संपादक सदानंद जाधव
१० तारखे पासून बेपत्ता असलेल्या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत सावंगा शेत शिवारात आढळला मृतदेह
दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. ते चिरकुटा मार्गावरील रस्त्याला लागून असलेल्या एका शेतात आज मंगळवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह छिन्नवीन्न अवस्थेत आढळल्याने दिग्रस शहरासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुजा अनिल कावळे वय-२८ रा.वाई गौळ ,ता.मानोरा ही गेल्या दि.१० नोव्हेंबर पासून घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दिग्रस पोलीसात तिच्या नातेवाईकांनी केली होती. तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. अखेर दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. ते चिरकुटा मार्गे असलेल्या चव्हाण यांच्या शेतातील कापूस व तुरीच्या ओळीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांना मिळताच आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने चार ते पाच दिवसांपूर्वी पासून या ठिकाणी मृतदेह असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला. मृतदेहाजवळ मृतक महिलेची मनगटी घड्याळ पडून असल्याने ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी यवतमाळ येथून श्वान पथकास पाचारण केले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांना घटनेची माहिती दिली. यावेळी मृतकाचे नातेवाईक घटनास्थळी आले असता मृतकाची ओळख पटताच एकच टाहो फोडला. पोलिसांनी प्राथमिक पंचनामा व मृतदेहाचे शवविच्छेदन नातेवाईकांच्या समक्ष घटनास्थळी करण्यात आले. त्यानंतर जवळच असलेल्या सावंगा बु. येथील हिंदू स्मशानभूमीत महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर महिलेचा विवाह हा अंदाजे ९ वर्षांपूर्वी झाला होता. त्यामध्ये तिला एक मुलगा असून पती व त्या महिलेचे पटत नसल्याने याबाबत पोलीसात तक्रार सुद्धा झाली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दि.९ नोव्हेंबर रोजी ती न्यायालयाची तारीख सुद्धा करून आल्याचे कळते. त्यानंतर दि.१० नोव्हेंबर रोजी पुण्याला जाण्याचे सांगून सायंकाळी घरातून दिग्रस येथे आली होती. तेव्हा पासून ती बेपत्ता होती.
या प्रकरणी एका संशयित युवकाला दिग्रस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. वृत्त लिहिस्तोर बहिणीचा खून झाला असल्याची तक्रार मृतकेचा भाऊ प्रेशीत वानखडे हे दिग्रस पोलीसात तक्रात देत होते. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, उपनिरीक्षक विजय रत्नपारखी, नरेंद्र मानकर,गोपनीय शाखेचे सचिन राऊत, कुणाल रुडे, रवींद्र जगताप,ब्रम्हानंद टाले,अनिल गाडे यांच्यासह दिग्रस पोलीस करत आहेत.



