गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; दोन कोरोनामुक्त,
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मीक व्यवस्थापन
यवतमाळ दि. 22 डिसेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 13 व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण 14 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1281 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 1281 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72972 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71170 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 77 हजार 332 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष चार हजार 285 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.39 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1764 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1764 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 782 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
___________________________________
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मीक व्यवस्थापन
यवतमाळ दि. 22 डिसेंबर : सद्यस्थीतीत हरभरा पिक वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व या दरम्यान या घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकावरील प्रमुख किड असुन या किडीची मादी पंतग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फुलावर एकेरी अंडे घालतात. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातुन 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते, ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडुन खाते. त्यामुळे पान प्रथम पिवळसर पांढरकी होवून वाळतात व गळुन पडतात, थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपुर्ण पाने व कोवळी देठे खावुन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्या शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्याचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करुन आतील दाणे खावुन घाटे पोखरतात एक अळी साधारणतः 30 ते 40 घाट्याचे नुकसान करते.
एकात्मीक व्यवस्थापन :
घाटेअळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरुन घाटेअळ्या वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास किटकनाशकांचे वासामुळे पक्षी शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणुन उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रति हेक्टरी 20 पक्षी थांबे) तयार करुन शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्ष्यांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते.
कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामधे सतत तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. आपल्या पिकाचे निरीक्षण करुन किडीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापणासाठी खालील दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळुन कराव्या. पहीली फवारणी (50 टक्के फुलोऱ्यावर असतांना) निबोळी अर्क 5 टक्के किवां एच. ए.एन पीव्ही (1 x 10)9 पी.ओ.बी/मिली 500 एल ई /हे किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली. दुसरी फवारणी (पहील्या फवारणी नंतर 15 दिवसानंतर) इमामेक्टीन बेझोएट 5 टकके एस जी 3 ग्रॅम किवां इथीऑन 50 टकके इसी 25 मिली किंवा फल्युबेडामाईड 20 टक्के डब्लुजी 5मिली किवां क्लॉरेंट्रनीप्रोल 18.5 टक्के एस सी 2.5 मिली याप्रमाणात फवारणी करावी.
तरी शेतकऱ्यांनी वेळीच हरभरा पिकावरील किड व रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मीक व्यवस्थापण करावे. कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र फाळके यांनी कळविले आहे.



