कु. पुनम पंचाळची राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रसंघात निवड
🔸असलम अंजुम🔸
साखरखेर्डा : (दि. ४ जानेवारी) दि चिखली अर्बन विद्यानिकेतन स्कूलची विद्यार्थिनी कु.पुनम पंचाळ हिने टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत तिने २७ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळविले आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा २४ ते २७ डिसेंबर दरम्यान रांची (झारखंड) येथे टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व झारखंड टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
यापूर्वी अक्कलकोट येथे महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित २७ व्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत दि चिखली अर्बन विद्यानिकेतन स्कूलच्या मुलींच्या संघाने बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत पुनम पंचाळ, आराध्य काठोळे, सृष्टी मोहिते व भार्वी उमाळकर या खेळाडूंनी दमदार खेळ साकारत ब्राँझ पदक पटकावले होते. राज्यस्तरीय स्पर्धेत पुनम पंचाळ हिने दाखविलेल्या उत्कृष्ट कौशल्य, चिकाटी व संघभावनेच्या जोरावर तिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून ही चिखली व बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशासाठी दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचे क्रीडा शिक्षक व एन. आय. एस. प्रशिक्षक श्री. देवानंद नेमाने, कोच वैष्णवी भागवत पंचाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कु. पुनम पंचाळ व सहकारी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक देवानंद नेमाने तसेच दि चिखली अर्बन विद्यानिकेतन स्कूल परिवाराला दिले आहे. पुनमच्या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून तिच्या पुढील यशासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.