Home Breaking News अंगणवाडी परिसर स्वच्छ करण्याऐवजी अंगणवाडीचेच स्थलांतर : लहान चिमुकले पोषण आहारापासून वंचीत

अंगणवाडी परिसर स्वच्छ करण्याऐवजी अंगणवाडीचेच स्थलांतर : लहान चिमुकले पोषण आहारापासून वंचीत

32

अंगणवाडी परिसर स्वच्छ करण्याऐवजी अंगणवाडीचेच स्थलांतर : लहान चिमुकले पोषण आहारापासून वंचीत

साखरखेर्डा : (असलम अंजुम) येथील वॉर्ड क्र.१ मधील अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्या परिसराची स्वच्छता करण्याऐवजी चक्क अंगणवाडीचेच स्थलांतर करण्यात आले आहे. परिणामी अंगणवाडीचे अंतर लांब होत असल्याने बहुतांश चिमुकले पोषण आहारापासून वंचीत राहत आहेत.
याबाबतची विस्तृत माहिती अशी की, येथे १४ अंगणवाड्या असून त्यात मुले २६७ व मुली २५४ अशी एकूण ५२१ लाभार्थी संख्या आहे. वॉर्ड क्र. १ मध्ये जि.प.उर्दू उच्च प्राथमिक शाळेला लागूनच अंगणवाडी क्र. १ असून या परिसरातच मटन-चिकन तसेच मच्छी मार्केट आहे. हा मार्केट इतरत्र हलविण्यासाठी उर्दू शाळा, पालकवर्ग तसेच शालेय व्यवस्थापन समितीकडून गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीन असून त्यांचेकडून पालकांना आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही.
या अंगणवाडीत ३ ते ६ वर्ष वयोगटातील एकूण ४१ चिमुकले लाभार्थी असून तालुका महिला व बालविकास प्रकल्प अधीकाऱ्यांनी तेथील स्वछतेचे कारण पुढे करत ही अंगणवाडी वर्षभरापासून मुलांच्या केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत स्थलांतरित केली आहे. वास्तविक पाहता या विभागाने स्थानिक ग्रामपंचायतला तो परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले असते तर ते अंगणवाडी आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांसाठी हिताचे ठरले असते.परंतु तसे न करता अंगणवाडीच दुसरीकडे हलविल्यामुळे व त्याचे अंतर लांब असल्याने चिमुकल्या लाभार्थिंची पटसंख्या रोडावली आहे परिणामी ते पोषण आहारापासून वंचीत राहत आहेत.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने शाळा आणि अंगणवाडी परिसरातील मटन-मच्छी मार्केट इतरत्र हलवावे तसेच स्वच्छता करुन अंगणवाडी पूर्वीच्याच ठिकाणी सुरु करावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांकडून करण्यात येत आहे.

Copyright ©