गेल्या 24 तासात सहा पॉझिटिव्ह
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2156 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 27 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर कोरोनामुक्त झाल्याची संख्या निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 14 व जिल्ह्याबाहेर एक अशी एकूण 15 आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1747 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1741 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72846 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71044 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील तीन, नेर येथील दोन व इतर शहरातील एका रुग्णाचा समावेश असून त्यात चार महिला व दोन पुरूष आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 17 हजार 791 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 44 हजार 798 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.15 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.34 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2156 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2156 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 769 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा
यवतमाळ दि. 27 ऑगस्ट : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
सोमवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा क्रिडा संकुल समितीच्या बैठकीस शासकीय विश्रामगृह येथे उपस्थिती. सकाळी 10.30 वा. मनरेगा संबंधी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक. स. 11 वा. जिल्हा क्रिडा संकुल, यवतमाळ येथे भेट. दु. 12 वा. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र, यवतमाळ येथे भेट. दु. 12.30 वा. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ग्रंथालय येथे भेट. दु. 1 ते 3 शासकीय विश्रामगृह, यवतमाळ, येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून नागपूरकडे प्रयाण.
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मार्केटिंगमध्ये एकत्र सहभाग नोंदविणे आवश्यक
यवतमाळ दि. 27 ऑगस्ट : जिल्ह्यात कापूस, तुर, सोयाबिन यासह विविध शेती पिकांचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होत असून त्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (एफ.पी.ओ.) शेतमालाच्या मार्केटींगमध्ये एकत्रीतपणे सहभाग वाढविणे आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
शेतकरी उत्पादक कंपनी योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे घेतला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. एस.यु.नेमाडे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक दीपक पेंदाम व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
एफ.पी.ओ. योजनेअंतर्गत पीक समुह निश्चित करणे तसेच लघु कृषक कृषी व्यापार संघ यांचे मार्फत जिल्ह्यात घाटंजी, दिग्रस, आर्णी, मारेगाव व झरी जामनी या तालुक्यांमध्ये विकासगंगा समाजसेवी संस्था यांनी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी येडगे यांनी पिक विमा योजनेचा आढावा घेतांना उमरखेड व महागाव या भागात माहे ऑगस्ट मध्ये नैसर्गिक आपत्तीने बाधीत शेतीचे पंचनामे दोन दिवसात पुर्ण करून त्यांचे प्रस्ताव 30 ऑगस्ट पर्यंत शासनास सादर करण्याचे सांगितले. तसेच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रस्तावातील त्रुटींचे निराकरन सात दिवसात करून लाभार्थ्यांना विमा रकम अदा करण्याचे सांगितले.
यावेळी कृषी विभाग, विमा कंपनी, सहकार विभाग व एफ.पी.ओ. चे प्रतिनिधी उपस्थित होते.
ई-पीक पाहणी अँपद्वारे स्वत:च करा पिकाची नोंद
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
यवतमाळ दि. 27 ऑगस्ट : शेतकऱ्यांना ई-सातबारा सोबतच आता स्वत:च्या पिकाची नोंद, मोबाईल अँपच्या माध्यमातून सातबारावर घेता येणार आहे. महसूल विभागाने ई-पीक पाहणी अँप लॉन्च केले असून त्यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध होऊन पीक नोंदणीसाठीचा वेळ वाचण्यासोबतच शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी या अँपचा उपयोग करून स्वतःच्या पिकाची नोंद सातबारावर वेळच्या-वेळी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅप मधून कशी करावी, याबाबत सूचना : प्रथम मोबाईल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन ई-पीक पाहणी अॅप डाऊनलोड करावे, ई-पीक पाहणी मराठी भाषेत असल्याने आवश्यक त्या ठिकाणी मराठी शब्द टाईप करावयची असल्याने Google Indic Keybord हे अॅप मोबाईल मध्ये असल्यास पीक निवड व खातेदार शोधणे सोपे जाईल. ई-पीक अॅप इंस्टाल केल्यानंतर सर्व लोकेशन चालु करुन इतर सेटिंगसाठी मान्यता द्यावी. मोबाईल नंबर टाकावा.., ज्या गावातील ई-पीक पाहणी करायची आहे तो जिल्हा,तालुका व गाव निवड करावे. शेतकरी यांना नोंदणी करताना खाते नं.,सर्वे क्र.,पहिले नाव,मधले नाव व आडनाव यावरुन देखील करता येईल. नोंदणी प्रक्रिया पुर्ण झालेनंतर चार अंकी सांकेतांक क्रमांक येईल व तो नोंदणी झालेल्या शेतकरी यांना सांकेतांक कायम राहील. सांकेतांक लक्षात नसल्यास सांकेतांक विसरालात या बटनावर क्लीक केल्यास तो तात्काळ पुन्हा मिळतो. नंतर TAB – परिचय मधील माहिती भरावी.
पीकांची माहिती भरण्यापुर्वी स नं मधील जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापुर्वी जमीनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करुन त्या नंतर पेरणीची माहिती नोंदवा, TAB – पीकांची माहिती भरताना खाते.क्र., सर्वे क्र. निवड करावा, लागवडी व पो.ख क्षेत्र उपलब्ध असेल. हंगाम – चालु हंगाम निवड करावा.आंबा फळपीक व जमीन पड/कायम पड असल्यास संपुर्ण वर्ष हा पर्याय निवड करावा. पीक पेरणीसाठी उपलब्द क्षेत्र – सात बारा वरील क्षेत्र याठिकाणी दिसेल. पिकांचा वर्ग – एका क्षेत्रावर एका वेळी एकाच पीक घेतले असल्यास निर्भेळ पीक हा प्रकार निवड करावा जर जमीन चालू हंगामामध्ये पड असल्यास पड क्षेत्र हे निवडून फोटो शिवाय माहिती भरावी. पीकांचा प्रकार मध्ये पीक व फळबाग यापैकी एक प्रकार निवड करावे. (भात असल्यास पीक निवड करावे तर आंबे असल्यास फळबाग निवड करुन क्षेत्र व झाडांची संख्या नमुद करावी)
पीक पेरणी क्षेत्र – काही भागात खरीप हंगामाध्ये निर्भळ पीक वर्गातील भात पीक क्षेत्राचे मोठया प्रमाणात पीक घेतले जाते प्रत्यक्ष पीक पेरणी/भात लावणी केलेले क्षेत्र शेतकरी भरतील क्षेत्र भरताना हे.आर. स्वरुपात भरावे, राबाचे क्षेत्र भरु नये, शेतातील लावणी केलेले भाताचे क्षेत्र भरावे. 20 गुंठे भात पीक क्षेत्र असल्यास 0.2000 असे भरावे (हे.आर चौ.मी एकक) तर 5 गुंठे असल्यास 0.0500 असे भरावे, पीकांचे क्षेत्र भरताना सात बारा वरील एकूण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र भरता येणार नाही. सामाईक खातेदारांपैकी कोणत्याही एका खातेदाराने पुर्ण पेरणी क्षेत्र भरले तरी देखील माहिती भरली जाईल किंवा खातेदारांच्या बहिवाटी पुरते देखील क्षेत्र भरता येईल.
जलसिंचन साधन – आपल्याकडील पीके जिरायती (पावसाच्या पाण्यावर) असल्यामुळे अजलसिचित – जिरायत हा पर्याय निवडावा मात्र काही जमीनीना विहीर, बोअरवेल, शेततळे यामधून पाणी दिले जात असल्यास योग्य तो पर्याय निवड करावा. जलसिंचन पध्दत – पीकांना कश्याप्रकारे पाणी दिले जाते? यामध्ये तुषार,ठिंबक सिंचन पध्दत,प्रवाही सिंचन पध्दत निवड करावी. लागवडीचा दिनांक – शेतकरी याठिकाणी लावणी केलेला दिनांक नमूद करतील. मुख्य पिकाचे छायाचित्र- जो स नं निवड केलेला आहे त्यांच स नं मध्ये बांधापासून १० ते १५ मीटर आतमध्ये जाऊन शेतात उभे पीक असताना फोटो काढावा, मोबाईल गॅलरी मधील फोटो अपलोड करता येणार नाही यांची नोंद घ्यावी. (ज्या शेत जमीनीत उभे आहोत तो सं न निवडणे, त्याव्यतिरिक्त स नं निवड केल्यास ई पीक पाहणी अपुर्ण होईल). TAB – कायम पड:- सदर क्षेत्रांचा फोटो न काढता देखील माहिती भरता येते. याठिकाणी जलसिंचनाचे साधन भरण्यास उपलब्ध होतील.59 प्रकारची कायम पड फोटो शिवाय माहिती भरता येईल. TAB – बांधावरील झाडे – बांधावरील झाडाचे नाव निवडने,संख्या नमुद करणे,फोटो काढून सबमिट करावे. TAB – अपलोड :-शेतावर गेल्यानंतर मोबाईल मध्ये इंटरनेट नसल्यास चार अंकी सांकेतांक क्रमाक नमूद करुन लॉगीन करावे, पीक लागवडीची माहिती भरुन पीकांचा फोटो काढून सबमिट करावा गावात इंटरनेट क्षेत्रात आल्यानंतर अपलोड या टॅब चा वापर करुन पीक पेरा भरावा.
एका खातेदारांची ई-पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या खातेदाराची ई-पीक पाहणी करण्यासाठी मोबाईल अॅप मधील ‘नवीन खातेदार नोंदणी करा’ या टॅब चा वापर करावा. एका मोबाईल क्रमांक वरुन 20 खातेदारांची नोंदणी करुन पीक पाहणी करता येईल.
तरी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपचा वापर करून स्वतःच्या पिकाची नोंद सातबारावर वेळच्या-वेळी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
हवामान अंदाजानुसार कपाशी, सोयाबीन, मुंग, उडीद पिकांची काळजी
यवतमाळ दि. 27 ऑगस्ट : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात दि. २७ व २८ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी (१ किंवा २ ठिकाणी) हलक्या पावसाची तर दि. २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच विस्तारीत स्वरुपाच्या हवामान अंदाज प्रणालीनुसार जिल्ह्यात दिनांक २९ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वरील हवामान अंदाजानुसार कृषि विज्ञान केंद्रामार्फत पुढील सल्ला देण्यात आला आहे.
हवामान अंदाजानुसार शेतातील परिपक्व झालेल्या मुग व उडीद पिकांची कापणी करून संबंधित शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी. कपाशी व तूर पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे करावीत ज्यामुळे पिके तणमुक्त राहण्यास मदत होईल व येणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. पिकामध्ये सततच्या पावसाने पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. वापसा परिस्थितीत डवरणी करून पिकास मातीची भर द्यावी.
कापूस पिकात आकस्मिक मर (parawilt) आढळून आल्यास युरिया १०० ग्राम + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचींग करावी. तत्पूर्वी झाडाच्या बुंध्या लगतची माती पायाने दाबावी. कापूस पिकामध्ये बोंड सड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम + स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट १ ते २ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीनच्या पानावरील बुरशी जन्य ठिपके व शेंगावरील करपा रोगाचे नियंत्रण
सोयाबीन पीक सद्यपरिस्थितीत कमी कालावधीचे वाण शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे आणि पीक परिस्थिती समाधानकारक आहे, परंतु काही भागांमध्ये पानावरील बुरशी जन्य ठिपके व शेंगावरील करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याकरिता शेतकरी बांधवांनी खालील बुरशीनाशकाची फवारणी घेणे जरुरी आहे. टॅबूकोण्याझोल १० टक्के डब्ल्यू. पी. अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यू. जी. २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे बुरशीनाशकाची सुरक्षित फवारणी करावी. फवारणी करतांना कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, विद्राव्य खते यांची एकत्र मिश्रण करून फवारणी करू नये. फवारणी साठी अंग रक्षक किटचा वापर करावा, असे यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.यु.नेमाडे यांनी कळविले आहे.



