दिग्रस तालुक्यातील सावंगा बु.जवळील अरुणावती धरणाच्या कॅनलच्या बाहेरील वाहणाऱ्या पाण्याजवळ एका ४० ते ४५ वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत शुक्रवारी,दि.३० जुलै २०२१ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की, एका ४० ते ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह सावंगा बु.जवळील अरुणावती धरणाच्या कॅनल जवळ असल्याची माहिती सावंगा बु. येथील पोलीस पाटील शरद शिंदे यांनी दिग्रस पोलिसांना दिली.त्यावरून पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले,उपनिरीक्षक शशिकीरण नावकर,विशाल बोरकर,गुणवंत गोटे,प्रभाकर जाधव,अविनाश राठोड घटनास्थळी पोहचले.त्या ठिकाणी कुजलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेह ४ ते ५ दिवसाचे असल्याचे अंदाज वर्तविण्यात आला.मृतदेह अरुणावती धरणाच्या कॅनल, जो शेतीच्या सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या कॅनल जवळ झुडपात आढळला.या मृतदेहाला पंच कुंदन खोडे,नंदू पवार व संदेश खंडारे यांनी बाहेर काढले.तेव्हा पोलिसांनी मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले.डॉक्टरांनी शवविच्छेदन केले.तद्नंतर मृतदेहाचे सावंगा बु.येथे पोलिसांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.
याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक ,शशिकीरण नावकर, विशाल बोरकर ,गुणवंत गोटे,प्रभाकर जाधव, अविनाश राठोड करीत आहे.



