साखरखेर्डा ते मेहकर मार्गावरील महालक्ष्मी तलावाजवळील धोकादायक वळण काढून रस्ता सरळ करण्याची मागणी
साखरखेर्डा lप्रतिनिधी – मौजे साखरखेर्डा मेहकर रोडवर महालक्ष्मी तलावाजवळील वळण मार्ग काढून रस्ता सरळ करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकूर देशपांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखरखेर्डा हे तालुक्यातील एक मोठे, ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. येथे सुमारे हजार वर्षांपूर्वीचे श्री जगदगुरू पलसिद्ध महास्वामी धर्मपीठ व त्यांची संजीवन समाधी तसेच श्री प.पू. प्रल्हाद महाराज मंदिर असून राज्यासह देशभरातून दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात.
तसेच, Mumbai-Nagpur Expressway (समृद्धी महामार्ग) याचे इंटरचेंज मेहकर येथे असल्याने त्या मार्गावरून येणारे प्रवासी, भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणात मेहकर मार्गे साखरखेर्डा गावात येतात व यासाठी ते साखरखेर्डा मेहकर या रस्त्याचाच वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
- याच मार्गावर वरोडी येथे प्रसिद्ध प.हं. तेजस्वी महाराज मंदिर असून येथेही भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. तसेच साखरखेर्डा गाव हे परिसरातील शैक्षणिक, वैद्यकीय व प्रशासकीय केंद्र असून गावामध्ये शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालय, खासगी दवाखाने, राष्ट्रीयकृत व सहकारी बँका तसेच विविध शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे हा मार्ग सार्वजनिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
परंतु, साखरखेर्डा गावालगत महालक्ष्मी तलावाजवळ (सुतगिरणी परिसरात) मौजे साखरखेर्डा ते मेहकर रोडवर अत्यंत धोकादायक स्वरूपाचे वर्तुळाकार व तीव्र वळण आहे. सदर वळणामुळे वारंवार लहान-मोठे अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.
त्यामुळे, जनहितार्थ व अपघात प्रतिबंधक उपाययोजनेच्या दृष्टीने सदर धोकादायक वळणाजवळ नवीन पूल उभारून रस्ता सरळ करण्याचे काम केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत मंजूर करून तातडीने प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली आहे.◾हालचालींना वेग
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने दि 15 मार्च रोजी अंकूर देशपांडे यांच्या समक्ष सर्वेक्षण करून सदर कामाचे अंदाज पत्रक तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.




