यवतमाळ दि.23 जुलै : आज सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही तसेच पाच जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या केवळ नऊ राहिली आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 553 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 553 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72789 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70994 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 95 हजार 767 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 22 हजार 899 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.46 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी शुन्य आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2156 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2256 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 773 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 751 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
____________________________________
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचे दोन दिवसात पंचनामे करा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दारव्हा, दिग्रस व पूसद भागात पाहणी करून दिले निर्देश
यवतमाळ दि.23 जुलै : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दारव्हा, दिग्रस व पूसद येथे भेट देवून अतिवृष्टीमुळे बाधीत भागाची पाहणी केली तसेच तालुका स्तरीय समितीची सभा घेतली. नैसर्गिक आपत्ती व पुरामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.
सिंचन प्रकल्पातील बाधीत गावांची जिल्हाधिकारी यांनी यावेळी माहिती घेतली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याचे व आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक तसेच संबंधीत अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे व तात्काळ बाधीत ठिकाणी पोहचून नागरिकांना मदत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी केल्या.
याप्रसंगी दिग्रसचे तहसिलदार राजेश वझीरे, पुसदचे अशोक गिते, दारव्हाचे संजय जाधव, तसेच संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी व आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
____________________________________
जिल्ह्यातील प्रकल्प स्थळे व सहस्रकुंड धबधबा प्रतिबंधित क्षेत्र घोषित
ओव्हर-फ्लो पाहतांना अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
यवतमाळ दि.23 जुलै : जिल्ह्यात मागील तीन दिवसापासुनच्या संततधार पावसामुळे उमरखेड येथील सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे, तसेच बाभुळगाव तालूक्यातील बेंबळा प्रकल्प व यवतमाळ येथील निळोणा धरण ओव्हर-फ्लो होत आहेत. मान्सून कालावधीत धरण, तलाव, धबधबा मधील ओव्हर-फ्लो पाहण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प स्थळे व सहस्रकुंड धबधबा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
मागील वर्षीच्या मान्सूनमध्ये सहस्त्रकुंड धबधबा येथे ओव्हर-फ्लो पाहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नी दाम्पत्याचा तोल गेल्यामुळे मृत्यु झाला होता तसेच बेंबळा प्रकल्प बाभुळगाव येथे एका व्यक्तीचा व निळोणा धरण यवतमाळ येथे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला होता. अशा प्रकारच्या घटना यावर्षी होवू नये याकरीता जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प तसेच सहस्त्रकुंड धबधबा परिसर, बेंबळा प्रकल्प व निळोणा धरण क्षेत्र ‘प्रतिबंधीत क्षेत्र’ म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एका आदेशाद्वारे घोषीत केले आहे.
या आदेशाद्वारे सदर क्षेत्रात प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शोध बचाव पथक याशिवाय इतरांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. सदर आदेश दिनांक २३ जुलै पासुन ०१ ऑगस्ट २०२१ पर्यत लागु राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
___________________________________
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन
यवतमाळ दि.23 जुलै : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुनाल झाल्टे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
___________________________________
ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी शासनातर्फे अनुदान
महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन
यवतमाळ दि.23 जुलै : ड्रगनफ्रुट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सीडंन्टमुळे या फळास सुपर फुट म्हणुन प्रसिध्दी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरीक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शीयम या सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकुन राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असुन पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मुल्य इ. बाबी लक्षात घेवुन सन २०२१-२२ या वर्षापासुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातुन ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.
ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमीनीची पुर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये ३ मी. X ३ मी., ३ मी. X २.५ मी. या अंतरावर खड्डे खोदुन खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान ६ फुट उंचीचा खांब व त्यावर कॉक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेंट काँक्रीट खांबाच्या एक बाजुला एक याप्रमाणे चार बाजुला चार रोपे लावावित.
वरीलप्रमाणे, ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व पिक संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय आहे. याकरीता रक्कम रू. ४.०० लाख प्रकल्पमुल्य ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे रक्कम रू. १.६० लाख अनुदान तीन वर्षात ६०:२०:२० या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तीसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.
तरी, सर्व शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टल mahadbtimahait.gov.in यावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.



