Home Breaking News गेल्या 24 तासात सहा पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात सहा पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

10

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2152 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 25 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1134 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1128 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72838 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71038 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दिग्रस येथील पाच व उमरखेड येथील एका रुग्णाचा समावेश असून त्यात चार महिला व दोन पुरूष आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 15 हजार 543 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 42 हजार 660 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.18 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.53 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2152 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 22 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2152 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 21 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 766 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 754 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज नोंदणी सुरू

प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके, कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या घटकासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि. 25 ऑगस्ट : सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत अन्नधान्य, पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क करून १० हे. क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी दि. ३० ऑगस्ट २०२१ ते दि.१० सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत हरभरा कडधान्य व पोष्टिक तृणधान्य या पिकांचा यवतमाळ जिल्ह्यांमध्ये समावेष आहे. बियाण्यासाठी एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

पीक प्रात्यक्षिके –

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/- प्रती एकर मर्यादेत डिबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

______________________________________

बँकांनी पीक कर्ज वाटपाचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावे

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ दि. 25 ऑगस्ट : शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज दिल्यावर कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त चार ते पाच दिवसात प्रकरण निकाली काढण्यात यावे, शेतकऱ्यांना वारंवार बँकेत बोलावू नये, तसेच सध्या प्रलंबित असलेली पीक कर्ज वाटपाची प्रकरणे गरजेनुसार शनिवार व रविवारी जादा वेळ कामे करून तातडीने निकाली काढावी व पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बँकर्सना दिल्या.

खरीप पीक कर्ज वाटपातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा व महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांनी आज नियोजन भवन येथे घेतली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Copyright ©