जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक
जिल्हा क्रीडा संकुल समिती पुनर्रचनेस मान्यता
यवतमाळ , दि 30 ऑगस्ट (जिमाका) :- जिल्ह्यात क्रीडा विकासातंर्गत शासनाच्यावतीने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. या पायाभूत सुविधा खेळाडूंसाठी कायमस्वरूपी उत्तम स्थितीत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या देखभाल दुरुस्तीला लागणारा खर्च भागविण्यासाठी क्रिडा विभागाने केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वतःचे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याच्या सूचना राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिल्यात.
जिल्हा क्रीडा संकुल समितीची सभा पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे घेण्यात आली. यावेळी त्यांनी सदर सूचना दिल्यात. या बैठकीला आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद कचरे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार प्रमुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांनी सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करण्याचा ठरावास आज मान्यता दिली. या समितीमध्ये आमंत्रित सदस्य म्हणून देशी खेळाच्या मान्यताप्राप्त जिल्हा क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून यवतमाळ जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रदीप वानखडे व यवतमाळ जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव व विदर्भ राज्य खो-खो संघटनेचे सदस्य डॉ.प्रा. विकास टोणे, शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते खेळाडू म्हणून डॉ. प्रकाश नांदुरकर व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आकाश चिकटे या सदस्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
जिल्हा क्रीडा संकुल समिती अंतर्गत असलेल्या समता मैदान येथील गाळ्यांचे 29 लक्ष 76 हजार रुपये थकीत भाडे वसूल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाडे न भरणाऱ्या गाळा धारकांना तीनदा नोटीस पाठवून भाडे वसूल करावे, भाडे न देणाऱ्या गाळा धारकांकडून गाळे रिक्त करून घेण्याच्या सूचना समितीने दिल्यात. जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम तात्काळ करून घ्यावे तसेच येथे येणाऱ्या खेळाडूंना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचना समिती अध्यक्षांनी यावेळी दिल्यात.
या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल जवळ भांडारगृहचे बांधकाम, पडलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम व उंची वाढविणे, जलतरण तलावाची दुरुस्ती, अत्याधुनिक व्यायामशाळा, एरोबिक सेंटर सुरू करणे, तसेच खुल्या जागेवर व्यापारी गाळे काढणे आदी प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. जलतरण तलावाचे कंत्राट दिलेल्या एजन्सीकडून तलावाची डागडुजी करून घेण्याबाबत निर्देश दिलेत. तसेच संरक्षक भिंतिची उंची वाढविण्यास आणि बांधकाम करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.
जिल्ह्यात 16 तालुक्यांपैकी 6 तालुक्यात तालुका क्रीडा संकुल नाही. यात यवतमाळ , झरीजामणी, कळंब, मारेगाव, घाटंजी, बाभूळगाव या सहा तालुक्यात क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. लोहारा एमआयडीसी येथील जागा हॉकी खेळाच्या मैदानासाठी देण्याबाबतही त्यांनी सांगितले. आमदार मदन येरावार यांनी त्यांच्या आमदार निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाकरिता दोन संगणक व इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्यात येईल असे या बैठकीत सांगितले.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रवीण कुळकर्णी, नगर परिषद मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे, वा. पु. डायरे इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान पालकमंत्री भुमरे यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे भेट देऊन सिंथेटिक रनिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट बॅडमिंटन हॉल, फुटबॉल मैदान, स्केटिंग ग्राऊंड, मुला मुलींचे वस्तीगृहाची पाहणी केली.
______________________________________
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मग्रारोहयो मधून
रेशीम आणि फळबाग लागवडीला प्राधान्य द्यावे
– रोहयो मंत्री संदीपान भुमरे
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा घेतला आढावा
यवतमाळ , दि 30 ऑगस्ट (जिमाका):- यवतमाळ हा शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होणारा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी नगदी पीक म्हणून रेशीम शेती आणि फळबाग लागवड करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करावे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रेशीम शेती, फळबाग लागवड योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासोबतच शेतीतील सिंचन सुविधा निर्मिती करण्यावर भर द्यावा असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक केशव वागळे, जिल्हा परिषदेचे उममुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुडदे, उपजिल्हाधिकारी रोहयो संगीता राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, सिंचन विभागाचे प्रशांत कदम उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यात केवळ 250 हेक्टर क्षेत्रावर रेशीम लागवड आणि 147 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड असल्याबाबत पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. रेशीम लागवड हा नगदी पीकासाठी उत्तम पर्याय असून शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम शेती अभियान राबवून शेतकऱ्यांना एक जोडधंदा उपलब्ध करून द्यावा अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यात फळबाग लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाव आहे. फळबाग लागवड आणि रेशीम शेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ देऊन मोठ्या प्रमाणात लागवड करावी. त्याचबरोबर महोगणी वृक्षाच्या लागवडीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, यातूनही शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत मिळू शकते, असेही श्री भुमरे यांनी सांगितले.
फळबागांसाठी सिंचन सुविधांची आवश्यकता लक्षात घेता या योजनेतून सिंचन सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी शेततळे, विहिरी या वैयक्तिक लाभाच्या मग्रारोहयो मधून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.
बैठकीला रोजगार हमी योजनेशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
______________________________________
गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2149 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 30 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोरोनामुक्त झाल्याची संख्या देखील निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 15 व जिल्ह्याबाहेर दोन अशी एकूण 17 आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 241 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने उर्वरित सर्व 241 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72850 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71046 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 19 हजार 768 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 46 हजार 845 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.12 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2149 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 25 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2149 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 764 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
