Home Breaking News 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त जिल्हयात 66 कोरोनामुक्त, 24...

24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त जिल्हयात 66 कोरोनामुक्त, 24 पॉझेटिव्ह,

35

 

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2159 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 11 जून : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पटीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात 24 जण पॉझेटिव्ह तर 66 जण कोरोनामुक्त झाले असून विशेष म्हणजे आज कुणाचाही मृत्यू झाला नाही.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 2130 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 24 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2106 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 580 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 161 तर गृह विलगीकरणात 419 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72528 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70165 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1783 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 61 हजार 310 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 88 हजार 452 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.97 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.13 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

पॉझेटिव्ह आलेल्या 24 जणांमध्ये 16 पुरुष आणि 8 महिला आहेत. यात आर्णी येथील 1, दारव्हा येथील 3, दिग्रस येथील 2 , घाटंजी येथील 3 , नेर 2, पांढरकवडा 1, वणी येथील 5, यवतमाळ येथील 5, तर झरीजामणी येथील 2 रूग्णंचा समावेश आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 120 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2159 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 54 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 523 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 44 रुग्णांसाठी उपयोगात तर 482 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 22 उपयोगात तर 1154 बेड शिल्लक आहेत.

___________________________

मान्सून कालावधीत नागरिकांनी खबरदारी घेण्याबाबत प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यात मान्सून कालावधीत पुरात वाहुन जाणे, तलावात बुडून मृत्यु होणे इ. घटना होऊ नये याकरीता पुढीलप्रमाणे खबरदारी घेणेबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

अतिरिक्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात/तलावात शक्यतो मासेमारी करीता जाणे टाळावे, वहीवाटीच्या पुलावरून पाणी वाहत असतांना पुलावरचे पाणी ओसरे पर्यत वाहनाने तसेच प्रत्यक्ष जाण्याचे

टाळावे, तलावात पाणी साठवण झाल्यानंतर खेळण्यासाठी वा पोहण्यासाठी जाणे इत्यादी प्रकार टाळावेत, नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरू असतांना व पूर परिस्थिती असतांना जावू नये. तसेच जे पुल वापरात नाही किंवा जिर्ण झालेले आहे अशा पुलावरून मान्सून कालावधीत वाहतूक करू नये. ज्या इमारती धोकादायक आहेत किंवा ज्या पडू शकतात अशा इमारतीच्या ठिकाणी पाऊस सुरू असतांना आश्रय म्हणून थांबू नये. पाऊस सुरू असतांना सुरक्षीत स्थळी आश्रय घेण्यात यावा. मान्सून कालावधीत धरणाचे/तलावाचे ओव्हरप्लो पाहण्यासाठी गर्दी करू नये, सर्व ग्रामपंचायती, ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व सूचना आपल्या गावांमध्ये दयाव्यात व लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमंजबजावणी करावी.

नैसर्गिक विज पडून होणारी जिवित हानी टाळण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी व आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

___________________________

थायोमेथोक्झामच्या बिज प्रक्रियेद्वारा सोयाबिनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

यवतमाळ, दि. 11 : विदर्भात कापूस नंतर सोयाबिन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबिन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होता व त्यामुळे सोयाबिन पिकाचे नुकसान झाले. या वर्षीसुध्दा सोयाबिन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून या किडीच्या व्यवस्थापनासाठी बिज प्रक्रीया करूनच लागवड करावी.

या‍ किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासून म्हणजेच रोप 10 ते 15 दिवसाचे झाल्यानंतर होतो. त्यामुळे त्याचा ताटाचे संख्येवर विपरीत परिणाम होऊन पिकाची दुबार पेरणीची शक्यता असते मात्र या बिजप्रक्रीया केल्यास सोयाबिनचे पिक जवळपास 25 ते 30 दिवस पर्यंत या किडीस कमी प्रमाणात बळी पडते.

किडीचा जिवनक्रम व नुकसानीचा प्रकार : खोड माशी लहान, चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2‍ मी.मी. असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली. फिंक्कट पिवळ्या रंगाची 2 -4 मी.मी. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागता दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा झाडावर खोडमाशीचे अळीचे प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16 ते 30 टक्के घट होते.

सोयाबिन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक किटकनाशक थायोमेथोक्झाम 30 टक्के एफ.एस. 10 मिली / 1 कि बियाणे बिजप्रक्रीया करूनच पेरणी करावी, त्यामुळे सुरुवतीच्या 25 ते 30दिवस सोयाबिन पिक खोड माशी या क्डिीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते. बिज प्रक्रीया करतांना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रीया करावी त्यानंतर रासायनिक किटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संवर्धकाची बिज प्रक्रीया करावी. सोयाबिन पिकामध्ये उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लाऊन नियमित खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे. (25/हे) ज्या ठिकाणी काही कारणाअभावी सोयाबिन बियाण्यास थायोमेथोक्झामची बिजप्रक्रीया केली नसल्यास सोयाबिनचे पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50 टक्के 30‍ मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के, 6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के, 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या किडीच्या वाढीसाठी उष्ण तापमान जास्त आर्द्रता, भारीपाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्यास शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत, असा सल्ला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभागाने दिला असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

___________________________

खरीप हंगामात कापूस पिकाचे उत्पादन वाढीसाठी नियोजन करा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि. 11 : कापूस हे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील 42 लाख हे. क्षेत्र कापूस पिकाखाली असून ते देशाच्या क्षेत्राच्या 33 टक्के आहे. भारतातील एकूण उत्पादनापैकी 22 टक्के उत्पादन महाराष्ट्रात आहे. तसेच महाराष्ट्राची उत्पादकता देशाच्या तुलनेत 33 टक्के कमी आहे. खरीप हंगाम सन 2020-21 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात कापूस पिकाची 4 लाख 65 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती तर उत्पादकता 265 कि.ग्रॅ. रुई / हेक्टर इतकी आहे. कापूस पिकाचे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने खालील बाबींवर भर देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी विभाग व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

कापूस बियाणे : कापूस बियाण्यांची खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच करण्यास प्राधान्य देण्यात यावे. बनावट / भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत करण्यासाठी बियाणेची पाकीटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करणे याबाबतीत शेतकऱ्यांमध्ये जागृकता करणे आवश्यक आहे. अधिकृत बीटी बियाण्यांची विक्री होईल व परराज्यातून अनधिकृत वाणांची विक्री होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.

रासायनिक खतांचा वापर कमी करणे : शेतजमीनीतील मातीच्या नमुन्याची तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार अन्नद्रवाचे व्यवस्थापन करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. नत्राच्या स्थिरीकरणातून रासायनिक नत्र खताची बचत करण्यासाठी ॲझॅटोबॅक्टर / ॲझोस्पिरीलम यासारख्या जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रीया करणेबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. कापसामध्ये मूग व उडीद अशा आंतरपिकांचा समावेश करावा. फवारणीद्वारे मॅग्नेशिअम सल्फेट, युरिया, डीएपी इ. खतांचा वापर केल्यास रासायनिक खत वापर कमी करणेसाठी विद्राव्य खतांचा फर्टीगेशनद्वारे वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. रासायनिक खतांचा कार्यक्षमतेपणे वापर करणेकरीता सेंद्रीय खते / हिरवळीचे खते / जैविक खतांचा एकात्मिकरित्या अवलंब करणे याबाबत प्रचार प्रसिध्दी करण्यात यावी.

गुलाबी बोंडअळी व बोंडसडाबाबतचे नियोजन : कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जमीनीची खोल नांगरट करून कापसाची पूर्वहंगामी (मे मधील) लागवड टाळण्याबाबत प्रचार करावा. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे गरजेचे आहे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करण्याबाबत जागृती करावी. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मृद परिक्षण करून नत्र खताचा वापर करावा. जिल्ह्यातील जिनींग मिल्स, कापूस एकीकरण केंद्र व गोदामात फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करावी. बोंडसड व्यवस्थापनासाठी जमीनीचा निचरा करावा. तसेच नत्रयुक्त खतांचा कमी वापर करावा.

एक गाव एक वाण : एका गावामध्ये एकच वाण घेवून त्या वाणाची एकाच वेळेस लागवड केल्यास किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो व झाला तरी नियंत्रण सोपे होते. तसेच स्वच्छ, लांब व जिनींगसाठी उच्च दर्जाचा कापूस प्राप्त होतो. याकरीता गावाची व वाणाची निवड करताना त्या गावामध्ये मागील काही वर्षात वापरल्या जाणाऱ्या व चांगले उत्पादन आलेल्या वाणाची एकमताने व शेतकऱ्यांच्या सल्ल्याने निवड करावी.

_____________________________

मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे जिल्ह्याला पाच कॉन्सेन्ट्रेटर

यवतमाळ, दि. 11 : यवतमाळ जिल्ह्याला फिनोलेक्स इंडस्ट्रिज, मुकुल माधव फाऊंडेशन यांचे तर्फे 5 ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर तसेच पल्स ऑक्सीमीटर थर्मल गन व मास्क इ. कोविड संरक्षण साहित्य भेट देण्यात आले. सदर साहित्य जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कंपनीचे प्रतिनिधी पंकज भागवत यांचेकडून आज स्विकारले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कोविड प्रतिबंधक साहित्याचा उपयोग ग्रामीण भागातील गरजवंताकरिता करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितले.

Copyright ©