Home Breaking News जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

33

 

यवतमाळ दि. 17 ऑगस्ट : निरोगी शरीरासाठी ऋतुनिहाय नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे आहारात अनन्यसाधारण महत्व असून नवीन पीढीला अशा भाज्यांची ओळख व्हावी यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे तसेच बचत गटाच्या माध्यमातून शहरात नियमितपणे रानभाज्या विक्रीसाठी प्रयत्न करण्यात यावे, असे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते जिल्हा मृद सर्वेक्षण कार्यालय परिसर, गार्डन रोड, एल.आय.सी. चौक येथे 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

यावेळी रानभाज्यांचे महत्व व उपयोग या कृषी विभागाच्या पुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

रानभाजी महोत्सवात विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानावनात नैसर्गिकरित्या उगवलेले आघाडा, तरोटा, अरबी, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, कटूरले, शतावरी, भुई आवळा, सुरण, कमळकाकडी, कपाळफोडी गुळवेल, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, वावडिंग, शेवगा, उंबर, आदी रानभाज्या व रानफळांचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते.

______________________________________

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही : एक कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 17 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेरजिल्ह्यात एक अशी एकूण सहा आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 357 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 357 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72824 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71031 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष नऊ हजार 877 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 37 हजार 42 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.26 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2168 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 781 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत

Copyright ©