साखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या पिंपळगाव सोनारा येथील शेतकऱ्याच्या सातबाऱ्यातून तलाठ्याने चक्क विहीरच गायब केल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी (महसूल) चिखली यांच्याकडे तक्रार करुन विहिरीची नोंद घेण्यासोबतच संबंधित तलाठ्यार कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, पिंपळगाव सोनारा येथील शेतकरी प्रल्हाद बजेबा पंजरकर यांची गावाला लागून परंतु मेरा बु. मंडळातील गट नं.५९१ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतात विहीर असून यापूर्वीच्या सातबाऱ्यात त्याची नोंदही होती. परंतु आजरोजी सातबाऱ्यातून विहीर चक्क गायब झाल्याने पंजरकर हवालदिल होऊन संबंधित तलाठ्याकडे गेले. तलाठी महोदयांना शेताची स्थळपाहणी करुन विहिर असल्याची नोंद करण्याची विनंती केली. मात्र तलाठ्यांनी त्यांची अर्जव ऐकण्याऐवजी दमदाटी करत ” माझी कुठेही तक्रार करा, माझं कुणीच काही वाकडं करत नाही, ” अशी धमकी दिली. म्हणून प्रल्हाद पंजरकर ह्यांनी दि. ४ डिसेंबर रोजी तहसीलदार, चिखली यांच्याकडे विस्तृत अशी तक्रार केली. तक्रार करुन जवळपास दोन आठवडे उलटूनही कार्यवाही मात्र शुन्य झाल्याने पंजरकर यांनी हवालदिल होऊन दि. २२ डिसेंबर रोजी उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे तक्रार करत दाद मागितली असून त्यांच्या सातबाऱ्यात विहिरीची नोंद करुन संबंधित ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) यांनी कोणत्या अधिकाराचा वापर करुन सातबारा उताऱ्यातून विहीर कमी केली याची चौकशी करुन त्यांचेवर नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.