नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्याचे नियोजन करावे
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना
दर दिवशी प्रत्येक लसिकरण केंद्रामार्फत किमान एक हजार लसीकरण करावे
मोबाईल व्हॅक्सीनेशन व्हॅनद्वारे दिव्यांग तसेच आजारी नागरिकांचे लसिकरण
डेंग्यु आजार पसरू नये यासाठी नगरपालिका व ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीम
शासकीय रुग्णालयातच प्रसुती व्हावी यासाठी आवश्यक सोयी सुविधांची पुर्तता
स्रीरोगतज्ज्ञ यांनीच गरोदर महिलांची तपासणी करावी यावर बाबीवर बारकाईने लक्ष
यवतमाळ दि. 22 सप्टेंबर : येत्या दोन ते तीन महिन्यात जिल्ह्यात 100 टक्के कोरोना लसिकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेली गावे केंद्रित करून तेथे संपुर्ण लसीकरण करावे. ग्रामीण भागात दर दिवशी प्रत्येक लसिकरण केंद्रामार्फत किमान एक हजार लसीकरण करावे तसेच नगरपालीका क्षेत्रात पुढील महिनाभरात 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे यासाठी नियोजनपुर्वक कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा व तालुका टास्क फोर्स यंत्रणेला दिल्या.
जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटीच्या नियामक मंडळाची सभा आज नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की, यापुर्वी प्रत्येक तालुक्याला लोकसंख्यानिहाय लस उपलब्ध करून देण्यात येत होती, मात्र आता झालेल्या वापरानुसार लस साठा पुरविण्यात येणार आहे त्यामुळे लसीच्या वापरावर लससाठा प्राप्त होईल.
मोबाईल व्हॅक्सीनेशन व्हॅन तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली असून याद्वारे लसीकरणासाठी केंद्रावर येऊ न शकणाऱ्या दिव्यांग आणि आजारी लोकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करावे. आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस मोबाईल व्हॅनचा प्राधाण्याने वापर करावा. जिल्हास्तरावर लसीकरणाचा आढावा घेऊन मागे असलेल्या तीन तालुक्याच्या टास्क फोर्सला याबाबत समज देण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात डेंग्यु आजार पसरू नये यासाठी नगरपालिका व ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू करावी, यात नागरिकांना देखील सहभागी करून घ्यावे. या मोहिमेत डासाची उत्पत्तीची ठीकाणे नष्ट करणे, शौचालाय टाकीच्या पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरी वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, कोरडा दिवस पाळणे आदि आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. ही स्वच्छता मोहीम उद्यापासूनच 2 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यभर राबवली गेली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांना प्रसुतीकरिता खाजगी दवाखण्यात खर्च पडू नये यासाठी प्रसुतीची सर्व कामे शासकीय दवाखान्यामध्येच करण्यात यावी, याकरिता आवश्यक सोयी सुविधांची पुर्तता प्रशासनातर्फे करण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा लाभ वेळच्या वेळी गरोदर मातांना देण्यात यावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
स्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ असलेल्या केंद्रात व रुग्णालयात संबंधीत रुग्णांची तपासणी त्यांनीच केली पाहिजे, याबाबीवर बाबीवर बारकाईने लक्ष देण्यात यावे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना, निती आयोग निर्देशांक, गरोदर माता नोंदणी, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, सिकलसेल योजना, गुणवत्ता नियमन कार्यक्रम, पायाभुत सुविधा विकास कक्ष, मोबाईल मेडीकल युनीट, अंधत्व निवारण कार्यक्रम, कुटूंब शस्त्रक्रिया नियोजन आदिबाबत आढावा घेतला व त्याअनुषंगाने आवश्यक निर्देश व सूचना दिल्या.
बैठकीला आरोग्य विभागाचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालीकेच मुख्याधिकारी, तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसिलदार व तालुका टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
