यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 238 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 238 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 16 व जिल्ह्याबाहेर एक अशी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72811 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71009 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 7 लक्ष 1 हजार 696 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 28 हजार 885 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.38 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2163 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2163 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 780 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.
00000000000000
वृत्त क्रमांक : 696
मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8 पर्यंत सुरू
परवानाकक्षाला दुपारी 4 पर्यंत परवानगी
यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : यवतमाळ जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या एफएल-1, एफएल-2, सिएलएफएलटिओडी-3, एफएल-4(क्लब), एफएल-बिआर-2, सिएल-3, या अनुज्ञप्त्या 4 ऑगस्ट 2021 पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत व शनिवारी सकाळी 8 ते दु. 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी परवानगी दिली आली आहे. रविवारी या अनुज्ञप्त्या बंद राहतील.
एएफएएल-3 (परवाना कक्ष) अनुज्ञप्ती सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते दु. 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने व दुपारी 4 ते 8 पार्सल सुविधेची मुभा राहील तसेच शनिवारी सकाळी 8 ते दु. 3 वाजेपर्यंत सुरू राहील व रविारी पुर्णपणे बंद राहतील.
अनुज्ञप्तीधारक, कर्मचारी व येणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावने, सामाजिक अंतराचे पालन, हाताची स्वच्छता या कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे व कोविड प्रतिबंधात्मक नियमाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुर्वीच्या आदेशातील सुचना लागू राहतील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांविरूध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमाले येडगे यांनी कळविले आहे.
20 ऑगस्ट रोजी सैनिक दरबाराचे आयोजन
सैनिक कुटूंबियांच्या समस्या सोडविणार
यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या फक्त वैयक्तिक अडीअडचणी व तक्रारी असतील त्यांनी पुराव्यासह सर्व कागदपत्रे, दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतिमध्ये लेखी स्वरुपात अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, तहसिल चौक, यवतमाळ येथे दिनांक 9 ऑगस्ट 2021 पुर्वी सादर करून टोकण प्राप्त करावे. लोकशाही दिनामध्ये सादर केलेली तसेच न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही, तसेच मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जांचा विचार पुढील तक्रार निवारण आयोजनाचे वेळी करण्यात येईल.
तरी यवतमाळ जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या वैयक्तिक तक्रारी असतील त्यांनी या सैनिक दरबार आयोजनाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.



