यवतमाळ दि. 6 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72811 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71009 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये दारव्हा येथील एक व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आहेत तर आज मृत झालेल्यांमध्ये बळीरामपुर, पो. मुकटबन ता. झरी येथील 67 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2160 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 10 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 777 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.
____________________________________
हिंसाचाराने पीडित महिलांना मदतीसाठी
‘सखी वन स्टॉप सेंटरची’ भूमिका महत्वपुर्ण
– जिल्हाधिकारी
यवतमाळ दि. 6 ऑगस्ट : हिंसाचाराने पिडीत महिलांना वैद्यकीय सेवा, कायदेविषयक मदत, मानसिक आधार, समुपदेशन व सहाय्य तसेच तात्पुरता आश्रय या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ची भूमिका महत्वपुर्ण आहे, या सुविधेची तसचे आपत्तीग्रस्त महिला व बालकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेले हेल्प लाईन नंबर – वन स्टॉप सेंटर साठी 181, महिला हेल्पलाईन-1091, चाईल्ड लाईन-1098, पोलीस कंट्रोल रूम-100 याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
महिला व बालविकास विभागाअंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर च्या कामाचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एम.आर.ए.शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, महिला सुरक्षा पोलीस कक्षाच्या शुभांगी आगाशे, सखी वन स्टॉपच्या केंद्र प्रशासक सोनाली पाटील, महिला समुपदेशक डॉ. लीला भेले, विधी सल्लागार ॲड तिलकसिंह गौतम प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी प्रॉक्सो कायद्याबाबत तसेच मुलांना चांगले व वाईट हेतून केलेले स्पर्श कळावे यासाठी शाळा, महाविद्यालयांमधून तसेच मार्गदर्शीका पुस्तिका, पोस्टर व प्रसारमाध्यमांद्वारे महिला व बालविकास विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी पिडीत महिलांना सखी वन स्टॉप सेंटरला योग्य पोलीस सुरक्षासह पोहचवून देण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्याना देण्यात येतील असे सांगितले.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
_____________________________________
टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठ्याची कामे प्राधाण्याने पुर्ण करा
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
यवतमाळ दि. 6 ऑगस्ट : जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची कामे घेतांना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात प्रगतीपथावरील व प्रस्तावीत पाणी पुरवठ्याची कामे प्राधाण्याने पुर्ण करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मनोज चौधर, जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन योजनेचे कार्यकारी अभियंता प्रदिप कोल्हे, उपकार्यकारी अभियंता मनोज शहाडे, वरिष्ट भूवैज्ञानिक एस.एस.कडू, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता सुनिल चव्हाण, ङिएसव.कांबळे, डॉ. टि.ए.शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की पुढील वर्षात कोणत्याही गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज पडू नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. पाणी पुरवठाची कामे घेण्यासाठी ज्या गावात अद्याप ठराव घेण्यात आला नसेल त्या गावात दिनांक 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठराव ठेवण्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 1703 गावात 1630 योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत 2 लाख 45हजार नळ जोडण्या पुर्ण करण्यात आल्या असून 31 मार्च 2022 पर्यंत दोन लाख 76 हजार 299 प्रस्तावित नळ जोडण्याची कामे पुर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रदिप कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला पाणी पुरवठाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.



