Home Breaking News जीवनात उच्च शिक्षणासोबत उच्च संस्कार ठेवा – राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी महाराज

जीवनात उच्च शिक्षणासोबत उच्च संस्कार ठेवा – राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी महाराज

23

 

जीवनात उच्च शिक्षणासोबत उच्च संस्कार ठेवा – राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी महाराज


सहकार विद्या भवन येथे विद्यार्थ्यांकडून राष्ट्रसंतांचे भव्य स्वागत व सत्कार

“जीवन कसे स्वर्ग बनवावे” या विषयावर शनिवारी एआरडी लॉन्स येथे विशेष प्रवचन विराट सत्संग


बुलढाणा, दि. 19 डिसेंबर :
राष्ट्रसंत महोपाध्याय श्री ललितप्रभ सागरजी महाराज यांनी सांगितले की, जीवनात सेवा, सत्कार, सत्कर्म आणि सहभागितेचे संस्कार जोडले पाहिजेत तसेच मुलांनाही संस्कार देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. केवळ जन्म व संपत्ती देणारे पालक लवकर विसरले जातात; मात्र जे पालक मुलांना संपत्तीसोबत संस्कारांची शिदोरी देतात, ते कायम स्मरणात राहतात. संतान संस्कारी असेल तर ती आपोआप रोडपतीवरून करोडपती बनेल, अन्यथा कितीही संपत्ती ठेवली तरी संतती रोडपती होण्याचीच शक्यता असते.

ते म्हणाले, आपण पालक असाल तर आपल्या मुलांना इतके सक्षम बनवा की ते समाजाच्या अग्रिम पंक्तीत बसण्यास पात्र ठरतील. आणि आपण संतान असाल तर असे आदर्श जीवन जगून दाखवा की लोक आपल्या आई-वडिलांना विचारतील – “तुम्ही अशी कोणती पुण्याई केली की तुम्हाला एवढी संस्कारी संतती लाभली?”

शुक्रवारी बुलढाणा अर्बन परिवाराच्या नेतृत्वाखाली सहकार विद्या मंदिर प्रांगणात आयोजित विराट सत्संगात “जीवनात शिक्षण व संस्कार का आवश्यक आहेत” या विषयावर ते विद्यार्थी व श्रद्धाळूंना मार्गदर्शन करत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की स्वतःला घरातील कुंडीसारखे बनवू नका, ज्याला पाणी दिले नाही तर ती कोमेजते; तर जंगलातील रोपासारखे बना, जे कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या बळावर उभे राहते.

पालकांना सावध करताना त्यांनी सांगितले की, जर पालक मुलांच्या मोहात अंध धृतराष्ट्र बनले, तर त्यांची संतती दुर्योधन-दुःशासनासारखी होईल. मुलांना प्रेम व संस्कारांचे असे वातावरण द्या की ते राम, कृष्ण, महावीर होण्यासाठी स्वतः प्रेरित होतील.

संस्कारांची ‘कार’ द्या
हसत-हसत संतश्री म्हणाले की, पालकांनी मुलांना मारुती, शेव्ह्रोलेट, जेट, हुंडईसारख्या गाड्या दिल्या तर ते मुली घेऊन फरार होतील; मात्र कारऐवजी संस्कार दिले तर कुटुंबाची ‘सरकार’ नीट चालेल. मुलांच्या घडणीत 30 टक्के भूमिका नशिबाची आणि 70 टक्के भूमिका पालकांची असते. प्रत्येक पालकाला आपली मुले चांगली व्हावीत असे वाटते, पण स्वतः चांगले बनून आदर्श ठेवणारे पालक फारच थोडे असतात. जर तुम्ही मुलांना संस्कार देऊ शकत नसाल, तर त्यांना जन्म देण्याचा नैतिक अधिकारही नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शाळा बांधणे किंवा देश चालवणे सोपे आहे, पण स्वतःच्या मुलांना चांगला नागरिक बनवणे कठीण आहे. मुलांचे केवळ संगोपन न करता गरज पडल्यास त्यांना शिस्त लावण्याचे धाडसही पालकांनी ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

संस्कारित जीवन कसे घडवावे
विद्यार्थ्यांनी दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा संस्कार अंगीकारावा. रात्री उशिरापर्यंत केलेल्या चार तासांच्या अभ्यासापेक्षा सकाळी केलेला एक तासाचा अभ्यास अधिक फलदायी ठरतो. जे लवकर उठत नाहीत, त्यांना उगवता सूर्य कधीच पाहायला मिळत नाही; त्यांच्या नशिबी केवळ मावळता सूर्यच उरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रणाम व स्वावलंबनाची प्रेरणा
संतश्रींनी विद्यार्थ्यांना दररोज आई-वडिलांना प्रणाम करण्याची आणि स्वावलंबी होण्याची प्रेरणा दिली. जे प्रणाम करतात, त्यांचे विचार व परिणाम सकारात्मक राहतात; प्रणामामुळे नवग्रहांच्या दशाही अनुकूल होतात. आपण स्वतः घडवलेल्या मूर्तींना प्रणाम करतो, पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई-वडिलांना प्रणाम करताना आपल्याला लाज का वाटते, असा सवाल त्यांनी केला. नियमित शौच-स्नान, सुट्टीच्या दिवशी सामूहिक प्रार्थना, स्वतःचे कपडे स्वतः धुणे आणि प्रत्येक काम करण्याची सवय लावण्याचा सल्ला त्यांनी दिला.

मेहनतीशिवाय नशीबही साथ देत नाही – मुनिश्री शांतिप्रिय सागरजी महाराज
या वेळी डॉ. मुनिश्री शांतिप्रिय सागरजी महाराज म्हणाले की, दोन अक्षरांचे “लक”, अडीच अक्षरांचे “भाग्य”, तीन अक्षरांचे “नशीब” आणि साडेतीन अक्षरांचे “किस्मत” तेव्हाच फळ देते, जेव्हा त्यासोबत चार अक्षरांचे “मेहनत” जोडले जाते. दुर्दैवाला दोष देण्याऐवजी मेहनतीचा दिवा पेटवा.

भगवान महावीरांना आपले तीर्थंकरत्व माहित होते, तरीही त्यांनी साडे बारा वर्षे कठोर तपस्या व संघर्ष केला. आपणही जर मेहनत सुरू केली, तर आज जरी रस्त्यावर उभे असलो तरी उद्या यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी मुलींना सांगितले की हातांचा उपयोग मेहंदी लावण्यासाठी नव्हे, तर मेहनत करण्यासाठी करा. मेहंदीचा रंग सात दिवसात उतरतो, पण मेहनतीचा रंग आयुष्यभर टिकतो.

यशाचे पहिले सूत्र – मेहनत
यशाचे पहिले सूत्र मेहनत आहे. कोमट पाणी कधीही वाफ बनत नाही; वाफ होण्यासाठी ते उकळावे लागते. तसेच कोमट प्रयत्नांनी प्रगती होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वतःला कमी लेखू नका
भगवानाने पृथ्वीवरील प्रत्येकाला समान क्षमता दिली आहे; फरक इतकाच की त्या क्षमतेचा उपयोग कोण करतो व कोण करत नाही. त्यामुळे स्वतःला कधीही कमी किंवा दुर्बल समजू नका. जीवनात ठराविक ध्येय ठेवा, नियोजन करा, सातत्याने प्रयत्न करा आणि आत्मविश्वासाने ध्येय साध्य होईपर्यंत चिकाटी ठेवा.

भजनाने जागवला उत्साह
“जीवनात काही करायचे असेल तर हिंमत हारू नका, पुढे जायचे असेल तर मन मारून बसू नका…” हे भजन गायन करताच विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारला.

यापूर्वी सहकार विद्या भवनात राष्ट्रसंतांच्या आगमनप्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांचे भव्य स्वागत व अभिनंदन केले. कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व नृत्य सादर केले. स्वागत भाषण राधेश्याम चांडक यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञा मॅडम यांनी तर आभार राजेश देशलहरा यांनी मानले. प्रवचनाला शहरातील मोठ्या संख्येने श्रद्धाळू उपस्थित होते.

शनिवार, दि. … रोजी सकाळी 9.15 ते 11.15 या वेळेत एआरडी लॉन्स, दादाबाडी परिसर, मलकापूर रोड येथे “जीवन कसे स्वर्ग बनवावे” या विषयावर विशेष प्रवचन विराट सत्संग होणार आहे.

Copyright ©