यवतमाळ, दि. 12 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 2 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 221 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 6 पॉझिटिव्ह तर 215 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 22 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72767 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70959 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा येथील पाच व वणी येथील एका रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 86 हजार 309 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 13 हजार 521 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.60 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 2.71 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1872 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 33 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1872 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 618 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 14 रुग्णांसाठी उपयोगात तर 622 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
दुष्काळ देखरेख समितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
यवतमाळ, दि. १२ जुलै : खरीप-२०२१ मधील दुष्काळी परिस्थीतीचे मुल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
जिल्ह्यातील पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृत आर्दता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे सर्वेक्षण यासाख्या बाबी विचारात घेवून राज्य शासनाच्या दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ च्या सुधारित निकष व कार्यपद्धतीनुसार दुष्काळ घोषित करण्यात येतो. याअनुषंगाने माहे जुन २०२१ च्या संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त आकडेवारीनुसार एकाही तालुका दुष्काळजन्य परिस्थितीच्या टप्पा-१ मध्ये नाही. तसेच जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून ५६ मंडळात अतिवृष्टी तर ८ मंडळात दोनवेळा अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती नाही, अशी माहिती समितीचे सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना पीक पेरणीकरिता चांगली परिस्थीती असून जिल्ह्यात खत व युरियाची अडचण येवू नये अशा सूचना कृषी विभागाला दिल्या तसेच दारव्हा परिसरात जेथे अतिवृष्टी झाली आहे तेथील नुकसानीचे अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे सांगितले.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल खंडारे, सिंचन मंडळाचे उपअधीक्षक अभियंता राजेश हटवार, भूजल विभागाचे कनिष्ठ अभियंता बी.एल.घोगरे उपस्थित होते.
ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेवून निश्चित कारवाई करणार
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ, दि. १२ जुलै : ज्या बाबीवर ग्राहक प्रत्यक्ष तक्रार करून शकत नाही तेथे ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून ग्राहक मंच देखील शासनाकडे तक्रार नोंदवू शकतात, यावर प्रशासनातर्फे निश्चित कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत सांगितले.
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा ग्राहक संरक्षण मंच चे अध्यक्ष प्रा. नारायण मेहरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे पुढे बोलतांना म्हणाले की आपले सरकार केंद्रावर जास्तीचे दर आकारणी करण्यात आल्यास संबंधीतांवर फौजदारी करण्यात येईल. तसेच खाजगी कोविड रूग्णालयात जिल्हा प्रशासनातर्फे लेखा तपासणी करून अनेक ठिकाणी तक्रार नसतांनाही शासकीय दरापेक्षा जादा आकारणी करण्यात आलेली रकम संबंधीत रूग्णांना परत करण्याचे आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. यावेळी मांडण्यात आलेल्या 14 तक्रारींचे अनुपालन संबंधीतांकडून मागवून 7 दिवसात तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विद्युत विभाग, पाणी पुरवठा, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाशी संबंधीत तक्रारी ग्राहक मंचचे अध्यक्ष भास्कर मेहरे व सदस्यांनी यावेळी मांडल्या.
बैठकीला विद्युत विभाग, अन्न व औषध प्रशासन, वजन मापे, पोलीस विभाग, नगरपालीका, आरोग्य विभाग, उपप्रादेशीक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम इ. विभागाचे संबंधीत अधिकारी तसेच ग्राहक मंचचे विविध तालुक्यातील अशासकीय सदस्य उपस्थित होते.
अतिजोखीममध्ये काम करणाऱ्या नागरिकांच्या एच.आय.व्ही. तपासण्या वाढवा
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ, दि. १२ जुलै : स्थलांतरीत कामगार, देहविक्री करणाऱ्या स्त्रिया तसेच ज्यांना एच.आय.व्ही. होण्याचा धोका जास्त आहे, अशा अति जोखीम मध्ये काम करणाऱ्या नागरिकांच्या एच.आय.व्ही. तपासण्या वाढवीण्यात याव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतेच दिले.
जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा सामान्य रुग्णालय यांची त्रेमासिक आढावा सभा नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. सदर सभेमध्ये पीपीटीच्या माध्यमातून एचआयव्ही/एडस कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात नोंदणी असलेल्या जवळपास 1700 देहविक्री करणाऱ्या स्त्रियांपैकी 890 महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आलेला आहे. तरी उर्वरित बाकी देह विक्री करणाऱ्या महिलांची यादी लवकरात लवकर महिला व बालकल्याण विभागात सादर करण्यात यावी याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच जिल्ह्यात 1097 टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृती करण्याबाबत सांगण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.चव्हाण, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, एआरटी केंद्र यवतमाळ व इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.



