Home Breaking News गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन इतर महत्वाच्या बातम्या सह

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन इतर महत्वाच्या बातम्या सह

12

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन
इतर महत्वाच्या बातम्या सह

यवतमाळ दि. 19 डिसेंबर गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 18 व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण 19 झाली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 785 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 784 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये राळेगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72971 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71164 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 74 हजार 928 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष एक हजार 945 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.42 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.13 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1761 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1761 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 779 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
___________________________________

नगर पंचायत निवडणूक क्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांना

20 व 21 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

 

यवतमाळ दि. 19 डिसेंबर : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, महागाव, कळंब, राळेगाव, बाभुळगाव व झरी जामणी या सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तसेच ढाणकी नगर पंचायत मधील पोट निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबर रोजी होणार आहे. सदर निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी/कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाणेकसाठी 20 डिसेंबर रोजी रवाना करण्यात येणार आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 20 व 21 डिसेंबर 2021 या दोन दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, महागाव, कळंब, राळेगाव, बाभुळगाव, झरी जामणी व ढाणकी नगर पंचायत क्षेत्रातील शाळा/महाविद्यालय यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.

__________________________________
नगर पंचायत निवडणूक : मतदान करण्यासाठी सुट्टी

 

यवतमाळ दि. 19 डिसेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील मारेगाव, महागाव, कळंब, राळेगाव, बाभुळगाव व झरी जामणी तसेच ढाणकी नगर पंचायत मधील पोट निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबर रोजी होणार आहे. सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 13 डिसेंबर 2021 च्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

____________________________________

नगरपंचायत निवडणूक

महिलांकरिता आरक्षित जागांसाठी सुधारित फेर सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 

यवतमाळ दि. 19 डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मारेगाव, महागाव, कळंब, राळेगाव, बाभुळगाव व झरी जामणी या सहा नगरपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना. मा. प्र.) करिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारित फेर सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जाहिर केला आहे.

फेर सोडत कार्यक्रमानुसार नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या ना. मा. प्र. व ना. मा. प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांची सोडत दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी काढण्यात येईल. आरक्षण व सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांचेकडे 24 डिसेंबर 2021 पर्यंत पाठविण्यात येईल. नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या ना. मा. प्र. व ना. मा. प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या अंतिम आरक्षणास मान्यता 27 डिसेंबर 2021 पर्यंत देण्यात येईल. अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतींच्या वेबसाईटवर 28 डिसेंबर 2021 पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.

___________________________

काल व्हाट्सअप वर पाठवलेल्या बातम्या

पांढरकवडा येथील आरोग्य शिबिरात 2921 रुग्णांची तपासणी

· 56 शस्त्रक्रिया

 

यवतमाळ दि. 18 डिसेंबर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे शस्त्रक्रिया, रोग निदान व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन दिनांक 14 ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन या शिबिरात आलेल्या महिला रुग्ण मंजुळाबाई कळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार डॉ. संदीप धुर्वे, पांढरकवडा शहराच्या नगराध्यक्ष वैशालीताई नहाते यांनी शिबिरास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. उद्घाटनाचा संपूर्ण कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतुषार वारे, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील वैद्यकीय अधीक्षिका डॉ श्रीमती वैशाली सातूरवार,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तगडपल्लिवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मडावी यांच्या उपस्थितीत झाला.

शिबिरामध्ये 2921 रुग्णांची विशेषज्ञ डॉक्टरकडून तपासणी करण्यात आली व एकूण 56 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात 22 मोठ्या आणि 34 छोट्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या कॅम्पमध्ये जन्मापासून अंध व्यक्तीचे हर्निया ची शस्त्रक्रिया करण्यात आली. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील विशेषज्ञ डॉक्टर्स यांनी शिबिरास आपले योगदान दिले.शिबीराचे यशस्वी नियोजन माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांचे मार्गदर्शनात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सातुरवार यांच्या निर्देशानुसार करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीते करिता या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तोडासे, डॉ बाजोरिया, डॉ कांबळे, डॉ कोवे, डॉ निपाने, डॉ ठाकरे, डॉ वानखेडे, डॉ कडू, डॉ किलनाके, डॉ नैताम,डॉ. ठमके, डॉ.तूगनायत, डॉ शिंदे, डॉ शिरभाते, डॉ चव्हाण, डॉ हजारे, अधिसेविका अधि परीसेविका, अधिपरिचारिका, सहाय्यक अधीक्षक व संपूर्ण रुग्णालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

____________________________________

नैसर्गिक पर्यटन स्थळांची स्वच्छता व पावित्र्य जपा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पर्यटकांना आवाहन

 

चौसाळा टेकडी येथे श्रमदानातून केली स्वच्छता

दर आठवड्यात नैसर्गिक पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम राबविणार

 

यवतमाळ दि. 18 डिसेंबर : जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटन स्थळे तसेच तीर्थस्थळावर स्वच्छता राखून या ठिकाणाचे पावित्र्य जपण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना केले आहे.

 

यवतमाळ येथून पाच-सहा किलोमीटर अंतरावरील चौसाळा टेकडी या नैसर्गिक पर्यटन स्थळावर आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानात उपवनसंरक्षक सतिश वाबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, वनाधिकारी अनंत डिकोडे, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. धरणे, श्री. राठोड व विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी चौसाळा टेकडीवरील गवत, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या यासारखा कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. यापुढे दर आठवड्यात नैसर्गिक पर्यटन स्थळावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
___________________________________
समाज माध्यमांवर धार्मिक व जातीय भावना दुखावणारे संदेश प्रसारित करण्यास प्रतिबंध

 

 

यवतमाळ दि. 18 डिसेंबर : कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वंशिक, भाषिक, किंवा प्रादेशिक गट अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, व्देषाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा वा अनधिकृत माहिती विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज निर्गमित केले आहेत.

सदर आदेशात निरनिराळे धार्मिक, भाषिक, किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी आणि ज्यामुळे सर्वाजनिक प्रशांतता बिघडते किंवा बिघडणे संभाव्य असते अशा पोस्ट विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायदयान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव, अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल किंवा त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखादया समुहातील व्यक्तींना दुस-या कोणत्याही वर्गाविरुध्द किंवा

समूहाविरुध्द कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल किंवा चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल अशा पोस्ट विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायदान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.

विविध समाज माध्यमामधून तसेच सोशल मिडीयावर जो कोणी व्यक्ती, संस्था, संघटना हा अॅडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांचे गृपवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक पोस्ट प्रसारीत होणार नाहीत या बाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर अॅडमिन नियमानुसार कारवाईस प्राप्त

राहील.

आदेशाची अवज्ञा करणा-यांवर भारतीय दंड संहिताच्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.
__________________________________

मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पाचाळ यांची आर्णी, महागाव तालुक्यातील लसीकरण सत्राला भेट

 

पहिल्या व दुसऱ्या डोस चे उद्धिष्ट तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश

जल जीवन मिशन, नरेगा, व इतर कामाचा आढावा घेतला

लोणी,म्हसोला, कलगाव, करंजखेड गावाना भेटी

 

यवतमाळ दि. 18: ओमीक्रॉन चा धोका कमी करायचा असेल तर लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे म्हणून उर्वरित लसीकरणाचे उद्धिष्ट जास्त असलेल्या आर्णी महागाव तालुक्याला आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी भेटी देऊन तालुकास्तरीय यंत्रणेला लवकरात लवकर लसीकरणाचे उद्धिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या दौऱ्याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी. एस. चव्हाण, उपमुख्य कार्यकरी अधिकारी मनोज चौधर, अरविंद गुडधे, कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे यांनी आर्णी तालुक्यातील लोणी, म्हसोला प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर महागाव तालुक्यातील कलगाव,करंजखेड गावाला भेटी देऊन लसीकरण ,जलजीवन मिशन, नरेगा व इतर विकासात्मक कामा चा आढावा घेतला.

ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवकांनी ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती सदस्यांच्या सहायाने यादी मध्ये लसीकरण बाकी असणाऱ्यांची नावे शोधून त्यांचे लसीकरणासाठी प्रबोधन करावे व तात्काळ लसीकरण पूर्ण करून घेणाचे निर्देश दिले. तसेच ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे परंतु डेटा एन्ट्री झाली नाही, त्यांची डेटा एन्ट्री तात्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल बाभूळगाव तालुक्यातील कोठा गावाला भेट देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्या बाबत सूचना केली. दौऱ्याप्रसंगी संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी शाम शिंदे, नरेंद्र आडे, वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर चव्हाण ,दत्ता पवार तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

Copyright ©