अफवांवर विश्वास न ठेवण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन
यवतमाळ दि. 20 ऑगस्ट : उमरखेड तालुक्यातील मौजा दराटी येथे दिनांक 19 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी व नाल्याला आलेल्या पुराचे पाणी घरात शिरल्याने शिवाजीनगर-2 येथील 70 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, मात्र यात कोणतेही घर वाहुन गेले नाही तसेच कोणतीही जीवीत हानी झालेली नाही असा अहवाल तहसिलदार उमरखेड यांनी दिला आहे.
पुरामुळे जनावरांचे नुकसान झालेले नाही, नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याची करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे तहसिलदार यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
समाजमाध्यमांवर यासंदर्भात दिशाभुल करणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्या वृत्तावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.
गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 20 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोरोनामुक्त झाल्याची संख्यादेखील निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सात व जिल्ह्याबाहेर एक अशी एकूण आठ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 223 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 223 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72829 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71034 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 11 हजार 970 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 39 हजार 48 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.23 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2162 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 754 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
मद्यविक्री अनुज्ञप्त्या रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
यवतमाळ दि. 20 ऑगस्ट : यवतमाळ जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या एफएल-1, एफएल-2, सिएलएफएलटिओडी-3, एफएल-बिआर-2, सिएल-3, या अनुज्ञप्त्या 17 ऑगस्ट 2021 पासून सर्व दिवशी अनुज्ञप्ती सुरू होण्याच्या विहित केलेल्या वेळेत ते रात्री 10 वाजेपर्यंत किंवा अनुज्ञप्ती बंद करण्याच्या विहित केलेल्या वेळेत जे अगोदर येईल तिथपर्यंत नियमिती व्यवहार करण्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुभा दिली आली आहे.
एएफएएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4(क्लब) अनुज्ञप्ती वरीलप्रमाणे 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
अनुज्ञप्तीधारक, कर्मचारी व येणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, हाताची स्वच्छता या कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे व कोविड प्रतिबंधात्मक नियमाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुर्वीच्या आदेशातील सुचना लागू राहतील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमाले येडगे यांनी कळविले आहे.
आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन
यवतमाळ दि. 20 ऑगस्ट : वर्ल्ड स्किल कॉम्पीटेशन-2021 चे आयोजन चीनच्या शांघाई शहरात करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत देशाच नामांकन निश्चित करण्यासाठी पुर्वतयारी म्हणून 17 ते 24 ऑग्स्ट रोजी जिल्हा व विभाग स्तरावर आणि 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी http://worldskillsindia.co.in/worldskill/world/ या लिंकवर भेट देवून नोंदणी करावी. अधिक माहितीकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ, येथे संपर्क साधावा असे संस्थेच्या प्राचार्य कविता बुटले यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा
यवतमाळ दि. 20 ऑगस्ट : जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे व निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. कार्यक्रमाचे संचालन मनिषा चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



