यवतमाळ दि.30 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 771 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित 769 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 12 व जिल्ह्याबाहेर दोन अशी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72801 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71003 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये बाभूळगाव येथील एक व दिग्रस येथील एका रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 99 हजार 518 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 26 हजार 620 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.41 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.26 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2159 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 778 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 749 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________________________
नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना पिकविमा लाभ मिळावा
प्रधानमंत्री पिक विमा योजना आढावा सभेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
यवतमाळ दि.30 जुलै : ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे व नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ तातडीने मंजूर करावा. कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे प्रकरण परत येणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२ चा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी संशोधन विद्यालयाचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभीये, कृषी अधिकारी शिवा जाधव, विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक अर्जून राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे उर्वरित पंचनामे पुढील सात दिवसाच्या आत करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले. तसेच मागील हंगामातील विमा लाभाचे प्रलंबित २२ कोटी रूपये विमा कंपनीने तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
चालू खरीप हंगामात आतापर्यंत तीन लाख २१ हजार ५२२ शेतकऱ्यांनी २३ कोटी १० लाख ५४ हजार ७५६ रुपये विमा हप्ता भरून तीन लाख ३२ हजार ५४७ हेक्टर शेतीक्षेत्राचा पिकविमा काढलेला आहे. यापैकी ७३१२ शेतकऱ्यांनी पिकनुकसान झाल्यामुळे पिक विमा मिळण्यासाठी तक्रार अर्ज सादर केले आहे. यापैकी १९८४ प्रकरणात शेतीचे पंचनामे पुर्ण करण्यात आले असून उर्वरित पंचनामे सात दिवसात पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकारी शिवा जाधव यांनी बैठकीत सादर केली.
सभेला कृषी विभाग व पीक विम्याशी संबंधीत अधिकारी उपस्थीत होते.
_____________________________________
फिरत्या दवाखाण्यामुळे दुर्गम भागात आरोग्य तपासणी सुलभ होईल
– जिल्हाधिकारी
यवतमाळ दि.30 जुलै : फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे गावातच रूग्ण तपासणी व औषधोपचार होणार असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांची चांगली सोय होईल असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
रासी सिड कंपणीद्वारे सिएसआर निधीअंतर्गत रूग्ण तपासणीकरिता अद्यावत अम्ब्युलन्समध्ये फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज या ॲम्ब्युलन्सला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी संशोधन विद्यालयाचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, डॉ. सुरेश नेमाडे, रासी सिड्सचे सुनिल महाजन, शंतनु देशकर, चंद्रकांत बागडी, भैयासाहेब मानकर, सुरेश मुंदडा, गजू कोषटवार प्रामुख्याने उपस्थित होते.
या फिरत्या दवाखान्यात अद्यावत सोयीसुविधा असून त्यातील वैद्यकीय अधिकारी सर्व वर्गातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करणार आहेत. तसेच रक्तदाब तपासणी व शुगर तपासणी सह उपलब्ध औषधीदेखील रूग्णांना मोफत देण्यात येणार आहे. सध्या ही ॲम्ब्युलन्स पांडरकवडा तालुक्यात आपली सेवा देणार असून त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जावून प्रत्येक गावात दर सहा महिन्यात किमान तीन ते चार वेळा जावून रूग्ण तपासणी व औषधोपचार करणार आहे.
यावेळी चंद्रकांत बागडी, अंकश गेडाम, बबन काळबांडे, महेश ठाकरे, राहुल मिठे, मदन खेडकर, राजू शेळके उपस्थित होते.



