साखरखेर्डा : (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीचे औचित्य साधून उर्दू मातृभाषा असूनही मराठी साहित्यिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या येथील प्रतिभावान कवी तथा प्रसिद्ध साहित्यिक अज़िम नवाज राही यांचा स्थानिक छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे वतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन शिवसन्मान देत सन्मानित करण्यात आले. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या येथील अज़िम नवाज राही यांची मातृभाषा आणि अध्ययन भाषा उर्दू असूनही त्यांनी मराठी भाषेवर नुसते प्रभुत्वच मिळविले नाही तर मराठी भाषेत काव्यरचना करून साहित्य क्षेत्रात नामवंत कवी म्हणून साखरखेर्डा नगरीचे नाव सर्वदूर पोहोचविले. केवळ इ.९ वी शिकलेल्या अज़िम नवाज राही यांच्या कविता आज रोजी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच ते राज्यातील उत्तम निवेदकापैकी एक असून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. उर्दू भाषिक असूनही मराठी साहित्यात भर घालून मराठी भाषा वृध्दींगत करण्यासाठी स्वतःला अव्याहतपणे झोकून देऊन काम करणाऱ्या येथील साहित्यिक अज़िम नवाज राही यांचा जन्मोत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर पऱ्हाड, कार्यकारी अध्यक्ष सुनील रिंढे, कोषाध्यक्ष अरूण देशमुख, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उद्योजक गीताराम तायडे, मार्गदर्शक माजी प्राचार्य देविदास पांचाळ, राजू काटे, पवन जाधव, सोनू पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.




