Home Breaking News गेल्या 24 तासात 9 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व...

गेल्या 24 तासात 9 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध

13

 

यवतमाळ, दि. 29 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ एक जण पॉझेटिव्ह तर 9 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 415 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 414 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 43 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72718 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70889 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये झरीजामणी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 79 हजार 704 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 06 हजार 936 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.70 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.24 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2449 आहे. यापैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2408 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 26 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 611 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 14 रुग्णांसाठी उपयोगात तर 622 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 1 उपयोगात तर 1175 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

पात्र नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा डोज दोन दिवसात पुर्ण करा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्हाधिकारी यांची बाभुळगाव, कळंब व राळेगाव तालुक्याला भेट

कोविड उपाययोजना, खत, बियाणे व पीक कर्जाचा घेतला आढावा

कोव्हॅक्सीन लसचा दुसरा डोज देण्यासाठी दोन दिवस विशेष लसीकरण केंद्र

 

यवतमाळ, दि. 29 जून : कोरोना लसीकरणाचा पहिला डोज घेतल्यावर विहित कालावधीनंतर दुसऱ्या डोजसाठी पात्र झाल्यावरही अद्याप बऱ्याच नागरिकांनी लसचा दुसरा डोज घेतलेला नाही, विशेषत: कोव्हॅक्सीन लसच्या दुसऱ्या डोजचा कालावधी केवळ 28 दिवसच असल्याने हा कालावधी पुर्ण करणाऱ्या नागरिकांना पुढील दोन दिवसात दुसरा डोज देण्यात यावा. यासाठी उद्या व परवा दोन दिवस कोव्हॅक्सीन लस देण्यासाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्याचे व संबंधीत पात्र नागरिकांना तालुका नियंत्रण कक्षाद्वारे दुरध्वनीद्वारे आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज तालुका यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी आज सकाळी बाभुळगाव, कळंब व राळेगाव तालुक्यात प्रत्यक्ष भेट देवून तसेच सायंकाळी सर्व तालुका यंत्रणेशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कोविड प्रतिबंधाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण, कोरोना संभाव्य तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पुर्वतयारी, खत व बियाण्यांची उपलब्धता व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप या बाबींचा आढावा घेतला.

कोरोनाची लस घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पाड्यावरील नागरिकांमध्ये जनजागृती करून लसीकरण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच बियाण्यांची उपलब्धता व खताचा आढावा घेतांना युरियाच्या बफर स्टॉकची माहिती घेतली. बाभुळगाव येथे दोन दिवसात मुबलक युरिया उपलब्ध करण्यात येवून तेथील युरियाची कमतरता दूर करण्यात येईल, असे सांगितले. तर राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जावे, त्यांना एनपीए व ओटीएस योजनांची माहिती देवून पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, शैलेश काळे, तहसिलदार विवेक कुमरे (बाभुळगाव), डॉ. सुनिल चव्हाण (कळंब), रविंद्रकुमार कानडजे (राळेगाव), पोलीस निरीक्षक श्री वडगावकर, मुख्याधिकारी नंदू परळकर, संबंधीत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच महसुल, आरोग्य, पोलीस, कृषी व नगरपरिषद यंत्रणेचे अधिकारी व बँकांची प्रतिनिधी उपस्थित होते.

___________________________________

अनुसूचित जमातीच्या नागरिकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळणार

 

यवतमाळ, दि. 29 जून : राज्य शासनाच्या 20 एप्रिल 2019 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीच्या नागरिकांना न्युक्लीअस बजेट अंतर्गत कोविड-19 उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी जातीचा दाखला, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून प्रमाणित केलेले खाजगी रुग्णालयाचे देयक, बँकेचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड व आधार कार्डची प्रत इ. कागदपत्रासह आपला प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या कार्यालयात सादर करावा, असे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.

____________________________________

जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या 4 वाजेपर्यंत सुरू राहणार

यवतमाळ, दि. 29 : ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत शासनाच्या सुचनेनुसार यवतमाळ जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी श्रेणी-3 मधील निर्बंध लागू करण्यात आले असून त्यानुसार जिल्ह्यातील अबकारी अनुज्ञप्ती 28 जून 2021 पासून सोमवा ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत सुरू ठेवण्यात मुभा देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मद्य विक्री अनुज्ञप्त्या एफएल-1, एफएल -2, सिएलएफएलटिओडी- 3, एफएल -3 (परवानाकक्ष), एफएल – (क्लॅब), एफएल-बिआर-2, सिएल-2, सिएल-3 अनुज्ञप्त्यांना उपरोक्त विहीत वेळेत नियमित व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सदर अनुज्ञप्तीचे व्यवहार शनिवार व रविवार पुर्णपणे बंद राहतील.

अनुज्ञप्तीमधील अनुज्ञप्तीधारक व नौकर व येणाऱ्या ग्राहक यांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविड त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. यासोबतच कोविड त्रिसुत्रीचे पालन व कोविड प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने संदर्भिय आदेशातील सुचना लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Copyright ©