Home Breaking News विदर्भ पटवारी संघाच्या अध्यक्षपदी धोंडगे यांची ९ व्यांदा तर सचिवपदी वाकदकर यांची...

विदर्भ पटवारी संघाच्या अध्यक्षपदी धोंडगे यांची ९ व्यांदा तर सचिवपदी वाकदकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

278

विदर्भ पटवारी संघाच्या अध्यक्षपदी धोंडगे यांची ९ व्यांदा तर सचिवपदी वाकदकर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

🔸असलम अंजुम🔸

साखरखेर्डा : (दि. १९ एप्रिल) विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाणा ची वार्षिक आमसभा दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी चिखली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाली. त्यात जिल्हाध्यक्षपदी विजेंद्र धोंडगे तर सचिवपदी शिवानंद वाकदकर यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ पटवारी संघ नागपूरचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्णजी गाढवे, केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाने, केंद्रीय सहसचिव सौरभ वानखेडे, उपजिल्हाधिकारी सौरभ गावंडे, चिखलीचे तहसीलदार विजय सवडे, माजी केंद्रीय अध्यक्ष मनोज दांडगे, माजी केंद्रीय सहसचिव मधुकर जायभाये, समन्वय महासंघ प्रतिनिधी विजय बोराखेडे, नायब तहसीलदार हरी वीर, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, केंद्रीय पदाधिकारी प्रेमानंद वानखेडे, मंडळ अधिकारी संघ जिल्हाध्यक्ष अशोक शेळके, माजी जिल्हा सचिव रमाकांत माकोने, तलाठी कर्मचारी पतसंस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, नागपूर जिल्हा सचिव संदीप अवणे यांसह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला जिल्हा सचिव शिवानंद वाकदकर यांनी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाणा चा वार्षिक जमा-खर्च आणि अंदाजपत्रक सभागृहासमोर सादर केले, ज्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. त्यानंतर वाकदकर यांनी गेत वर्षभरात जिल्हा शाखेने केलेल्या विविध कामांचा सविस्तर कार्यवृत्तांत अहवाल सभागृहात वाचून दाखविला. या आमसभेत तलाठ्यांच्या विविध अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नायब तहसीलदार पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा लागू करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांची वेतनश्रेणी सुधारणा करणे, ई-फेरफार व ई-पीक पाहणीमधील तांत्रिक अडचणी दूर करणे, तसेच राजस्व अभियान समाधान शिबिराचा निधी मिळवणे यांसारख्या अनेक ज्वलंत समस्यांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
दरम्यान केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाने यांनी उपस्थितांना संघटनेच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देत प्रत्येकाने संघशक्ती पाळली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांनीही धोरणात्मक बाबींवर संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती देऊन सभागृहाला मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये विजेंद्र धोंडगे यांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा मांडला व येणाऱ्या काळातही संघशक्ती बळकट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ग्वाही दिली.
सभेच्या उत्तरार्धात विदर्भ पटवारी संघाच्या पुढील वर्षाच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी विजेंद्र धोंडगे यांची सलग ९ व्यांदा बिनविरोध निवड करून एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला तर जिल्हा सचिवपदी शिवानंद वाकदकर यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. यासोबतच जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल चौधरी, जिल्हा सहसचिवपदी प्रभाकर गवळी तर जिल्हा कोषाध्यक्षपदी संजय डुकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा अध्यक्ष योगेश भुसारी, उपाध्यक्ष अतुल झगरे, सचिव अनिरुद्ध खेडेकर, चिखली तालुकाध्यक्ष सय्यद फुरकान, उपाध्यक्ष भूषण काळे, सचिव रुपेश एकडे, बुलढाणा तालुकाध्यक्ष गोपाल राजपूत, उपाध्यक्ष चेतन सुर्वे, सचिव विजय राऊत व उपविभागातील सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील डव्हळे व अनिल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय डुकरे यांनी मानले.

Copyright ©