राज्यातील महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर : संपूर्ण राज्यात एकाच दिवशी १५ जानेवारीला होणार मतदान तर निकाल दुसऱ्याच दिवशी
🔸असलम अंजुम🔸
साखरखेर्डा : गत तीन ते चार वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांची अखेर घोषणा करण्यात आली असून दि.१५ जानेवारी रोजी त्यासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुका काल जाहीर झाल्यानंतर अता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले असून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिलेले असल्याने आयोग या निवडणुका डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही नगरपालिका आणि नगरपंचायतीचे २ डिसेंबरला स्थगित झालेले मतदान हे २० तारखेला होऊन २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणूक वेळापत्रकाला उशीर होत असला तरी २१ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणावर सुनावणी झाल्यानंतरच राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार असल्याचा कयास असून डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात ह्या निवडणुकांची घोषणा होऊन जानेवारीच्या अखेरच्या टप्प्यात मतदान आणि निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी विशेषतः मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एकीकडे सत्ताधारी भाजप रणनीती आखत असून दुसरीकडे मुंबईतील मतदार ठाकरे बंधूना कितपत साथ देतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहेत.