गेल्या 24 तासात सहा पॉझिटिव्ह ; 70 कोरोनामुक्त
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1747 बेड उपलब्ध
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 104
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी, : गेल्या 24 तासात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 98 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 104 झाली आहे. त्यातील 12 रूग्ण रूग्णालयात तर 92 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 895 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 889 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79017 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77111 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1802 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या सहा रूग्णांमध्ये 3 महिला व 3 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील एक, महागाव एक, नेर दोन, उमरखेड एक व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 37 हजार 468 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 58 हजार 415 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.44 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.67 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1747 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1747 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 768 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जन आरोग्य योजने अंतर्गत वर्षभरात 46 कोटी विमा रक्कम अदा
आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जनआरोग्य तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना
रुग्णांना ठरतेय आधार
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी, : यवतमाळ जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 21 नोव्हेंबर 2013 पासून तर आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 पासून कार्यान्वीत झाली आहे. या योजनेअंतर्गत 01 जानेवारी 2021 पासून आतापर्यंत एकूण 12 हजार 115 लाभार्थीनी योजनेचा लाभ घेतला असून 46 कोटी 29 लाख 48 हजार 567 विमा रक्कम अदा करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 24 रूग्णालये संलग्नीकृत असून यामध्ये 5 शासकीय व 19 खाजगी रूग्णालये समाविष्ट आहेत. ही योजना गरिब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटूंबांना उपचारासाठी राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठी केसरी, पिवळे, अत्योदय, अन्नपुर्णा तसेच पांढरे शिधापत्रिका धारक शेतकरी कुटूंब पात्र असून योजनेचा लाभ घेण्यासाठी संलग्नीत रूग्णालयामध्ये आरोग्यमित्राशी सपंर्क साधावा अशी माहिती आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र इरपनवार यांनी दिली आहे
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 971 व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 1300 वेगवेगळ्या दुर्धर आजारावर औषधोपचार व शस्त्रकिया केल्या जात आहे. बदलत्या जिवनशैलीने दिवसागनीक आजाराचे प्रमाण वाढत आहे. परंतू सर्वसामान्य नागरिकांना शस्त्रकिया व औषधोपचारावर होणारा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने केंद्र सरकारची आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रूग्णांना नवसंजीवनी ठरत आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
पारधी ग्रामसाथी व समन्वयक पदासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी, : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांचेमार्फत पारधी बेड्यावर विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी पारधी ग्रामसाथी व समन्वयकाची नेमणूक करणे ही योजना राबविण्यात येत आहे. ही नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात राहणार असून यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. उपरोक्त पदांसाठी अर्जदार हा पारधी समाजाचा सुशिक्षीत बेरोजगार असावा. पारधी ग्रामसाथी पदासाठी किमान दहावी पास तर पारधी समन्वयक पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 07235-227436 या दूरध्वनीवर संपर्क करावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी, आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
नेहरु युवा केन्द्राद्वारे युवकांना मार्गदर्शन
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी, नेहरु युवा केन्द्र युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार तसेच बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर सभागृह यवतमाळ येथे युवकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ सर्फराज सौदागर, जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण पथक जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रिती दास, पिसीपिएनडीटी लिगल अॅडव्हायझर अॅड. पुनम महात्मे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. वैशाली मेश्राम, प्रा. सचिन जयस्वाल, नेहरु युवा केन्द्राचे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत अनिल ढेंगे यांनी उपस्थित युवकांना नेहरु युवा केन्द्रा बाबत तसेच आत्मनिर्भर भारत या बाबतची सविस्तर माहिती दिली. तर सर्फराज सौदागर यांनी मानसिक तानतनाव या बाबत उपस्थित युवकांना सखोल मार्गदर्शन केले. अॅड. पुनम महात्मे यांनी बेटी बचाव या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. प्रिती दास यांनी एच.आय.व्ही./एडस् या विषयावर प्रश्नोउत्तराच्या माध्यमाने मार्गदर्शन केले. प्रा. सचिन जयस्वाल व प्रा. वैशाली मेश्राम यांनी यांनी राष्ट्रीय सेवा योजनांच्या युवकांना विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन अजय मांडवकर व आभार प्रदर्शन गौरव जाधव यांनी केले.
12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत
Ø भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी, यवतमाळ जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये दिनांक 12 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र न्यायालयीन प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे.
तरी संबधीत पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक 12 मार्च 2022 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा. पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील इतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.प्र.पाटकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.आर.ए. शेख यांनी केले आहे.
कृषी विज्ञान केंद्रात एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न
यवतमाळ दि. 20 फेब्रुवारी, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ यांचे द्वारे नुकतेच कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश उ. नेमाडे, जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, डॉ. अशितोष लाटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामधे मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कापूस पिक लागवड विषयी तसेच खत व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविकेत डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी एक दिवशीय शेतकरी प्रशिक्षणाचे महत्त्व व उद्देश या प्रंसगी विषद केले.
डॉ. एन. डी. पार्लावार यांनी उत्पादन वाढीसाठी पिकाची फेरपालट व जमिनीचा दिवसेंदिवस कमी होणारा सेंद्रिय कर्ब कसा नियंत्रित करता येईल या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तर डॉ. विजय माने यांनी पिकाच्या उत्पादनानंतर प्रक्रिया उद्योग निर्मिती या विषयी सखोल चर्चा केली. डॉ. प्रमोद यादगीरवार यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.
कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अशितोष लाटकर यांनी माती परीक्षा आधारित खत व्यवस्थापन या विषयी संवाद साधला.
या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मयूर ढोले, डॉ. एस. एस. वाणे, गजेंद्र चवळे, नंदकिशोर डेहनकर, सुमित काळे उपस्थित होते.
-आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे
फोटो 2 officr– जिल्हा माहिती कार्यालय येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना गजानन जाधव, वासु भुटाणी, सचिन उईके, नरेंद्र गावंडे



