Home यवतमाळ ना ना करते प्यार पटोले से कर बैठे!

ना ना करते प्यार पटोले से कर बैठे!

12

 

“परमेश्वरा! आम्हाला अशी माणसे दे !आजच्या काळाची ती गरज आहे .ऊदार
हृदयाची आणि मदत करायला सिद्ध असलेल्या हातांची माणसे, अधिकाराचा मोह त्यांना खाऊन टाकत नाही अशी माणसे , अधिकारपदाच्या फायद्यासाठी विकली जात नाहीत अशी माणसे ,निश्चित मते आणि तीव्र इच्छाशक्ती आहे अशी माणसे ,आपल्या प्रतिष्ठेची ज्यांना कदर आहे अशी माणसे , खोटे बोलणार नाहीत अशी माणसे , अप्रामाणिक नेतृत्वासमोर झुकणार नाहीत अशी माणसे,त्या नेतृत्वाच्या लुच्च्या प्रशंसेला लाथाडणारी माणसे, उंच माणसे, सूर्याचा मुकुट धारण करणारी माणसे,
परमेश्वरा! आम्हाला अशी माणसे दे !आजच्या काळाची ती गरज आहे .” परमेश्वराजवळ ही प्रार्थना कोणी केली माहीत नाही पण परमेश्वराने ही प्रार्थना ऐकून नानाभाऊ पटोले नावाच्या माणसाला पृथ्वीवर पाठवले असे त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू पाहिल्यानंतर म्हटल्याशिवाय राहवत नाही.
कविवर्य रवींद्रनाथ टागोरांनी जीवनाला आनंद म्हटले आहे .आनंद घेण्यापेक्षा देण्यात असतो .देण्याने दुसऱ्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून आपल्याला जो आनंद होतो तो शब्दातीत असतो .विंदा करांनी तर दातृत्वाचे वर्णन करत असताना “देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे” अशा मधून केले आहे प्रत्यक्ष जीवनात आपण कसे वागतो हे जर पाहिले तर हे सर्व पुस्तकातच आहे की काय असे वाटते. विशेषतः राजकीय जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत तर हे सर्व पुस्तकी पोपटपंची ज्ञान वाटते ,मात्र काही अपवादही त्या गोष्टीला असतात.ना ना करते प्यार किसी से कर बैठे हे सिनेमातले गाणे होते त्यात ना ना म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता आम्ही प्रेम करुन बसलो असा आशय आहे आणि असं नानांवर प्रेम करणारे अनंत लोक आहेत. आणि त्याचे कारणही त्यांच्या ठिकाणी कट्टर राष्ट्रवाद नाही ,धर्मवाद नाही ,जातीवाद नाही जे आहे ते आहे केवळ मानवतावाद ! मानवतावाद केवळ सांगून चालणार नाही तर तो दिसला नाही पाहिजे ,न्यायाच्या बाबतीत असे म्हणतात की न्याय करून चालणार नाही न्याय दिसला पाहिजे. तसेच प्रेम करून चालणार प्रेम करून चालणार नाही प्रेम दिसलेही पाहिजे .हे असे व्यक्तिमत्व आहे जे राजकारण आणि समाजकारणाचा याही पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनाला जवळ करणारे व्यक्तिमत्व आहे. राजकारणात आपले स्वाभिमानी व्यक्तिमत्व जोपासणारे असल्यामुळे भाजप पक्षनेतृत्वाच्या हुकूमशाही विरुद्ध बंड करण्याची हिंमत दाखवणारा
भारतातील पहिला भाजप खासदार असा आता त्यांचा लौकिक आहे . भाजप बैठकीत पंतप्रधान
नरेंद्र मोदी शेतकरी व ओबीसी विषयावर बोलू देत नाहीत याचा निषेध म्हणून त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.नंतर आमदार म्हणून निवडून आल्यावर काॅंग्रेसपक्षानेही त्यांच्या गुणांची कदर करत त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिले.विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवाला सुनावलेले खडेबोल इतिहास घडवून गेले.यवतमाळ जिल्हयात
कीटकनाशक विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून देवानंद पवार यांच्या प्रयत्नाना प्रतिसाद देत नानाभाऊंनी ट्रकभर तांदूळ यवतमाळला पाठविला होता. ऐन दिवाळीपूर्वी त्या 22 कुटुंबांना तांदूळ, किराणा व शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या.
आता नानाभाऊ पटोले हे केवळ ’ओबीसीं’चे नव्हे तर शेतकर्‍यांचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.काँग्रेसने किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देऊन नानांचा सन्मान केला. आता त्यांच्या वर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
ओबीसीची जनगणना व्हावीत, यासाठी स्वतःच विधानसभेत ठराव मांडला आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारलाही पाठविला.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र कृषी न्यायालये व्हावीत,यासाठी कृषीमंत्री व सबंधित सर्व विभागाची बैठक बोलावून राज्यघटनेत नमूद असलेल्या कलम 323 (ब)(जी) तरतुदी नुसार कृषी न्यायालय स्थापन करण्यासाठी समितीचे गठन करण्याचे निर्देश दिले.यावर कार्य सुरू आहे.
त्यांचा वाढदिवस साजरा झाला तेव्हा
देशात कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झालेली असतांना वाढदिवस गरजूंची मदत करून साजरा करावा असे आवाहन काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत किसान काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार व नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या पुढाकाराने यवतमाळ येथे
नानाभाऊ पटोलेंच्या वाढदिवसाला जिल्हा काॅग्रेस समितीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.वजाहात मिर्झा,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके,प्रदेश काँग्रेस शेतकरी सेलचे अध्यक्ष देवानंद पवार,यांनी
गरजू शेतकरी, सलुन व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. चित्रपट अभिनेते सलमान खान यांनी दिलेले सोळा
ऑक्सीजन काॅन्संट्रेटर प्राणवायूची आवश्यकता असलेल्या गरजूंना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.यावेळी
आवश्यक सामग्रीचे वाटप, अंत्यसंस्कार करणा-या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात कोरोनामुळे ज्या शेतकरी परिवारात कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटूंबाला पेरणीसाठी बियाणे वितरित करण्यात आले. तसेच लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या गरजू सलुन व्यावसायिकांना धान्यवाटप करण्यात आले.
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचे अतुल्य कार्य ज्यांनी केले त्या 23 कोरोना योद्ध्यांचा प्रत्येकी 7 हजार रूपये सन्मान राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शांती,करुणा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्ध यांच्यामुळे कधीकाळी भारताला महत्त्वप्रद प्राप्त झाले होते. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संदेशामुळे भारताला पुन्हा असेच महत्त्वपद लाभले होते .दुर्दैवाने आजच्या काळात आम्हाला गांधींचा ही विसर पडला आणि भगवान बुद्धांचा ही विसर पडला अशा काळात देशाला -राज्याला एक खंबीर नेतृत्व नियतीच उपलब्ध करून देते यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे .मानवजातीला आदर वाटावा असे गांधीजी मध्ये काय होते? हा माणूस कसा होता ? ते आपला प्रभाव कसा काय पाडू शकले ?ते नेहमी म्हणायचे मी अगदी सामान्य माणूस आहे . मनाचा विकास करायला मर्यादा असली तरी अंतःकरणाच्या विकासाला मात्र तशी कोणतीच मर्यादा नसतेअसे गांधीजी म्हणत.नानाभाऊंनी हे विचार प्रत्यक्षात आणले आहे.
गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढतांना तडजोड करायचीच नाही, अशी मनाशी खूणगाठ बांधलेला आणि तत्त्वांसाठी एका झटक्यात सत्ताधारी पक्ष आणि त्याची खासदारकीही झिडकारणारा खंबिर व सच्चा माणूस म्हणून ज्यांची अवघ्या देशाला ओळख आहे, ते विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काॅंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले… या अशा झंझावाती नेत्यांचा वाढदिवस शनिवारी साजरा करण्यात आला. नानाभाऊंचे जीवन पाहिल्यानंतर कलावंत जगाच्या रंगमंचावर किती वेगवेगळ्या भूमिका पार पाडू शकतो हे पाहिले म्हणजे त्यांचे सहकारी किंवा मित्र परिचित हे थक्क झाल्याशिवाय राहत नाहीत. नाना भाऊंचे व्यक्तिमत्व ईतके सुसंस्कृत आणि सहृदय आहे की त्यांच्याशी आपला परिचय होणे , सहवास लाभणे हीअनेकांना एक भाग्याची गोष्ट वाटते .

न. मा.जोशी
८८०५९४८९५१

Copyright ©