जामा मस्जिदमध्ये खत्मे – कुरआन निमित्त मौलविंचा सन्मान :
शब – ए – कद्र च्या रात्री मानवजातीच्या कल्याण आणि शांततेसाठी सामूहिक प्रार्थनासाखरखेर्डा (असलम अंजुम ) : इस्लाम धर्मात रमजान महीना हा अत्यन्त पवित्र मानल्या जातो. याच महिन्यात अल्लाह तआला ने आपल्या खास दुतांमार्फत हजरत मोहम्मद पैगंबर यांचेवर कुरआन नाजिल (उतरविले) केले. इस्लाम धर्माच्या कलमा, रोजा, नमाज, हज आणि जकात या पाच फर्जपैकी (कर्तव्यापैकी) रोजा हा एक महत्वाचा फर्ज. या महिन्यात सर्वच तरुण, अबाल – वृद्ध पुरुष आणि महीला रोजा ठेऊन अल्लाहची उपासना करतात. उपवास सोडल्यानंतर रात्री तरावीहच्या नमाज मध्ये खत्मे – कुरआनला विशेष महत्व असते.
दरवर्षी प्रमाणे स्थानिक ऐतिहासिक जामा मस्जिदमध्येही खातीब – ओ – इमाम हाफिज रज्जबअली बरकाती मिस्बाही यांचे मार्गदर्शनाखाली रमजानच्या पहिल्या रोजापासून तरावीहचे आयोजन कुरआन पठणाने करण्यात आले होते. त्याचे समापन लैलतुल कद्रच्या रात्री अर्थातच २६ व्या रोजाला करण्यात आले. यावेळी जामा मस्जिदचे मुतवल्ली मुजफ्फर हुसेन तसेच मदरसा फैजाने गरीबशाह सरकारचे मोहम्मद समीउलहक, सिकंदर पठाण, राजिक शेख कमर, आबीद पठाण, सैय्यद जमीर, शेख रशीद, मन्सूर शाह, गफ्फार तंबोली, शारिक कुरेशी, सादीक खान, निसार शाह, शेख आरीफ यांचेसह अखतर पठाण, ईसा भाई, रहेमान भाई आदी आवर्जून उपस्थित होते. यावेळी मदरसा गरीबशाह सरकार कमिटीच्या वतीने जामा मस्जिदचे खातीब – ओ – इमाम हाफिज रज्जबअली बरकाती मिस्बाही तसेच हाफिज अहेमद कादरी साहेब यांचा मोमेन्टो देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान तरावीह नमाज झाल्यानंतर फातेहाख्वानी करण्यात येऊन जगात शांतता नांदून समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
विशेष म्हणजे स्थानिक जाफ्राबाद मोहल्ल्यात फैजाने रजा मुलांचा मदरसा यशस्वीरित्या चालविल्या जात असल्याबाबत युवकांचे भरभरून कौतुक करण्यात आले. तसेच लवकरच मुलींसाठी अरबी शिक्षणाची व्यवस्था मदरसा कमिटीकडून करण्यात येत असल्याची माहिती मुफ्ती साहेबांनी दिली.




