साखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथील प.पू.सद्गूरू प्रल्हाद महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची आज भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येऊन सांगता झाली. तत्पूर्वी साखरखेर्डा नगरीतून महाराजांच्या प्रतिमेची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. समस्त महाराष्ट्रात शिष्यसमुदाय असलेल्या येथील प पू.श्री प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेची आज १८ फेब्रुवारी रोजी सकाळी संस्थान मधून रथोत्सव मिरवणूकीने सुरुवात करण्यात आली. गुजरी चौकातून श्रीराम मंदिर मार्गाने ” रघुपती राघव राजाराम चा ” गजर करत मिरवणूक श्रींच्या मूळ निवासस्थानी पोहोचली. तेथून परत मंदिरात आली. महिलांनी सकाळीच आपापल्या घरासमोर सडासमार्जन करुन रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी महिला व पुरुषांनी भक्तिभावाने श्रींची पूजा करुन दर्शनाचा लाभ घेतला. मिरवणुकीत भजनी दिंड्याही सहभागी झाल्या होत्या. तर पालखी मिरवणूक सोहळ्यात भाजपचे प्रदेश प्रतिनिधी तथा संस्थानचे उपाध्यक्ष उल्हास देशपांडे, विश्वस्त चंद्रशेखर राजेगांवकर यांनी पालखीचे खांदेकरी होऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला. यावेळी श्रीराम नामाचा जयघोष आणि पावली खेळत महिलांनी मिरवणुकीत रंगत आणली होती. दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी सकाळी रामदास पंत आचार्य यांनी श्रींच्या जीवन चरित्रावर प्रवचन सेवा समर्पित केली. त्यानंतर गुलाल उधळीत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त श्रींच्या दाखल झाले होते. आठ दिवस चाललेल्या जनमोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रवचनकार पंकज किंबहुने, वसू भारद्वाज, रामदासपंत आचार्य, मुकुंदराव मुळे तर किर्तनकार संदीप बुवा मांडके , स. भ. व्यास अंबिकाताई लिंबेकर, प्रणवबुवा जोशी यांनी सेवा समर्पित केली. गायन सेवा भुषण महाजन, घननिळ पाटील, आत्माराम दुतोंडे, श्रीपाद निंबेकर, कृष्णन्द्र वाडीकर, नागेश अडगावकर यांनी केली. दासनवमी महोत्सव सोहळ्यात आठही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.