गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त
यवतमाळ दि. 16 डिसेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 21 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 24 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 558 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 557 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये इतर शहरातील एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72968 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71156 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 72 हजार 810 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 99 हजार 739 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.45 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.16 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1765 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1765 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 783 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
_______________________________
आयटीआय मध्ये 21 डिसेंबर रोजी रोजगार भरती मेळावा
यवतमाळ दि. 16 डिसेंबर : शासकीय आयटीआय येथे दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता सुझुकी मोटर गुजरात या कंपनी करीता फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, विजतंत्री, ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर जनरल, सी ओ ई ऑटोमोबाईल आणि टूल अँड डाय मेकर इत्यादी व्यवसायासाठी अठरा ते तेवीस वयोगटातील प्रशिक्षणार्थीकरीता रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरती मेळावासाठी प्रशिक्षणार्थी यांनी मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. आय. टी. आय. उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारांनी सुझुकी मोटर गुजरात येथे रोजगार मिळविण्यासाठी प्राप्त झालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन अंशकालीन प्राचार्य पी. बी. भंडारे बी टी आर आय यवतमाळ यांनी केले आहे.
______________________________
नगर पंचायत निवडणूक : मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद
यवतमाळ दि. 16 डिसेंबर : नगर पंचायत मारेगाव व कळंब मधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे गावांमध्ये भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
________________________________
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कार्यशाळा संपन्न
यवतमाळ दि. 16 डिसेंबर : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व अभिषेक मेमोरियल फाउंडेशन, यवतमाळ यांच्या विद्यमाने प्रेरणा हॉल, पोलिस मुख्यालय यवतमाळ येथे जागृतीपर कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षा सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्रीमती पंधरे ह्या होत्या. तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योति कडू, स्थानिक तक्रार निवारण समिती अध्यक्षा सुप्रभा यादगिरवार, अॅड. प्रिया मेहता उपस्थित होत्या.
याप्रसंगी डॉ. सुप्रभा यादगिरवार, ज्योति कडू, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पंधरे यांनी उपस्थितांना कायद्याची माहिती दवून मार्गदर्शन केले. श्रीमती पंधरे यांनी महिला कर्मचाऱ्यांनी छळाला बळी न पडता समोर येऊन तक्रार नोंदविण्याची हिम्मत दाखवावी, सोबतच सहकाऱ्यांनी पिडीतेचे मनोबल खच्चीकरण न करता तिला सहकार्य करावे असे सांगितले. अधिकारी/ कर्मचारी यांच्या प्रश्नांची उत्तरेही मार्गदर्शकांनी दिली व दुतर्फी संवादातून त्यांचे मनोबल वाढविले.
सदर कार्यशाळेचे सुत्रसंचालन संरक्षण अधिकारी रुपाली पांडे यांनी केले. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सोनाली पाटील, केंद्र प्रशासक, वन स्टॉप सेंटर व ॲङ राजश्री ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
________________________________
कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानांचा प्रसार व्हावा
– विस्तार शिक्षण संचालक डॉ. आर. एम. गाडे
21 वी शास्त्रीय सल्लागार समिती सभा संपन्न
यवतमाळ दि. 16 डिसेंबर कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ व संलग्न विभाग यांनी एकत्र येवुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी व सेंद्रिय शेतीचे जिल्ह्यामध्ये क्षेत्र वाढविण्याकरीता कार्य करावे, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या विविध तंत्रज्ञानांचा जिल्ह्यामध्ये प्रचार व प्रसार करावा असे आवाहन विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. आर.एम.गाडे यांनी केले.
21 व्या शास्त्रीय सल्लागार समितीची सभा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक तथा शास्त्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. आर. एम. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे 8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अटारी, पुणेचे संचालक डॉ. लखनसिंग, वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, तसेच ऑनलाईन माध्यमातुन शास्त्रज्ञ डॉ. राजेश टी, डॉ. तुषार प्रामुख्याने उपस्थित होते.
अटारी, पुणेचे संचालक डॉ. लखनसिंग यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीकरीता पिकांची फेरपालट करून, कृषी पुरक व्यवसाय करावे व त्याकरीता कृषी विज्ञान केंद्राने वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल याची दखल घ्यावी, अशा सुचना दिल्या. शास्त्रज्ञ डॉ. राजेश टी व डॉ. विजय माने, यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी सभेचे महत्त्व व उद्देश या विषयी माहिती देवुन कार्यालयाच्या अहवालाचे सादरीकरण व सन 2022-23 च्या कृती आराखड्याची माहिती दिली. याप्रसंगी विषय विशेषज्ञ डॉ. प्रमोद मगर, मयुर ढोले, डॉ. सुकेशणी वाणे यांनी विषयान्वये अहवालाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे संचालन मयुर ढोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. एस.एस. वाणे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी अनिल राठी, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, राजेंद्र पा. फाळके, डॉ. सुनिल रोकडे, प्रितम हस्ते, अजय मेसरे, डॉ. नंदकिशोर हिरवे, विकास गर्जे, साधनाताई सराड, आशिषकुमार सातपुते आदि उपस्थित होते.



