घरकुलाचे कामात यवतमाळ राज्यातून पहिल्या पाचमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे काम कौतुकास्पद – पालकमंत्री संदिपान भुमरे
— महाआवास अभियानाअंतर्गत 5 हजार 565 घरकुलाचे काम पुर्ण
यवतमाळ, दि. 16 जून : जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या अल्प कालावधीत यवतमाळ जिल्हा परिषदेने महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत तब्बल 5 हजार 565 घरकुलाचे काम पुर्ण करून राज्यात पहिल्या पाच मध्ये क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे हे काम कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
काल राज्यातील 3 लाख 22 हजार 929 लाभार्थ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-गृहप्रवेशांतर्गत चाव्यांचे वितरण केले. त्याचवेळी यवतमाळ जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे हस्ते 5 लाभार्थ्यांना प्राधिनिधीक स्वरूपात घरकुलाच्या चाव्या वितरीत करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदीताई पवार, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद ठमके प्रामुख्याने उपस्थित होते.
भविष्यात यवतमाळ जिल्हा परिषद महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकवर यावी, यासाठी जनसुविधेच्या सर्व कामात पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही पालकमंत्री भुमरे यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदीताई पवार, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अभियान कालावधीत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या 12 हजार 415 घरकुलांपैकी 5 हजार 565 घरकुलांचे काम पुर्ण झाले असून 12 हजार 90 घरकुलांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. तसेच 1070 भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. 970 ग्रामीण गवंड्यांना प्रशिक्षण देण्यात आले तर 1 हजार 325 ग्रामीण गवंड्यांचे प्रशिक्षण प्रगतीपथावर असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद ठमके यांनी प्रास्ताविकेतून दिली.
महाआवास योजनेअंतर्गत मान्यवरांचे हस्ते सोपान वानखेडे रा.किन्ही, चिंतामन गोडे रा. किन्ही, गुणवंता लाडके रा. चौधरा, विष्णु नागोसे रा. बोरीसिंह, बहिणाबाई कासार रा. कान्होली यांना प्रातिनीधीक स्वरूपात घरकुलाच्या चाव्या व सन्मानपत्र देण्यात आल्या.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामरकर, सभापती श्रीधर मोहोड व जया पोटे , जि.प.सदस्य, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य विभाग व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
___________________________________
*आरोग्य खाते सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार
– पालकमंत्री संदिपान भुमरे
– पालकमंत्र्यांच्या हस्ते 34 रुग्णवाहिकांचे लोकार्पण
-ऑक्सीजन निर्मिती प्लांट व
यवतमाळ, दि. 16 जून : ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांसाठी मोठ्या शहरातील सर्वसुविधायुक्त हॉस्पीटलमध्ये तातडीने उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहीका आवश्यक आहेत. यासाठी जिल्हा परिषदेकडे मागील 15 ते 16 वर्षापासून प्रलंबीत असलेली रूग्णवाहिका खरेदी आता पुर्ण करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या 26 व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या 8 अशा एकूण 34 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोविड कालावधीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जितक्या सुविधा देता येतील तितक्या सुविधा देण्यात देवून आरोग्य खाते अधिक सक्षम करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी याप्रसंगी दिली.
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन निर्मिती प्लांट, लिक्वीड ऑक्सीजन टँक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये कोवीडबाधीत लहान मलांच्या उपचारासाठी तयार करावयाच्या कक्षाची पाहणी केली. तसेच त्यांचे हस्ते यवतमाळ जिल्ह्याकरिता शासनाकडून प्राप्त 18 व जिल्हा नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 16 अशा एकूण 34 रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या आवारात काल करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी फर्लाद चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेवून आरोग्य सुविधेअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या असून त्याशिवाय अधिकच्या सुविधा उपलब्ध करून आरोग्य खात्याचे बळकटीकरण करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद व आरोग्य विभागाचे पदाधिकारी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
_________________________________
यवतमाळ, दि. 16 जून : कोविडपासून सुरक्षित राहण्यासाठी व कोविड प्रसारावर प्रतिबंध आणण्यासाठी सर्वांचे लसिकरण आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 48 हजार 156 नागरीकांना कोरोनावरील लसचा पहिला डोज तर 91 हजार 252 नागरीकांना दोन्ही डोज देण्यात आले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात लसिकरण झालेले आहे. गावामध्ये एक दोघांचे किंवा ठरावीक लोकांचे लसीकरण झाल्याने गावाचे संरक्षण होणार नाही, तर गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे नियोजनबध्द व संपूर्ण लसीकरण ठराविक कालावधी मध्ये पुर्ण करण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व गावामध्ये 15 जुन पासुन ‘माझे लसीकरण, सर्वांचे संरक्षण :: सर्वांचे लसीकरण, माझे संरक्षण’ ही मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश दिले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय,निमशासकीय कर्मचारी, शासकीय योजना राबविणारे घटक व योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी, विद्यार्थी व ग्रामीण युवक यांचे मदतीने सदर मोहीम राबविण्यात येणार असून त्यांना लसीकरण दूत म्हणुन संबोधण्यात येईल. ते ग्रामीण भागामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करणे, लसीकरणाबाबत असणारे गैरसमज दुर करणे, गावातील पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे, प्रत्यक्ष लसीकरणाचे दिवशी लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर आणणे व पात्र ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करुन घेणे इ. अनुषंगीक कामांची जबाबदारी पार पाडतील.
यासाठी तालुका व गावपास्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले असून तालुकास्तरावर संबंधीत तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ब्लॉक मिशन व्यवस्थापक (उमेद) हे सदस्य तर तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच ग्रामस्तरीय लसीकरण प्रबोधन समिती मध्ये सरपंच यांचे अध्यक्षतेखाली सर्व ग्रा.प.सदस्य, महीला बचत गटाचे अध्यक्ष, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, गावातील ३ प्रतिष्ठीत नागरीक, कोतवाल, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
लसीकरणासाठी तालुकास्तरीय समितीने गावनिहाय साप्ताहीक नियोजन करावे. ज्यागावात लसीकरण
करावयाचे आहे. त्या गावांमध्ये 3 दिवस अगोदर पुर्वकल्पना द्यावी.पात्र लाभार्थ्यांची यादी अगोदरच तयार ठेवावी, पात्र लाभार्थ्यांना लसीकरणासाठी चमु येणार असल्याबाबत पुर्वकल्पना दयावी. लसीकरणाबाबतचे नियोजन, पात्र लाभार्थी यादी तयार करणे प्रत्यक्ष लसीकरण हया सर्व बाबीमध्ये तलाठी, कोतवाल पोलीस पाटील, आशा वर्कर,अंगणवाडी सेवीका यांनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. सर्व प्रक्रिये दरम्यान गावात पुर्ण वेळ थांबुन
लसीकरण चमुला सहकार्य करावे. जे सहकार्य करणार नाही त्यांचेवर तालुकास्तरीय समितीने कार्यवाही करावी.
सदर मोहीम ही पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.



