडपाणी तसेच्यातसे नाल्यात सोडले जाते. यामुळे त्या भागांत आरोग्याला अपायकारक स्थिती निर्माण होते. डास होतात. पावसाळ्यात याचे प्रमाण अधिकच वाढते. पावसाच्या पाण्यामुळे नाले तुडूंब भरून वाहतात आणि हे नाल्याचे पाणी व पावसाचे पाणी आजूबाजूला पसरून अख्खा परिसर दूषित होतो. आणि याच समस्येवर पर्याय काढून आरोग्य संपन्न आणि समृद्ध राष्ट्र निर्माणाच्यादृष्टिनेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निर्मिती असून यास सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) पंकज भोयर यांनी केले. ते आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेंडोळी येथील “सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प” पाहणीच्या निमित्ताने बोलत होते.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प” व “सार्वजनिक शौचालय” काम पाहणीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) पंकज भोयर यांनी ग्रामपंचायत तेंडोळी येथे भेट दिली. त्यांच्या समवेत आर्णी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुधाकर पंडे, विस्तार अधिकारी (पंचायत) गोविंद इंगोले, विस्तार अधिकारी (सांख्यकी) ईश्वरसिंह बघेल, स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक सुमित डकरे, सौ एस.एस.जाधव मॅडम, सरपंचा सौ. सपना र. राठोड, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, जल जीवन मिशनचे विक्रांत जाधव उपस्थित होते.
ते पुढे असेही म्हणाले की, लोकांचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी मैलापाण्याचे योग्य पद्धतीने निस्सारण होणे गरजेचे आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी मुख्य प्रवाहात आल्यामुळे आणि पावसाच्या स्वच्छ पाण्यात मिसळल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. आपल्या परिसरातील नद्या, नाले, तलाव स्वच्छ रहावेत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर करण्याची पुरेशी सुविधा पुरवायला हवी. पावसाच्या पाण्याची साठवण करून आणि पूराच्या पाण्याच्या व्यवस्थापनातून उपलब्ध होणार्या अतिरिक्त पाण्याचा उपयोग करून घ्यायला हवा.
तसेच त्यांनी यावेळी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन मी यवतमाळ जिल्ह्यात भेट दिलेल्या ग्रामपंचयतींपैकी ही सर्वात सुंदर ग्रामपंचायत आज मी पाहिली आहे. या शब्दात त्यांनी कौतुक केले व पंचायत राज अवॉर्ड व स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महादेव शेलोटे, ग्राम रोजगार सेवक सुशिल निकुरे, संगणक परिचालक शिवाजी कोलते, रविशंकर राठोड, रविभाऊ नागमोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
