गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; दोन कोरोनामुक्त
इतर महत्वाच्या बातम्या सह.
यवतमाळ दि. 21 डिसेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 15 व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण 16 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 657 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 657 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72972 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71168 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 75 हजार 987 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष तीन हजार चार निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.40 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1765 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1765 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 783 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
__________________________________
वसतिगृहापासून वंचित धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना 43 हजार अनुदान
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ
भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्यासाठी थेट रकमेचा लाभ
यवतमाळ दि. 21 डिसेंबर : वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरु करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रियभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 43 हजार एवढ्या रक्कमेपर्यंत वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणे किंवा थेट अनुज्ञेय रक्कमेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता बारावी नंतरचे शिक्षण घेत असावा व बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळाले असावे.
केंद्र शासनाच्या पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापी दोन वर्षाच्या कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अखील भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकिय परिषद, भारतीय फॉर्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्यशासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला असावा.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
_____________________________________
विमुक्त जाती भटक्या जमाती व धनगर समाजासाठी
वैयक्तीक घरकुल योजना
यवतमाळ दि. 21 डिसेंबर : विमुक्त जाती भटक्या जमाती यांना विकासाच्या मुळ प्रवाहात आणून त्यांचे राहणीमान उंचावावे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून वैयक्तीक घरकुल देण्याची योजना शासन निर्णयान्वये कार्यान्वीत झालेली आहे.
या योजनेअंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमाती व धनगर समाजातील भुमीहीन कुटुंबांना वैयक्तीक घरकुल देण्यासाठी गट विकास अधिकारी यांचे स्तरावरुन 31 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. सदर अर्जासोबत जातीचा दाखला, स्वतःच्या नावाने जागा असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र,यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेतून लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, स्वतःचे मालकीचे पक्के घर नसावे, याबाबतचे कागदपत्र जोडावे.
पालात राहणारे, दारिद्रय रेषेखालील कुंटुंब, विधवा/परित्यक्ता/दिव्यांग महिला, पुरग्रस्त क्षेत्रात असलेले कुटुंब यांना सदर योजनेत प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.



