जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2168 बेड उपलब्ध
यवतमाळ, दि. 12 जून : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण सहापट आहे. जिल्ह्यात 14 जण पॉझेटिव्ह तर 87 जण कोरोनामुक्त झाले असून एका रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनीवारी एकूण 1390 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 14 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1376 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 506 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 151 तर गृह विलगीकरणात 355 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72542 झाली आहे. 24 तासात 87 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70252 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1784 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 62 हजार 697 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 90 हजार 105 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.95 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.01 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
पॉझेटिव्ह आलेल्या 14 जणांमध्ये 8 पुरुष आणि 6 महिला आहेत. यात दारव्हा येथील 1, दिग्रस येथील 1, महागाव 2 , नेर 1, पांढरकवडा 2, वणी येथील 2, यवतमाळ येथील 3, तर इतर शहरातील 2 रूग्णंचा समावेश आहे.
आज वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील 28 वर्षीय महिलेचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालायत झाला आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 111 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2168 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 46 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 531 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 45 रुग्णांसाठी उपयोगात तर 481 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 20 उपयोगात तर 1156 बेड शिल्लक आहेत.
___________________________________
कर्जप्रकरणाचे निर्धारीत उद्दिष्ट 100 टक्के पुर्ण करा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे बँकर्स आढावा बैठ कीत निर्देश
यवतमाळ दि. 12 जून : बँकाकडील विविध कर्जप्रकरणांचा नागरिकांच्या जीवनमानावर व अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम पडत असल्याने बँकांनी शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाची कर्जप्रकरणाचे निर्धारीत उद्दिष्ट 100 टक्के पुर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकर्स समन्वय समितीच्या आढावा बैठकीत दिले.
बँकेच्या मार्च-2021 अखेरच्या तीमाहीचा व मागील आर्थीक वर्षाच्या कामकाजाअंतर्गत कर्ज योजनांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेतला. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, नाबार्डचे दीपक पेंदाम, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अमरावती चे क्षेत्रिय प्रबंधक अजय खन्ना, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक गिरीश कोनेर, जिल्हा उद्योग केंद्र चे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की पाऊस पडायला सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांकरिता पुढील दोन तीन आठवडे महत्वाचे असून बँकानी त्यापुर्वी विशेष मोहिम राबवून खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करावे. राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांतर्फे पीक कर्ज वाटप संथगतीने सुरू त्यांनी पीककर्ज वाटपाची गती वाढवावी असे त्यांनी सांगितले. प्राधान्यक्रम क्षेत्रात (कृषी, कृषी संलग्न व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, वनीकरण, गृह कर्ज, शिक्षण, वनीकरण इ. प्रायोरिटी सेक्टर) कर्जवाटपाचे जास्तीत काम करण्याचे व चालु आर्थिक वर्षासाठी मागील वर्षीच्या दीडपट किंवा त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवण्याचे सांगितले.
चालु आर्थिक वर्षासाठी पीक कर्जाचे सुरवातीचे 2280 कोटी रुपये उद्दिष्ट शासनाने 299 कोटी रुपयांनी वाढवून ते आता 2579 कोटी करण्यात आले आहे. जिल्ह्यात 10 जूनपर्यंत एक लाख 21 हजार 584 सभासदांना 1002 कोटी 61 लाख 88 हजार पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जासाठी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांला प्राधान्याने कर्ज मंजूर करण्यात येत असून आता बॅंकेचे प्रतिनिधी गावस्तरावर जाऊन पीक कर्ज वाटपाचे काम सुरू करणार असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये यांनी सांगितले. तर पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव बँकेकडे प्रलंबित नसून प्रस्ताव प्राप्त झाल्याबरोबर त्यावर लगेच कार्यवाही करण्यात येत असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे समन्वयक गिरीश कोनेर, यांनी सांगितले. जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी महात्मा जोतिबा फुले शेतकारी कर्जमुक्ती योजने अंतर्गत 94 टक्के कर्जवाटप पुर्ण झाले असल्याची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांची कर्ज प्रकरणे, पीक कर्ज योजना, मुद्रा लोन, किसान क्रेडीट कार्ड, पंतप्रधान स्वनिधी योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत प्रस्ताव, नाबार्ड योजना, स्वयंरोजगार, विविध महामंडळांचे कर्जाची प्रकरणे, बिजभांडवल योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना आदीबाबत बँकर्सच्या बैठकीत आढावा घेतला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सेन्ट ग्रामीण स्वयंराजगार प्रशिक्षण संस्थेच्या सन 2020-21 च्या वार्षिक कामकाज अहवालचे प्रकाशन करण्यात आले.
बैठकीला सेंट ग्रामीण स्वयरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार भगत, बँक ऑफ बडोदा चे मुख्य प्रबंधक बी. एस. सोनंक, कोकण ग्रामीण बँकेचे अमोल अलकरी व संबंधीत अधिकारी व विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



