Home Breaking News न.प. मुख्याधिका-यांची मनमानी, प्राधिकरणाचे अधिकारी हैराण

न.प. मुख्याधिका-यांची मनमानी, प्राधिकरणाचे अधिकारी हैराण

13

न.प. मुख्याधिका-यांची मनमानी, प्राधिकरणाचे अधिकारी हैराण

सेवाभावी संस्थांच्या प्रयत्नाने फुटलेल्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम जोरात

यवतमाळ – या ना त्या कारणाने यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे यवतमाळकरांसाठी चर्चेचा विषय बनले आहे. डोल्हारकरांच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे अधिकारी हैराण झाले असून मुख्याधिका-यांच्या निष्क्रीय कार्य प्रणालीमुळे सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींच्या प्रयत्नाने पिण्याच्या पाण्याची फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीचे कामं जोराने सुरु आहे. यवतमाळ पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती अंतर्गत महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाने न.प. मुख्याधिका-यांना वारंवार फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करुन देण्याकरीता परवानगी मागीतली असता आलेल्या अर्जाला न.प. चे मुख्याधिकारी यांनी केराची टोपली दाखविल्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. अपव्यय झालेल्या लाखो लिटर पाण्याचे बिल न.प. च्या मुख्याधिका-यांकडून शासनाने वसूल करुन महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या खात्यात टाकावे, अशी मागणी यवतमाळकरांमध्ये होत असून याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मदन येरावार मौन का असा प्रश्‍न सुध्दा सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, यवतमाळ पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्ती अंतर्गत अप्सरा टॉकीज रोडवरील फुटलेल्या पाईपलाईनची गळती दुरुस्तीकरीता तसेच गोधणी रोड तहसिल कार्यालयाजवळ रेडक्रॉस शाळेसमोर ५२५ मिमी व्यासाच्या डि.आय. पाईपलाईन वरील गळती तसेच माईंदे चौक बिडकर हॉस्पिटल समोर ८० मिमी व्यासाची फुटलेली पाईपलाईन वरील गळती दुरुस्त करण्याकरीता तसेच मेडिकल कॉलेज चौक परिसरातील फुटलेली पाईपलाईप दुरुस्त करण्याकरीता न.प. चे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे, उपविभागीय अभियंता प्रफुल एन. कांबळे, तत्कालीन उपविभागीय अभियंता निखील कवठळकर आदिंनी जवळपास ८ ते १० वेळा नगर पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी यांच्याशी लिखीत पत्र, स्मरण पत्र तसेच ई-मेल द्वारा यवतमाळ पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्तीकरीता परवानगी मागितली. परंतू ति परवानगी न दिल्यामुळे सेवाभावी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रेडक्रॉस भवन येेथे फुटलेल्या पाईपलाईनला श्रध्दांजली अर्पित करुन जनआंदोलन उभारले होते. याची सुध्दा न.प. चे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी कुठलीही दखल न घेता महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाला फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती करण्याची परवानगी न दिल्यामुळे मागील तिन महिन्यांपासून यवतमाळ शहरातील विभीन्न भागात फुटलेली पाईपलाईन दुरुस्त न झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या पाण्याचे बिल न.प. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्याकडून जिल्हाधिका-यांनी वसूल करुन त्यांच्या नियमबाह्य कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी सेवाभावी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

जिल्हाधिकारी यवतमाळ, आमदार मदन येरावार यांना यासंदर्भात अनेक तक्रारी देवून सुध्दा दखल घेण्यात आली नाही. शेवटी सेवाभावी सामाजिक संस्थांच्या पदाधिका-यांच्या सहकार्याने महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तहसिल चौक, माईंदे चाैक व शहरातील ईतर भागात फुटलेल्या पाईपलाईचे दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाने सुरु केले आहे. याबाबत सेवाभावी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची समाधान व्यक्त केले आहे. तर जिल्हाधिका-यांनी यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या नियमबाह्य कामकाजाची चौकशी करुन लाखो लिटर पाण्याचे बिल त्वरीत वसूल करावे अशी मागणी सेवाभावी सामाजिक संस्थांनी केली आहे.

Copyright ©