Home यवतमाळ जिल्ह्यात 1220 जण पॉझेटिव्ह ; 1112 कोरोनामुक्त जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह...

जिल्ह्यात 1220 जण पॉझेटिव्ह ; 1112 कोरोनामुक्त जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण 37 मृत्यु

10

 

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत 24 तासात 1220 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1112 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 37 मृत्यु झाले. यातील 32 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पाच मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. तसेच एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 6733 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1220 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5513 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 58239 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 3027 तर गृह विलगीकरणात 2802 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 44456 झाली आहे. 24 तासात 1112 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 37599 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1028 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.06 असून मृत्युदर 2.31 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 68, 52, 81, 62 वर्षीय पुरुष आणि 70, 70, 72 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष, कळंब येथील 50 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 47 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, दिग्रस 28 वर्षीय महिला, एक वर्षाचा बालक, बाभुळगाव तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 51, 60 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 40 वर्षीय महिला, राळेगाव येथील 50, 60 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 65, 65 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 53 वर्षीय महिला, आर्णि येथील 47 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 63 वर्षीय महिला, दारव्हा येथील 50 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 60 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 65 वर्षीय महिला, उमरखेड येथील 75 वर्षीय पुरुष, पुसद येथील 81 वर्षीय पुरुष, भद्रावती येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 41 वर्षीय पुरुष, पुसद येथील 45 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 35, 52, 58 वर्षीय पुरुष आहे.

गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1220 जणांमध्ये 677 पुरुष आणि 543 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 273 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 222, पांढरकवडा 155, वणी 126, मारेगाव 72, दारव्हा 66, पुसद 65, दिग्रस 59, नेर 41, घाटंजी 30, झरी 23, महागाव 21, आर्णि 21, बाभुळगाव 16, कळंब 15, राळेगाव 8 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 368480 नमुने पाठविले असून यापैकी 364533 प्राप्त तर 3947 अप्राप्त आहेत. तसेच 320057 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 0 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 171 रुग्णांसाठी उपयोगात, 69 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 31 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2383 बेडपैकी 1648 उपयोगात, 736 शिल्लक आणि 23 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 789 बेडपैकी 594 उपयोगात तर 195 बेड शिल्लक आहेत.

अफवा पसरविणा-या मॅसेजवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या नावाने फेक मॅसेज ग्रुपवर व्हायरल होत आहे. सदर मॅसेजचा जिल्हा प्रशासनाशी काहीही संबंध नाही. सदर मॅसेज पूर्णपणे चुकीचा व अफवा पसरविणारा असून अशा कोणत्याही सुचना जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्याकडून देण्यात आल्या नाही. शासन आणि प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणा-या मार्गदर्शक सुचना नागरिकांपर्यंत अधिकृतरित्या प्रसारमाध्यमांद्वारे पोहचविण्यात येतात, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

त्यामुळे फेक मॅसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

०००००००

 

संरचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यासाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना

Ø 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून अंमलबजावणी

यवतमाळ, दि. 22 : ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्ह्यात दिनांक 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच 14 एप्रिल 2021 च्या आदेशामध्ये खालील मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येत आहेत व सदर मार्गदर्शक सूचना दिनांक 22 एप्रिल च्या रात्री 8 वाजेपासून ते दिनांक 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.

कार्यालयीन उपस्थिती : सर्व शासकीय कार्यालये (राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था) 15 टक्के उपस्थितीसह (कोविड -19 च्या व्यवस्थापनाशी संबंधित असलेली अत्यावश्यक सेवा उदा. पोलिस विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, महावितरण ई. वगळून) सुरु राहतील. 15 टक्के पेक्षा जास्त क्षमतेने कार्यालयात उपस्थिती ठेवायची असल्यास संबंधित कार्यालयाने त्याबाबतची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी. 14 एप्रिलच्या आदेशात नमूद केलेल्या कार्यालयांना त्यांच्या एकूण मंजूर क्षमतेच्या 15 टक्के‍ किंवा 5 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढ्या संख्येने कार्यालय कार्यरत ठेवावे. अत्यावश्यक सेवा 50 टक्के क्षमतेने चालविण्यात याव्यात. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींची संख्या आवश्यकतेनुसार 100 टक्के पर्यंत ठेवता येईल.

लग्न सोहळा : लग्न सोहळ्याकरीता फक्त 25 लोकांची उपस्थिती ठेवता येईल. लग्न सोहळ्याचा कार्यक्रम एका हॉलमध्ये एकावेळी एकच लग्न सोहळा पार पाडावा लागेल. त्याकरीता 2 तासाच्या वर परवानगी राहणार नाही. सदर बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधितावर स्थानिक प्रशासनाकडून 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच ज्या हॉल, मंगल कार्यालय किंवा हॉटेल द्वारे सदर लग्न समारंभ पार पाडतांना वरील अटीचा भंग केल्यास तसे ठिकाण कोविड – 19 च्या आजाराची अधिसूचना असेपर्यंत बंद करण्यात येईल.

खाजगी प्रवासी वाहतूक : खाजगी प्रवासी वाहतूक फक्त आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणांकरीता चालक व एकूण बैठक व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा राहील. सदर वाहतूक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात करता येणार नाही. परंतू अशी वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील अती आजारी व्यक्तींना भेटण्यासाठी करता येईल. ह्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर स्थानिक प्रशासनाकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल.

खाजगी बसेस आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. कोणताही प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाही. खाजगी बसने एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून खालील अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने एका शहरात दोन पेक्षा जास्त थांबे घेता येणार नाही. हे थांबे प्राधिकरणाकडून मान्य करून घ्यावे लागतील. त्यांनी जर थांबे बदलायला सांगितले तर ते बदलावे लागतील. बसमधून उतरल्यावर बस ऑपरेटरने प्रत्येक थांब्यावर प्रवाशांच्या हातावर 14 दिवसाचा गृह विलगिकरणाचा शिक्का मारणे बंधनकारक राहील. प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक राहील. जर एखाद्या प्रवाश्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने लक्षणे आढळल्यास त्यास कोरोना केंद्रात किंवा जवळच्या दवाखान्यात भरती करण्यात यावे.

प्रवासी उतरणाऱ्या ठिकाणी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रॅपीड ॲन्टीजन टेस्ट चाचणी करण्याकरीता अधिकृत वैद्यकीय चमूची नेमणूक करण्यात यावी. तपासणीचा खर्च बस ऑपरेटर कडून वसूल करण्यात येईल. ह्या नियमांचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्राधिकरणाकडून 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा केल्यास सदर बसचा परवाना कोविड – 19 च्या आजाराची अधिसूचना अंमलात असेपर्यंत रद्द करण्यात येईल.

सार्वजनिक प्रवास वाहतूक : एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात सार्वजनिक बसने प्रवास करतांना खालील अटींचे पालन करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसने प्रवास करणाऱ्या प्रवासांचे थर्मल स्कॅनिंग बाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास नियमितपणे सादर करणे बंधनकारक राहील. बसमधून उतरण्यापूर्वी प्रवाशांच्या हातावर 14 दिवसाचा गृह विलगीकरणाचा शिक्का मारणे बंधनकारक राहील. तसेच प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक राहील. जर एखाद्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने लक्षणे आढळल्यास त्यास कोरोना केंद्रात किंवा नजीकच्या दवाखान्यात भरती करण्यात यावे.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिनांक 14 एप्रिल व दिनांक 20 एप्रिल 2021 चे आदेशान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना ह्या पुर्वीप्रमाणेच कायम राहतील. वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

 

बाल विवाह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Ø तहसीलदार व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने रोखला गेला बालविवाह

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात संचारबंदी लागू असून शासनातर्फे विवाहासाठी मर्यादित लोकांची अट घालण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात लगीन घाई दिसून येत आहे. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने अनेक बालविवाहाचे घाट उधळून लावण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने एप्रिल महिन्यात आठ बालविवाह रोखले.

असाच एक नियोजित बालविवाह दिनांक 17 एप्रिल 2021 मुकिंदपूर (पारडी बेडा) ता. नेर येथे बाल संरक्षण कक्षाने थांबविला होता. त्यांच्याकडून बालविवाहचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यत लग्न न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले होते. मात्र याला न जुमानता त्याच मुलीचा विवाह 20 एप्रिलला वरमंडपी घाटंजी तालुक्यात पंगडी येथे नियोजित होता. याबाबत गोपनीय माहिती घाटंजी येथील तहसीलदार तथा तालुका बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा पूजा मातोडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क केला.

लग्नमंडपी प्रशासन पोहचले असताना मोठा सभा मंडप, डीजे, रोशनाई व नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळामध्ये शेवटचे मंगलाष्टक सुरु होते. मात्र वेळी प्रशासन धडकल्याने सर्वाची तारांबळ उडाली. या सोहळ्यात कोरोना काळातही मोठी गर्दी केल्याचे तसेच बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार तहसीलदार पूजा मातोडे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमनच्या कलम 9,10, 11, भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, 269, 34, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51(b), महाराष्ट्र COVID-19 विनियमन,2020 च्या कलम 11 नुसार घाटंजी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. वधू व वधूचे आईवडील सध्यास्थितीत फरार आहे.

ही कार्यवाही घाटंजी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री. भुजाडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आकाश बुर्रेवार, तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य अरुण कांबळे, ग्रामसेवक राजाराम बोईनवार, अंगणवाडी सेविका छाया चौधरी व अर्चना आत्राम, तलाठी मुन, मोहन बागेश्वर, सरपंच यमुना मेश्राम, उपसरपंच प्रमोद कदम, कोतवाल अमोल घोडाम, आदींच्या उपस्थितीत पार पडली.

बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. 18 वर्षाखालील मुलगी व 21 वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा एक दखलपात्र गुन्हा असून यामध्ये दोन वर्षे कारावास व एक लाख दंडाची तरतूद आहे. त्यामुळे बालविवाहबाबत नागरिकांनी अतिदक्ष राहावे. तसेच बालविवाह बाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष- दगडी इमारत, टांगा चौक- यवतमाळ अथवा चाईल्ड लाइन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेद्र राजूरकर यांनी केले आहे.

Copyright ©