Home Breaking News गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; दोन कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; दोन कोरोनामुक्त

28

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २१६६ बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 12 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच दोन जण कोरोनामुक्त झाले असल्याने सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेरजिल्ह्यात दोन अशी एकूण सात आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 967 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 967 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72820 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71026 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष सहा हजार 291 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 33 हजार 211 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.31 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2166 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2166 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 779 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

_____________________________________

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ दि. 12 ऑगस्ट : जिल्ह्यातील युवकयुवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प शासनाच्या आर्थिक सहाय्यतून सुलभतेने स्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात क्लस्टरची संख्या वाढवावी व विविध उद्योग व्यवसायासह कृषी पूरक उद्योगाला चालना देवून त्याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कार्यबलाची आढावा सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात काल घेण्यात आली. यावेळी जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये उपस्थित होते.

बँकांनी त्यांचेकडील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत प्राप्त झालेले कर्जाची प्रकरणे तातडीने निकाली काढून पात्र लाभार्थींना कर्ज मंजूर करावे तसेच कृषी पूरक व्यवसाय उभारणीसाठी महिला बचत गटांना विशेष मोहिम राबवून या योजनेत सामावून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
____________________________________

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन

* प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर नको

यवतमाळ दि. 12 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन साजरा करतांना राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी प्लास्टिक ध्वजाचा वापर करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरूक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करू नये. प्लॅस्टिकचे ध्वज आढळून आल्यास संबंधत तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

Copyright ©