Home Breaking News साखरखेर्डा पोलीसांची दमदार कामगिरी : बेपत्ता मुलीचा शोध लावून एका महिलेसह दोन...

साखरखेर्डा पोलीसांची दमदार कामगिरी : बेपत्ता मुलीचा शोध लावून एका महिलेसह दोन आरोपी अटकेत

39

साखरखेर्डा पोलीसांची दमदार कामगिरी :
बेपत्ता मुलीचा शोध लावून एका महिलेसह युवक अटकेत

🔸असलम अंजुम🔸

साखरखेर्डा : ( दि.९ फेब्रुवारी) दिड महिन्यापूर्वी येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. त्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून तिला पळवून नेणाऱ्या महिलेसह एका युवकला साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. २९ डिसेंबरच्या सायंकाळी स्थानिक मातंगपूऱ्यातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीची आजी केसरबाई पारधे हिने साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली होती. सदर मुलीला नात्याने काकू असलेल्या मिराबाई पारधे हिने चिखली येथे काळी पिवळीने बोलाविले व तेथून तिला सोबत घेऊन जळगाव खान्देशला नेऊन तिचा शुभम विनोद पाटील या युवकासोबत विवाह लावून दिला. यात काकूने काही पैसे घेतल्याचेही पोलिस चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी मिराबाई पारधे हिची अधिक चौकशी केली असता सदर महिलेचे गुजरात राज्यातील अनेक व्यक्तींसोबत कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे काही मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून सदर मुलींचे इतर समाजातील गरजू मुलांसोबत लग्न लावल्याचे समजते. विशेष म्हणजे या महिलेने चार ते पाच वेळा स्वतः विवाह करून अनेक युवकांना गंडविल्याचेही पोलिसांनी सांगितले. ७ फेब्रुवारी रोजी शुभम विनोद पाटील यास जळगाव खान्देश येथून ताब्यात घेतले असता त्याने मिराबाई पारधे हिने लग्न लावून दिल्याची कबुली दिली. काल मिराबाई पारधे हिला ताब्यात घेतले असता तब्येत खराब झाल्याचा बहाना करून ती चिखली येथील खेडेकर रुग्णालयात भरती झाली होती. तेथूनच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. आज ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर शुभम विनोद पाटील याला पाच दिवसांची पोलीस कोठडीत देण्यात आले आहे.
उपरोक्त गुन्ह्याचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलिसांनी यशस्वीरित्या करुन अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आल्याने साखरखेर्डा पोलिसांच्या दमदार कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
काल संध्याकाळी पुन्हा एका युवतीने घरुन पळून जावून परस्पर एका मुलांसोबत विवाह केल्याचे प्रकरण समोर आले आहे. परंतू याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी त्या मुला- मुलीचे लग्नाचे फोटो पोलिसांना प्राप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

—- आरोपी महीला पेशन्ट बनून रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु पोलिसांच्या विनंतीवरुन तिच्या उपचाराचा खर्च न फक्त मेडिकलचे बिल घेऊन तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
—— डॉ. सुहास खेडेकर, चिखली

Copyright ©