Home Breaking News श्री संताजी महाराज नगरधील रोडसाठी रस्त्यावर तोरण लावून अनोखे आंदोलन

श्री संताजी महाराज नगरधील रोडसाठी रस्त्यावर तोरण लावून अनोखे आंदोलन

31

श्री संताजी महाराज नगरधील रोडसाठी रस्त्यावर तोरण लावून अनोखे आंदोलन

साखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथील श्री संताजी महाराज नगर मधील तसेच ऐतिहासिक दगडी मशिद ते पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता तात्काळ करण्यात यावा या मागणीसाठी श्री संताजी नगर मधील नागरिकांनी रस्त्यावर फुलांचे तोरण लावून अनोखे आंदोलन केले.
मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा गावाची लोकसंख्या २५ ते ३० हजाराचे जवळपास असून, अध्यात्मिक व ऐतिहासिक अशी गावाची ओळख आहे. गावामध्ये गल्ली-बोळात सिमेंट रस्ते झाले. मात्र व्यावहारिकदृष्ट्या अत्यन्त महत्वाचा नि दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला दगडी मशिद ते पोलीस स्टेशन हा मुख्य मार्गावरील रस्ता ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. मुख्य बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, पलसिद्ध मठ, पपु. प्रल्हाद महाराज मंदीर, कन्या शाळा आणि पोलीस स्टेशनला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. विशेष म्हणजे याच मुख्य चौकात श्री गणेश सार्वजनिक मिरवणूक , श्री दुर्गा देवी मिरवणूक, शिवजयंती मिरवणूक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मिरवणूक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मिरवणूक यासह इतर धार्मिक दिंड्या तसेच मुस्लिम समाजाची मोहर्रम मिरवणूक, ईद – मिलाद मिरवणूक आणि संदल इत्यादी धार्मिक मिरवणूका याच मुख्य चौकातून निघतात अथवा मार्गक्रमण करतात. एवढे असूनही हा रस्ता बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित आहे.
आता स्थानिक नागरिक तथा व्यापाऱ्यांच्या सहननशिलतेचा अंत झाला असून परिसरातील राहिवाशांनी एकत्रित येऊन रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. २१ डिसेंबर रोजी रस्त्याला फुलांचे तोरण लावून अनोखे आंदोलन केले आहे. लवकर दखल न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी नागरीकांनी दिला. या आंदोलनामध्ये गजानन इंगळे, गोपाल मानतकर, विजय इंगळे, गोपाल शीलवंत, सोमेश इंगळे, गणेश जैताळकर , सुनील जैन, सुधीर इंगळे, गौरव पऱ्हाड यांचेसह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.

Copyright ©