जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 24 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात आठ व जिल्ह्याबाहेर एक अशी एकूण नऊ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 545 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 545 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72832 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71036 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 14 हजार 806 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 41 हजार 527 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.19 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2162 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 754 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________________________
सण उत्सवानिमित्त सामाजिक कार्यातून सकारात्मक ऊर्जा व ऐक्य वाढवावे
जिल्हाधिकारी यांचे जिल्हा शांतता समिती सभेत आवाहन
गर्दी टाळण्यासाठी फेसबुक लाईव्ह व इतर ऑनलाईन समाजमाध्यमांचा वापर करा
मंडळांमार्फत रक्तदान शिबीर, कोविड लसिकरण कॅम्पचे आयोजन करावे
यवतमाळ दि. 24 ऑगस्ट : जिल्ह्यात शांतता कायम राखण्यासाठी येणाऱ्या जन्माष्टमी, पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव व इतर सर्व सण गर्दी न करता शासनाच्या सूचनेनुसार साधेपणाने साजरे करण्यात यावे. या सणानिमित्त गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांमार्फत रक्तदान शिबीर, कोविड लसिकरण कॅम्पचे आयोजन, शेतकऱ्यांना व कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मदत, विद्यार्थ्यांना ग्रंथवाटप व नागरिकांमध्ये कोविड त्रिसुत्रीचे पालनाबाबत जनजागृती आदि सामाजिक उपक्रमांचे आयोजनातून सकात्मक ऊर्जा निर्माण करावी. विविध धर्माच्या लोकांमध्ये सौहार्दभाव वृद्धींगत करून सामाजिक ऐक्य वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.
जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा नियोजन सभागृह येथे आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. सभेला आमदार नामदेव ससाने, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोविड अजून संपलेला नाही, इतर देशात कोरोनाची तीसरी लाट येवून गेलेली आहे, त्यामुळे आपल्याकडेही तीसरी लाट येईल हे गृहीत धरून उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोर पालन केल्यास तीसरी लाट पुढे ढकलता येईल व लसिकरणाच्या माध्यमातून त्याची तिव्रता कमी करता येईल. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सण उत्सव साधेपणाने साजरे करावे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भुजबळ यांनी जिल्ह्याच्या विविध भागातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृद्धींगत करण्यासाठी व हिंसाचार टाळण्यासाठी 5 सप्टेंबर पर्यंत सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी आरती व इतर आराधनेचे कार्यक्रम फेसबुक लाईव्ह व इतर समाजमाध्यमाद्वारे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहचवावे. यामुळे निश्चितच गर्दी कमी होऊन कोविडचा फैलाव होणार नाही, असे सांगितले. शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची उंची 4 फुट व घरगुती गणेशमुर्ती 2 फुट मर्यादेत असून मिरवणुकीस बंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार ससाने यांनी उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी शहरात जागा निश्चित करून देण्याची मागणी केली.
यावेळी सर्वश्री डॉ. प्रेम हनमते, भिमराव कांबळे, ॲड. जयसिंह चव्हाण, प्रा. संजय चव्हाण, बिपीन चिद्दरवार, ॲड. बी.जी.देशपांडे, प्राचार्य ना.म.जावळकर, सौ. निलिमा काळे, फिरोज सलीम, डॉ. प्रदिप नैताम, प्रा. विनीत माहुरे तसेच नेर, पुसद, दारव्हा, वणी, आर्णी, दिग्रस, यवतमाळ व जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शांतता समितीच्या सदस्यांनी सामाजिक एकोपा व शांतता कायम राखण्यासाठी प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था तसेच विविध विकासात्मक बाबीवर सूचना मांडल्या.
बैठकीला जिल्ह्याच्या विविध भागातील जिल्हा शांतता समितीचे सदस्य व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
______________________________________
पालक गमावलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या सूचना
यवतमाळ दि. 24 ऑगस्ट : कोविडमुळे निराधार झालेल्या 397 बालकांसोबतच कोविड व्यरिरिक्त अनाथ व निराधार झालेल्या इतर 14 हजार 466 बालकांना देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ देवून शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावे व त्यांना आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र, नॅशनलीटी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रीमीलेअर, आधार, राशनकाई इत्यादी विविध कागदपत्रे मिशनमोडवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हा कृती दलाला दिल्या.
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा शल्यचिकित्सक तरंगतुषार वारे, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, चाईल्ड लाईनचे दिलीप दाभोडकर, इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना पतीचे नावे असलेली घर, शेत-जमीन व इतर स्थावर मालमत्ता हस्तांतरीत करण्यासाठी कायदेविषयक विधी सल्ला गरजेप्रमाणे उपलब्ध करून द्यावा तसेच 18 वर्षावरील बालकांना कौशल्य विकासच्या योजनामधून विविध प्रशिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालक, कोविडमुळे विधवा झालेल्या महिला, कोविड व्यतिरिक्त अनाथ व निराधार झालेले बालक तसेच कुमारी माता यांच्या प्रकरणांचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्यक दिशानिर्देश दिले.
बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरीया, साथरोग अधिकारी डॉ. पी.ए.शेख, नगरपरिषद बांधकाम विभागाचे के.बी.वर्मा, बालविकास अधिकारी देवेंद्र राजुरकर तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.



