पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा साखरखेर्ड्यात धुमाकूळ : अनेक जण रुग्णालयात भर्ती,
ग्रामपंचायत प्रशासन अनभिज्ञ
♦️असलम अंजुम ♦️
साखरखेर्डा : गावात पुन्हा एकदा गल्लोगल्ली मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून काल १५ ते २० नागरिक व लहान मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सद्या गावात शेकडोच्या संख्येने मोकाट कुत्रे हैदोस घालत आहेत. त्यात दि. १२ व १३ डिसेंबर रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने १५ ते २० जणांना चावा घेतल्याने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात येऊन काहींना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एक पिसाळलेला कुत्रा हा रविंद्र मुदमाळी आणि प्रल्हादराय बंकटलाल अग्रवाल यांच्या दुकानात घुसल्याने त्यांची एकच भांबेरी उडाली होती तर दोन दिवसांपासून काही युवक गावातील गल्ली- बोळात पिसाळलेल्या कुत्र्यांचा शोध घेतांना दिसून आले. हे सर्व प्रकार होत असतांना मात्र ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असून त्यावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.
पिसाळलेला कुत्रा चावल्यामध्ये वॉर्ड क्र.१ मधील शे.अब्बास कुरेशी या ४० वर्षीय इसमासह हस्नेन शाह अन्सार शाह (८ वर्ष), शे.आदील शे.इमरान (८ वर्ष), सुमैय्या परवीन शे. वाजीद (८ वर्ष) तसेच वॉर्ड क्र. ६ मधील सम्यक अनंगपाल झिने (३ वर्ष) यांची नावे समोर आली असून शे.अब्बास यांच्या पोटरीचा लचकाच तोडल्याने त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आल्याची माहिती आहे.
मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून बसस्थानक परिसर, आठवडी बाजार, गुजरी चौक, जाफ्राबाद मोहल्ला, बाजार गल्ली, झोपडपट्टी इत्यादी भागात मोकाट कुत्र्यांचे टोळकेच्या टोळके हमरसत्यावरुन भुंकत फिरत असल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारे दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नजिकच्या मेहकर येथून एका बंद वाहनात कुत्रे आणून येथे सोडण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे. जर बाहेरून कुत्रे आणून गावात सोडल्या जात असतील तर ही बाब गंभीर असून याची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन त्यावर ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच पाळीव कुत्र्यांच्या मालकांनाही याबाबत आवश्यक त्या सूचना देणे क्रमप्राप्त ठरते. या कुत्र्यांपासून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी
महत्वाचे म्हणजे गतवर्षीसुद्धा पिसाळलेल्या कुत्र्याने गावात १५ ते २० जणांना चावा घेतला होता परंतु तेंव्हाही ग्रामपंचायतने काहीच उपाययोजना केली नव्हती हे येथे उल्लेखनीय.
ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामस्थांनी तशा मागणीचे एक निवेदन ग्रामपंचायतकडे दिले आहे.
Post Views: 30