~ जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २२१० बेड उपलब्ध
यवतमाळ, दि. १६ जून :
गेल्या २४ तासात १३० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ७०५०२ झाली आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण १६२२ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर १५९९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१२ रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७२६०० झाली आहे. तर. आतापर्यत जिल्ह्यात एकूण १७८६ मृत्युची नोंद आहे.
जिल्हयात आतापर्यत ६ लक्ष ६८ हजार ४२० चाचण्या झाल्या असून त्यापैकी ५ लक्ष ९५ हजार ७४३ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर १०.८६ असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर १.४२ आहे तर मृत्युदर २.४६ आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २२१० बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ११ डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि ३४ खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या २२७९ आहे. यापैकी ६९ बेड रुग्णांसाठी उपयोगात असून २२१० बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५७७ बेडपैकी ३४ बेड रुग्णांसाठी उपयोगात असून ५४३ बेड शिल्लक, ११ डीसीएचसीमध्ये एकूण ५२६ बेडपैकी २७ रुग्णांसाठी उपयोगात तर ४९९ बेड शिल्लक आणि ३४ खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण ११७६ बेडपैकी ८ उपयोगात तर ११६८ बेड शिल्लक आहेत.
____________________________________
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
· 20 जून पुर्वी अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि१६ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दिनांक ३१ मार्च २००५ ११ एप्रिल २०२१ व १६ मार्च २०१६ अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या १९ विद्यार्थ्यांना परदेशात पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेणेसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथे उपलब्ध आहे. दिनांक २० जून २०२१ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज परीपूर्ण भरून कार्यालय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथे सादर करावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
__________________________________
क्रिडा धोरणानुसार दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण
यवतमाळ दि.१६:
राज्याचे क्रीडा धोरण २०१२ नुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे कार्यपध्दतीबाबत सुधारीत शासन निर्णयामधील परिशिष्ठ ४ व ५अन्वये एकविध खेळाच्या जिल्हा व राज्य संघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना स्पर्धा विषयक अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
यामध्ये धर्मदाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणी अधिनियम १८६० किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १५९० अन्वये नोंदणी प्रमाणपत्र, जिल्हा क्रीडा संघटना राज्य क्रीडा संघटनेस संलग्न असले बाबतचे पत्र, जिल्हा क्रीडा स्पर्धेचा अहवाल, सहभागी संघाची यादी सहभागी खेळाडूंची यादी (शासन निर्णयामधील परिशिष्ठ १० नुसार) स्पर्धेची भाग्यपत्रिका, स्पर्धेचे अंतीम निकाल, स्पर्धा आयोजनाचे परिपत्रक, राज्य संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची शाहीची सही व शिक्कासह नमुना स्वाक्षरी असलेले पत्र वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रक एकविध क्रीडा संघटनांनी वेळेत सादर न केल्यास संबंधीत खेळाडूंचे प्रस्ताव गुणांकसह अपात्र राहतील व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत क्रीडा संघटनेची राहील.
गुण सवलतीकरीता आर्चरी, ॲथलेटीक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, बास्केटबॉल, बॉक्सींग, सायकलींग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॅन्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलीबॉल, लॉनटेनिस, रायफल शुटींग, टेबल टेनिस, तायक्वाँदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरू हॉकी, सुब्रतो फुटबॉल, रग्बी, सेपक टाकरा, मॉडर्न पेन्टेथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो.खो. बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, क्रिकेट, थ्रोबॉल, रोरल स्केटींग / हॉकी, योगासन, किक बॉक्सींग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शुटींग बॉल, टेनिक्वॉईट, आट्या पाट्या या खेळाच्या जिल्हा राज्य संघटनांनी वरीलप्रमाणे इयत्ता ११ वी करीता सन २०१९-२०इयत्ता १० वी करीता २०१७-१८ व २०१६-१७ अहवाल मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी उमेश बडवे यांनी केले आहे.



