गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त
इतर महतावाच्या बातम्या सह.
यवतमाळ दि. 23 डिसेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 13 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1126 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1125 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील एका पुरूषाचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72973 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71172 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 78 हजार 413 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष पाच हजार 410 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.37 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.09 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1767 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1767 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 785 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.
____________________________________
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त ऊर्जा संवर्धन रथ मार्गस्थ
यवतमाळ दि. 23 डिसेंबर : नागरिकांमध्ये भविष्यात निर्माण होऊ घातलेल्या ऊर्जा संकटाबाबत जागृती करणे व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराविषयी प्रबोधन करण्यासाठी ‘ऊर्जा संवर्धन रथा’ ला महाऊर्जा यवतमाळ जिल्हा कार्यालयाचे प्रकल्प कार्यकारी अधिकारी दिनेश सुरोशे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे तसेच ऊर्जा संवर्धन करणे, या बाबींना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी ऊर्जा संवर्धन रथ शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये नुकताच मार्गस्थ करण्यात आला.
यावेळी महाऊर्जा जिल्हा कार्यालयातील प्रकल्प अधिकारी रेणुका खैरकार, लेखापाल सुयोग खैरकार तसेच संतोष घोडेकर, कुणाल बावस्कर, दत्ता सुरोशे उपस्थित होते.
_____________________________________
नाफेडमार्फत तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
यवतमाळ दि. 23 डिसेंबर : हंगाम 2021-22 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दिंनाक 20 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत जिल्ह्यात 7 खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. यात महागाव तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागाव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रीया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर, दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, आणि बाभुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव या खरेदी केंद्रांचा समावेश आहे.
तरी दिलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड, शेतीचा 7/12, पिकपेरा व बॅक खाते पासबुक इ. संपुर्ण माहिती देवून तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी कळविले आहे.
____________________________________
विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपुर्वी सादर करावे
यवतमाळ दि. 23 डिसेंबर : समाज कल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती करीता देण्यात येणाऱ्या स्वाधार योजना चे सन 2020-21 व सन 2021-22 चे परिपुर्ण अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ येथे महाविद्यालयामार्फत सादर करण्यात यावेत.
सदर योजनेसाठीचे अर्ज समाज कल्याण कार्यालयातुन व शासकीय वसतीगृहातुन प्राप्त करुन घेऊन 75 टक्के ऑनलाईन उपस्थिती प्रमाणपत्र व सर्व कागदपदासह सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.
____________________________________
राष्ट्रीय ग्राहक दिननिमित्त 24 डिसेंबरला ऑनलाईन वेबिनार
यवतमाळ दि. 23 डिसेंबर : दरवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने यावर्षी शुक्रवार दि 24 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन वेबिनार लिंकद्वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रमुख मार्गदर्शनात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त ग्राहक संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येणार असल्यामुळे या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमास https://meet.google.com/mmg-pivv-vzz या लिंकद्वारे हजर राहता येणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे कार्यक्रमांस वरील लिंक वर हजर राहुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, वजन मापेचे सहाय्यक नियंत्रक गजानन ढाले व तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.



