Home Breaking News लोककवी वामनदादा कर्डक साहित्यसंमेलन : कविसंमेलनाध्यक्षपदी अजीम नवाज राही

लोककवी वामनदादा कर्डक साहित्यसंमेलन : कविसंमेलनाध्यक्षपदी अजीम नवाज राही

51

लोककवी वामनदादा कर्डक साहित्यसंमेलन : कविसंमेलनाध्यक्षपदी अजीम नवाज राही

🔸🔸असलम अंजुम🔸🔸

साखरखेर्डा : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभागच्या सहकार्याने बुलडाणा येथील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानाच्या विद्यमाने 27 व 28 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी, गर्दे वाचनालयाच्या ऐतेहासिक सभागृहात दोन दिवसीय लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीने प्रख्यात मराठी कवी,नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांची निवड केली आहे.
प्रसिद्ध कथाकार विलास सिंदीकर साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे करणार आहेत.
निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्ष अजीम नवाज राही महाराष्ट्र राज्याच्या लेखणी आणि वाणी या दोन क्षेत्रातील महत्वाचं आणि वलयांकित नाव आहे. राज्याच्या लेखणी आणि वाणी या दोन गडांवर अजीम नवाज राही यांच्या प्रतिभेचा झेंडा आज दिमाखदारपणे फडकत आहे. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ आणि नुकताच अथर्व पब्लिकेशन्स जळगाव तर्फे प्रसिद्ध झालेला वळीवाच्या वेळा या पाच सकस, वस्तुनिष्ठ, गाजलेल्या कवितासंग्रहांचे ते धनी आहेत.
अजीम नवाज राही हे नाव नवनिर्मितेचे प्रयोगाशीलतेचे बलस्थान आहे. कुठल्याही मळक्या वाटेने न जाता स्वतःची नाममुद्रा अजीम नवाज राही यांनी वर्तमान मराठी कवितेवर ठसठशीतपणे उमटवली आहे. अजीम नवाज राही यांच्या कवितेने परिघावरचे विश्व मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. अजीम नवाज राही यांच्या कवितेतील व्यक्त होणारे दुःख सर्वसामान्यांच्या, शेतकरी, शेतमजुर, कामगारांच्या, शोषितांच्या किंबहुना अस्तित्वहीन माणसाच्या जगण्यातले आहे. एकीकडे लेखणी आणि दुसरीकडे वाणी. महाराष्ट्र राज्याच्या वाणीच्या क्षेत्रात देखील अजीम नवाज राही हे नाव एक ब्रॅण्ड झाले आहे. समारंभाच्या यशाचा पासवर्ड झाले आहे. निवेदक आणि वक्ता या नात्याने त्यांच्या अमोघ आणि रसाळ वाणीने राज्याच्या चोखंदळ श्रोत्यांच्या मनावर गारुड घातले आहे. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ या कवितासंग्रहाना आजतागायत अमेरिकेतील फाउंडेशन, भारतातील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबईचा साहित्यप्रांतातील अत्यन्त प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय लेखनाचा कवी केशवसुत पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तीबोध, नारायण सुर्वे पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार, शरद पवार ग्रंथ पुरस्कार, नाशिक कुसुमाग्रज पुरस्कार, लोकमत समूहाचा लोकमत साहित्य पुरस्कार, कोपरगाव शिर्डी भि ग रोहमारे पुरस्कार, शिवसेना नवरत्न पुरस्कार, ना घ देशपांडे पुरस्कार, मराठा सेवा संघ जिजाऊ साहित्यरत्न पुरस्कार, शिक्षण महर्षी तात्याराव मोरे पुरस्कार,मराठवाडा साहित्य परिषद कुसुमताई देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे भा रा तांबे पुरस्कार , कविवर्य देवानंद गोरडे पुरस्कार, दाते प्रतिष्ठान वर्धा संत भगवान बाबा,नरसी नामदेव संत नामदेव साहित्य पुरस्कार,संत रोहिदास पुरस्कार इत्यादी मातब्बर पुरस्कार मिळाले आहेत.
इयत्ता 10 वी च्या मराठी पाठ्यपुस्तकांत, इयत्ता 11 वी च्या पाठ्यपुस्तक कवितांचा समावेश,
व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ या चार कवितासंग्रहांचा महाराष्ट्राच्या अकरा विद्यापीठात एम ए, बी ए, बी कॉम, बी एस्सी च्या अभ्यासक्रमात समावेश आहे. इयत्ता 10 वी, 11 वी ते महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अजीम नवाज राही यांच्या कवितांचा समावेश बुलडाणा जिल्हावासियांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

Copyright ©