यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात गत 24 तासात 1085 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1049 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 25 मृत्यु झाले. यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर सात मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. तसेच एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 6020 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1085 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4935 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5840 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2691 तर गृह विलगीकरणात 3149 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 45541 झाली आहे. 24 तासात 1049 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 38648 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1053 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.14 असून मृत्युदर 2.31 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 51, 61, 76, 67,65, 39, 42 वर्षीय पुरुष आणि 56 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील 70 वर्षीय महिला, आर्णि येथील 53 वर्षीय महिला व तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, राळेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, वणी येथील 53 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 53 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 57 व 61 वर्षीय पुरुष, पुसद येथील 55 व 58 वर्षीय पुरुष, वणी येथील 70 वर्षीय महिला, आर्णि येथील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा येथील 55 वर्षीय पुरुष आहे.
शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1085 जणांमध्ये 638 पुरुष आणि 447 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 319 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 103, दिग्रस 89, पांढरकवडा 81, कळंब 70, वणी 69, दारव्हा 65, नेर 64, पुसद 57, बाभुळगाव 44, घाटंजी 37, महागाव 28, मारेगाव 20, झरी 20, आर्णि 12, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 375002 नमुने पाठविले असून यापैकी 370535 प्राप्त तर 4467 अप्राप्त आहेत. तसेच 324994 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 0 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 167 रुग्णांसाठी उपयोगात, 73 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 31 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2383 बेडपैकी 1288 उपयोगात, 1095 शिल्लक आणि 23 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 789 बेडपैकी 613 उपयोगात तर 176 बेड शिल्लक आहेत.
त्रृटीची पुर्तता केलेल्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 23 : सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीमधील निवडणूक प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील स्थापन केलेल्या तत्कालीन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ यांच्यामार्फत ज्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशा जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहे. तत्कालीन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ कडून दिनांक 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीमधील निर्गमित जात वैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द ठरविण्यात आले आहे.
तसेच प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणात जे उमेदवार समिती समक्ष हजर झाले व त्रूटींची पूर्तता केली, त्या अर्जदारांना समितीने नव्याने जात वैधता प्रमाणपत्र तयार केले आहेत. अर्जदारांनी https://yavatmal.gov.in/ या संकेतस्थळावरील जलद दुवे या टॅबखाली जात वैधता प्रमाणपत्राची सध्यस्थिती यावर किंवा https://barti.in/certificate.php# या संकेतस्थळावर भेट देऊन त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक सहीत, मुळ पावती, अर्जदाराचे आधारकार्ड व जातीचे प्रमाणपत्र यांची सांक्षाकित छायांकित प्रत कार्यालयात सादर करून समिती कार्यालयातून प्राप्त करून घेण्यात यावे.
अर्जदार जर स्वत: हजर राहू न शकल्यास वरील संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जदाराचे स्वाक्षरीचे अधिकार पत्र घेऊन संबंधित अर्जदाराचे जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयीन वेळेत (सकाळी 11 ते 5, शासकीय सुट्टी वगळून) प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त विजय एम. वाकुलकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बोंडअळी व्यवस्थापनाबाबत आढावा
यवतमाळ, दि. 23 : कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी / बोंड सड व्यवस्थापन बाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, बोंडअळीबाबत यावर्षीसुध्दा आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने उपाययोजना कराव्यात. मुख्यत्वेकरून कापूस पिकाखालील फरदड निर्मूलन करणे, फेरोमोन ट्रॅप्स लावणे आणि पूर्वहंगामी लागवड टाळणे हे महत्वाचे पर्याय आहेत. शेतकरी बांधवानी माती परीक्षण करून त्यानुसारच आपल्या शेतामध्ये खतांचा वापर करावा आणि युरियाचा अवाजवी वापर टाळावा. कापूस पीक फरदड निर्मूलन मोहिम तसेच प्रचार प्रसिध्दी जिल्ह्यात प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. जिनिंग मिल ओनर्स यांनी आपल्या जिनिंग मिलमध्ये फेरोमोन ट्रॅप्स लावावेत तसेच आजूबाजूच्या शेतक-यांना फेरोमोन ट्रॅप्स वाटप करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यवतमाळ जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र 9 लक्ष 1 हजार हेक्टर असून त्यापैकी कापूस पिकाखालील क्षेत्र 4 लक्ष 65 हजार हेक्टर आहे. सन 2017 मध्ये मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी सीआयसीआर नागपूरचे संचालक डॉ. प्रसाद, , कृषी विद्यापिठाचे डॉ. उंदीरवाडे, डॉ. नगरारे, डॉ. प्रमोद यादगिरवार, डॉ. सुरेश नेमाडे, डॉ. पराग मगर, प्रगतीशील शेतकरी मनीष जाधव, अरविंद बेंडे, अशोक वानखेडे, रामकृष्ण पाटील, निविष्ठा विक्रेते, कंपन्या प्रतिनिधी, जिनिंग मिल ओनर्स आदी उपस्थित होते.
जवाहर नवोदय विद्यालयाची वर्ग 6 वी ची निवड चाचणी लांबणीवर
यवतमाळ, दि. 23 : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी वर्ग 6 करीता निवड चाचणी रविवार दिनांक 16 मे 2021 रोजी होणार होती, परंतु प्रशासकीय कारणांमुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असून परिक्षेची नवीन तारीख परिक्षेच्या 15 दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल.
तरी संबंधीत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी याची नोंद घ्यावी. तसेच परिक्षेची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परिक्षेला बसावे, असे आवाहन प्राचार्य गंगाराम सिंग यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता
तपासूनच पेरणी करावी
आर्णि पंचायत समिती कृषी विभागाचे आवाहन
यवतमाळ, दि. 23 : सोयाबीन उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी व शेतकऱ्याकडील स्व:उत्पादीत सोयाबीन बियाण्याचा वापर वाढविण्यासाठी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबिन बियाण्याच्या उगवन क्षमतेची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे.
सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासण्याची पध्दत : शेतकऱ्यांनी स्वत:कडील असलले बियाणे चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान, फुटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणी नंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद घेऊन पाण्याने ओला करावा. प्रत्येकी 10 बिया घेऊन एका रांगेत समान अंतर सोडून गुंडाळी करावी. अशा रितीने 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार ठेवाव्या. नंतर या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार ते पाच दिवस तशाच ठेवाव्या. त्यातील ओलावा कमी झाल्यास ओलाव्यापुरते पाणी पेपर वर सोडावे. चार ते पाच दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत (अंकूरण) झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 50 असेल तर उगवण क्षमता 50 टक्के आहे असे समजावे. जर ती संख्या 80 असेल तर उगवण क्षमता 80 टक्के आहे असे समजावे. सोयाबिन बियाण्याची उगवण क्षमता चांगली म्हणजे 70 टक्के ते 75 टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रती हेक्टरी 75 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. गोणपाट / पोते ओले करून त्यावर 100 बिया ठेऊन वरील प्रमाणे उगवणशक्ती तपासता येते.
रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 3 तास अगोदर बीज प्रक्रीया करून असे बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बीज प्रक्रीया करावी. सोयाबिनवरील खोड किडी, चक्रीभुंगा या किड नियंत्रणाकरीता पेरणीपूर्वी बियाण्यास (थायमेथॉक्झम 30 टक्के एफएस) या किटकनाशकाची 2 मिली, अधिक 5 मिली पाणी प्रती किलो बियाण्यास बीज प्रक्रीया करावी. 75 ते 100 मिली पाऊस झाल्यानंतरच सोयाबिनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी पुरेशा ओलीवर व 3 ते 4 से.मी. खोलीवर करावी. प्रती हेक्टरी दर 70 किलो वरून 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबिन बियाणे टोकून पध्दतीने किंवा प्लांटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पध्दत (बीबीएफ) यंत्राणे पेरणी करावी, असे कृषी अधिकारी पंचायत समिती, आर्णी यांनी कळविले आहे.



