जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2164 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 19 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सात व जिल्ह्याबाहेर एक अशी एकूण आठ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 915 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 913 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72829 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71034 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 11 हजार 804 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 38 हजार 822 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.23 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.22 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राळेगाव येथील एक व इतर जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2164 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 10 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2164 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 778 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 754 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________________________
परदेशातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती अर्ज करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
यवतमाळ दि. 19 ऑगस्ट : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती निवडीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट 2021 अशी वाढविण्यात आली आहे.
राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे 2 जुलै ते 1 ऑगस्ट 2021 पर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते. याला आता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सन 2021-22 या वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र च्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.
______________________________________
विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांकडून अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि. 19 ऑगस्ट : राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिकआपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना अशा कार्यालयाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ एक रकमी रु. दहा हजार (१०,०००/-) व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रु. पंचवीस हजार (२५,०००/-) चा पुरस्कार सैनिक कल्याण विभागा मार्फत दिला जातो. तसेच सन २०२०-२०२१ मध्ये एस.एस.सी. व एच. एस. सी. बोर्डात ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक/विधवांच्या ०५ पाल्यांना विभागीय पातळीवर रु. दहा हजार (१०,०००/-) विशेष गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
तरी यासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांनी आपले अर्ज संबधित कागदपत्रासह दि. १५ ऑक्टोबर २०२१ पर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे पाठवावे. जास्तीत जास्त पात्र व्यक्तीनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७२३२/२४५२७३ वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.
_____________________________________
जिल्हा क्रीडा संकुल येथे मोफत क्रीडा प्रशिक्षण
ॲथेलेटीक्स, क्रीकेट, सॉफ्टबॉल तथा स्पोर्ट्स नर्सरी चे प्रशिक्षण
यवतमाळ दि. 19 ऑगस्ट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे ॲथेलेटीक्स, क्रीकेट, सॉफ्टबॉल प्रशिक्षण केंद्र तथा स्पोर्ट्स नर्सरी चे प्रशिक्षण सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात विनाशुल्क देणे सुरु आहे.
आजच्या धावपळी व संगणकीय युगात व व्यस्त पाठ्यक्रम यामुळे मुलांमधील उपजत गुणांना वाव मिळत नाही. तसेच शारिरिक क्षमतेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मानसिक संतुलन ढासळतांना दिसत आहे. मुला मुलींना खेळण्यासाठी वेळ मिळत नाही. ट्युशन, शाळा, ऑनलाईन क्लासेस, संगणीकीय खेळ, यातच सर्वांचा वेळ जाताना दिसत आहे. ॲथेलेटीक्स, क्रीकेट, सॉफ्टबॉल प्रशिक्षण केंद्र तथा स्पोर्ट्स नर्सरि दरम्यान मुलांना विविध मनोरंजक खेळाद्वारे शारिरिक क्षमता, वेग, ताकद, दम, लवचिकता, चपळता, समन्वय वाढविण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम प्रकार घेण्यात येतील तसेच प्रशिक्षण केंद्राकरिता क्रीडा विभागामार्फत ॲथेलेटीक्स, क्रिकेट, सॉफ्टबॉल या खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल.
तरी खेळाची आवड असणारे होतकरू मुले/मुली यांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून प्रशिक्षण केंद्रात प्रवेश निश्चित करावा, असे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रकांत उप्पलवार, यांनी केले आहे.
_____________________________________
यवतमाळ आय.टी.आय. राज्यातुन प्रथम
यवतमाळ दि. 19 ऑगस्ट : राज्यातील ४१७ शासकीय ५३८ प्रायव्हेट आय.टी.आय.मधुन उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ ला राज्यातुन प्रथम क्रमांक मिळाला आहे.
आय.टी.आय मधिल दर्जा, गुणवत्ता वाढ, सामाजिक कार्य, प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षणासोबत सार्वांगिण विकास यासाठी संस्थांना उत्कृष्ठ औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रथम क्रमांक पुरस्कार देण्यासाठी शासनाने राज्यातील आय.टी.आय. मध्ये स्पर्धा घेतली त्याचा निकाल १० ऑगस्ट रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय ने जाहीर केला. यामध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थेत राज्यातुन प्रथम क्रमांकाने औ.प्र.संस्था यवतमाळ ला गौरविण्यात आले. रुपये पाच लाख रोख पारीतोषिक संस्थेला देण्यात येणार आहे.
योजना प्रभावी व यशस्वीपणे अंमलबजावणी व त्यानुसार निकश ठरवुन त्यानुसार गुणाकंन करण्यात आले यामध्ये प्रवेश, निकाल, गळतिचे प्रमाण, उत्तीर्णतचे प्रमाण व रोजगार, ऑन दि जॉब ट्रेनिंग कामाशी निगडित राबविण्यात आलेले कार्यक्रम व संस्थेतील अभ्यासक्रम, योजना आदी बाबात समितीने प्रत्येक संस्थेने केलेल्या कामाची पाहणी करून निवड केली.
संस्थेला प्रथम पुरस्कार मिळणेकरीता प्राचार्य कविता बुटले, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सिडाम, तसेच सहाययक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रमोद भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगेवगळया समिती बनवुन त्याअनुषंगाने काम केले. याकरीता संस्थेतील सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी, बी.टी.आर.आय. कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, यांनी सतत परीश्रम घेतले व राज्यातुन प्रथम येण्याचा मानाचा पुरस्कार आपल्या यवतमाळ संस्थेला मिळवुन दिला, असे यवतमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कविता बुटले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



