सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान
तत्कालीन पारवा ठाणेदार गोरख चौधर यांनी सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरण दडपले.
ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार.
सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणी तक्रार.
तत्कालीन पारवा ठाणेदार गोरख चौधर यांचे निलंबन करा अन्यथा 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा जेष्ठ नागरिकाचा इशारा.
तत्कालीन पारवा ठाणेदार गोरख चौधर यांनी गुप्तधन प्रकरण मॅनेज केले.
आरोप खोटे सिद्ध झाल्यास माझ्यावर कठोर कारवाई करा.
अशी ज्येष्ठ नागरिकांची निवेदनातून मागणी.
सावळी सदोबा ( वार्ता ):- आर्णी तालुक्यातील दातोडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात 19 मे 2021 रोजी काढण्यात आलेल्या गुप्तधन प्रकरणी तत्कालीन पारवा ठाणेदार गोरख चौधर यांनी संशयितांचे वाहन पकडल्यानंतरही केवळ कोरोना संदर्भातील गुन्हे नोंद करून या गुप्तधन प्रकरणाला वेगळीच कलाटणी दिल्याचा खळबळजनक आरोप दातोडी गावचे ज्येष्ठ , वयोवृद्ध व प्रतिष्ठित नागरिक श्री. गणपत पाटील जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केलाय.
सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणी सखोल चौकशी करावी तत्पूर्वी गोरख चौधर यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी केली आहे.
25 जानेवारीपर्यंत या गुप्तधन प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास 26 जानेवारीपासून सावळी सदोबा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही गणपत पाटील जगताप यांनी निवेदनातून दिलेला आहे.
सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणी मी केलेली तक्रार पोलिसांची दिशाभूल करणारी चौकशीअंती सिद्ध झाल्यास माझ्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी गणपत पाटील जगताप यांनी निवेदनातून केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळी सदोबा पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या दातोडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेल्या सिद्धेश्वर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
या देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणावर गुप्तधन असल्याची चर्चा ऐकावयास मिळते , या चर्चेचा फायदा घेत यवतमाळ येथील काही मंडळी दि.19 मे 2021 रोजी जेसीबी मशीन व दोन चार चाकी वाहने सिद्धेश्वर मंदिर परिसरात गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने आले होते.
तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांनी अवैधपणे खोदकाम करतांना काही मंडळींना पकडले, त्यांच्या वाहनांची तपासणी केल्यावर त्या वाहनातून पूजेचे साहित्य जप्त करण्यात आले आणि नंतर गोरख चौधर यांनी मोठ्या प्रमाणात तोडपाणी करून त्या गाड्या व लोकांना सोडून दिले.
अटक केलेल्या लोकावर गुप्तधन प्रकरणाचा व वाहनातून जप्त करण्यात आलेल्या पूजेच्या साहित्यावरून जादूटोणा संदर्भातील कोणताही गुन्हा न नोंदविता केवळ कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवून जेसीबी मशीन व दोन चार चाकी वाहनातील सहा सात लोकांना सोडून देण्यात आले.
सिद्धेश्वर मंदिर परिसरात खोदकाम करणारी जेसीपी मशीन पकडले जाते तसेच सिद्धेश्वर मंदिराच्या ट्रस्टींची साधी तक्रार न घेता व त्यांचे बयान न घेता मशीन व इतर वाहने सोडून दिल्या जाते.
या प्रकरणात निश्चितपणे काही तरी गोडबंगाल असल्याचा आरोप दातोडी गावचे ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक गणपत पाटील जगताप यांनी केला आहे.
पारवा पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर.पी.ताले यांची तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांनी जबानी तक्रार नोंदवून घेतली हि बनावट तक्रार गोरख चौधर यांनीच आर.पी. ताले यांना करायला लावल्याचाही गंभीर आरोप गणपत पाटील जगताप यांनी केला आहे.
सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणाची चौकशी 25 जानेवारीपर्यंत योग्य प्रकारे न झाल्यास दि. 26 जानेवारी ला सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही गणपत पाटील जगताप यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे.
जर ही मी केलेली तक्रार खोटी आढळल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी माझ्यावरही कठोरातील कठोर कारवाई करावी अशी विनंती गणपत पाटील जगताप यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली आहे.
